computer

बॉक्स ऑफिस नाही तर क्रिकेटचं मैदान गाजवणारा शाहरुख खान....या नवीन दमाच्या खेळाडूबद्दल जाणून घ्या !!

आयपीएलसाठी लिलाव सुरू असताना अचानक बातमी येऊन धडकली किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण प्रीती झिंटाने शाहरुख खानला आपल्या टीमसाठी विकत घेतले. ही बातमी वाचून लोक कोड्यात पडले. स्वतः एका टीमचा मालक असलेल्या शाहरुखला प्रीती झिंटाने का विकत घेतले असेल. नंतर समजले हा वेगळाच शाहरुख आहे. प्रीती झिंटाने अभिनेता शाहरुख खान नाहीतर क्रिकेटपटू शाहरुख खानला विकत घेतले होते.

तब्बल ५ कोटी २५ लाख रुपये देऊन खरेदी केलेल्या या शाहरुख खानबद्दल लोकांच्या मनात चांगलीच उत्सुकता होती. गड्याने काल चेन्नईविरुद्ध ३६ बॉल्समध्ये ४७ धावा ठोकून काढत आपल्याला मिळालेली किंमत सार्थकी लावली. त्यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

त्याचे नाव शाहरुख खान ठेवण्यामागे देखील एक कथा आहे. साधारण २०-२५ वर्षांपूर्वी मुलांना आजच्यासारखी हटके, आगळीवेगळी आणि विचित्र नावे देण्याची फॅशन नव्हती. तेव्हा मुलांना सहजच आवडत्या हिरो-हिरोईनवरून नावे दिली जायची. म्हणूनच तर आजही अनेक गल्लोगली दिसतात. तर या शाहरुखच्या मावशीला शाहरुख खान खूप आवडत होता. शाहरुख खानचा बाजीगर त्याचवेळी रिलीज झाला होता. त्याचा जन्म आणि बाजीगरचं रिलीज होणं एकच योग जुळून आला. म्हणून त्याला थेट शाहरुख नाव देण्यात आलं.

शाहरुख खान प्रथम श्रेणी क्रिकेट गेली २ वर्षे गाजवत आहे. त्याने मुश्ताक अली ट्रॉफीत २२०च्या स्ट्राईक रेटने तुफान खेळ्या केल्या आहेत. मुश्ताक अली स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने १९ बॉल्समध्ये ४० धावा करत तामिळनाडूला सेमीफायनलमध्ये पोहोचवले होते.

शाहरुख खानची ओळख ऑल राऊंडर म्हणून आहे. गेली दोन वर्ष त्याला बेस्ट मॅच फिनिशर म्हणून ओळखले जाते. काल सामन्याआधी जगातला बेस्ट मॅच फिनिशर धोनीसोबत गप्पा मारतानाचा त्याचा फोटो खूप काही सांगून जातो. पंजाब देखील मधल्या फळीत खोऱ्याने धावा खेचणाऱ्या बॅट्समनच्या शोधात होता. अशात त्यांना शाहरुख सापडला. शाहरुखने देखील स्पर्धेच्या सुरुवातीलाच स्वतःची चमक दाखवली आहे.

सिनेमातल्या शाहरुखप्रमाणेच क्रिकेटमधला शाहरुख मैदान गाजवून जाईल अशी अशा ठेऊया. तुम्हाला त्याची खेळी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required