computer

एकेकाळचा बॉक्सिंग चॅम्पियन आपल्या मुलांना 'खेळात करियर करू नका' का सांगतोय?

कधीकधी अशी वेळ येते की कितीही मोठी स्वप्नं असली तरी परिस्थितीमुळे ती सोडून द्यावी लागतात. अनेक कलाकार आपण पाहिले असतील जे वृद्धपकाळात अतिशय बिकट परिस्थितीत राहतात. आज अश्याच एका खेळाडूची कहाणी पाहणार आहोत. या खेळाडूला परिस्थितीमुळे आपलं स्वप्न अर्धवट टाकून पोट भरण्यासाठी भाड्याची रिक्षा चालवावी लागली.

ही कहाणी आहे आबिद खान यांची. ते एकेकाळी चंडीगढमधून इंटर यूनिव्हर्सिटी आणि नॉर्थ इंडिया बॉक्सिंग चॅम्पियन होते. त्यांनी राष्ट्रीय दर्जाचे बॉक्सर म्हणून खूप ख्याती मिळवली, पण पोटाची खळगी कशी भरणार? बॉक्सिंग या खेळात नैपुण्य असूनही त्यांना कुठे नोकरी मिळाली नाही. १९८८-८९ मध्ये त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियालामधून बॉक्सिंगचा एक कोचिंग डिप्लोमा केला. ते पंजाब यूनिव्हर्सिटीकडून खेळत होते. बोक्सिगमध्ये स्पर्धा जिंकूनही काही कारणामुळे त्यांना बॉक्सिंग सोडावे लागले आणि त्यांनी नोकरी करण्याचे ठरवले. डिप्लोमानंतर पाच वर्षे त्यांनी सेनेच्या टीम्सना ट्रेनिंग देण्याचेही काम केले. एवढा अनुभव असूनही त्यांना चांगली नोकरी मिळाली नाही.

शेवटी त्यांनी प्रयत्न सोडून दिले आणि रिक्षा चालवण्याचं काम सुरू केले. हमालीही केली. ते म्हणतात 'गरीबी म्हणजे एक शाप आहे'. त्यांनी बॉक्सिंगमध्ये करियर करायचे ठरवले पण काही उपयोग झाला नाही. एक वेळ तर अशी आली की त्यांना त्यांच्याच कॉलेजमध्ये त्यांना शिपायाची नोकरी मागावी लागली. तेव्हा त्यांच्यावर सगळे हसले होते. खेळाडू असून रस्त्यावर भीक मागतोय असे म्हणून हिणवले. ते खूप दुःखी झाले. याहून वाईट म्हणजे त्यांना वाटतं की त्यांच्या दोन मुलांनी चुकूनही खेळात करियर करू नये. खेळाबद्दलचं प्रेम पूर्णपणे त्यांच्या मनातून नष्ट झाले आहे.

त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि अनेकांनी त्यांची कहाणी ऐकून हळहळ व्यक्त केली. काहींना त्यांची जिद्द आवडली. अभिनेता फरहान अख्तरने त्यांचा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले 'त्यांची हृदयदावक कहाणी अनेकांना प्रेरणाही देते.'

कुठल्याही खेळाडूसोबत असे होऊ नये, नाहीतर देश अश्या किती चांगल्या खेळाडूंना मुकेल हे सांगता येत नाही. तुमचे काय मत आहे?

 

लेखिका : शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required