Shikhar Dhawan Birthday :विकेटकिपर म्हणून केली होती सुरुवात, वाचा कसा झाला शिखरचा 'गब्बर'
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan birthday) आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करतोय. तुम्ही त्याला मैदानावर षटकार, चौकार मारताना, झेल टिपल्यावर मिश्यांवर ताव देताना पाहिलं असेल. मात्र तुम्ही त्याला कधी यष्टिरक्षण करताना पाहिलं आहे का? नाही ना? अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, शिखर धवनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केली होती. त्यानंतर तो भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज झाला आणि आता रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा देखील सांभाळतो. शिखर धवन कसा झाला भारतीय संघाचा गब्बर, हेच या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय संघाचा गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गब्बरचा जन्म ५ डिसेंबर १९८५ रोजी दिल्ली येथे झाला होता. ज्यावेळी त्याने आपल्या वनडे कारकिर्दीला सुरुवात केली, त्यावेळी तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता. मात्र त्याचे कसोटी पदार्पण एका स्वप्नापेक्षा कमी नव्हते. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळलेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने अवघ्या ८५ चेंडूंमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावले होते. तर २००४ मध्ये झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात शिखर धवनने मोलाचे योगदान दिले होते. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत तो गोल्डन बॅटचा मानकरी ठरला होता.
शिखर धवन आगामी आयपीएल २०२३ स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. २०१३ पासून तो सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करत होता. २०१८ मध्ये झालेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या हंगामात, शिखर धवनने ४९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघात सहभागी झाला. तर आगामी हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
शिखर धवनने केलेले विक्रम...
३४ कसोटी सामन्यांमध्ये केल्या आहेत २३१५ धावा.
५८ एकदिवसीय सामन्यांमध्ये केल्या आहेत ६६४७ धावा.
६८ टी-२० सामन्यांमध्ये केल्या आहेत १७५९ धावा.
वनडेमध्ये झळकावली आहेत १७ शतके.
वनडेमध्ये झळकावली आहेत ३५ अर्दशतके.
आयपीएलमध्ये २ शतके झळकावणारा पहिला फलंदाज.
कसोटी क्रिकेटमध्ये जलद शतक झळकावण्याचा विक्रम.
२०१५ विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम
आयसीसी स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम.




