computer

'बीसीसीआय'तर्फे खेळाडूंना किती मानधन दिलं जातं? 'ए+' आणि 'ए' श्रेणीत कोणकोणते खेळाडू आहेत?

भारतीय संघात खेळणाऱ्या खेळाडूंची कमाई जरी जाहिराती, आयपीएल अशा मार्गांनी होत असली तरी त्यांच्या कमाईचा एक मोठा हिस्सा बीसीसीआयकडून देण्यात येणाऱ्या वार्षिक मानधनातून येत असतो. बीसीसीआयची खेळाडूंना मानधन देण्याची पद्धत कशी असते याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात. नुकतंच बीसीसीआयने खेळाडूंशी केलेल्या वार्षिक कराराची माहिती प्रसिद्ध केली. आज आपण या माहितीच्या आधारे खेळाडूंना मिळत असलेल्या मानधनाबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

बीसीसीआयने खेळाडूंना मानधन देण्यासाठी चार ग्रुप तयार केले आहेत. यात ए+, ए, बी आणि सी अशा चार गटांमध्ये खेळाडूंना ठेवले जाते. सर्वात चांगली कामगिरी करणारे खेळाडू ए+ ग्रुपमध्ये, तर त्यांच्या खालोखाल कामगिरी करणारे ए, बी आणि सी क्रमानुसार ठेवले जातात.

नव्या करारानुसार ए+ ग्रुपमध्ये असणाऱ्या खेळाडूला ७ कोटी, ए ग्रुपमध्ये असणाऱ्या खेळाडूला ५ कोटी, बी गटातील खेळाडूंना ३ कोटी, तर सी गटातील खेळाडूंना १ कोटी वार्षिक मानधन दिले जाईल.

कोणते खेळाडू कोणत्या गटात आहेत?

यापैकी ए+ श्रेणीत विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. हे खेळाडू वार्षिक ७ कोटी मानधनाचे वाटेकरी झाले आहेत. तर ए श्रेणीत रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, आर अश्विन, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, रिषभ पंत, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांना स्थान मिळाले आहे. या खेळाडूंना वार्षिक ५ कोटी रुपये मानधन दिले जाईल.

बी श्रेणीत वृद्धीमान सहा, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, मयंक अग्रवाल याचा समावेश करण्यात आला आहे. यांना तीन कोटी रुपये मिळतील. भुवनेश्वर कुमार हा ए यादीतून बी यादीत घसरला आहे तर शार्दूल ठाकूर सी यादीतून बी यादीत आला आहे.

 

सी श्रेणीत कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वाशिग्टन सुंदर, हनुमा विहारी, दीपक चहर, नवदीप सैनी, अक्षर पटेल, शुभनम गिल, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल यांचा समावेश झाला आहे. यापैकी अक्षर पटेल आणि शुभनम गिल यांना प्रमोशन मिळाले आहे तर युझवेंद्र चहल बी श्रेणीतून सी मध्ये घसरला आहे.

हे झालं आजचं. १९८३ साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्यावेळी खेळाडूंना किती मानधन होतं तेही पाहून घ्या !

सबस्क्राईब करा

* indicates required