computer

काय आहे प्री -एकलंपशिया: गरोदर स्त्रिया आणि त्यांच्या अर्भकांचा मारेकरी!

काही दिवसांपूर्वी वाचनात आलेल्या जगप्रसिद्ध धावपटू टोरी बॉव्हीच्या हृदयद्रावक मृत्यूच्या बातमीने अनेकजण हळहळले. अत्यंत सशक्त निरोगी आयुष्य जगणाऱ्या केवळ ३२ वयाची टोरी गरोदरपणात होणाऱ्या प्री एकलंपशियामुळे (Pre-ecclampsia) या आजाराने दगावली. पहिल्याच गरोदरपणाच्या साधारण ७व्या महिन्यात अचानक फिट्स येऊन ती मृत्युमुखी पडावी हे केवढे दुर्दैव! आणि दुर्दैवानेत्यांचे मूल ही वाचू शकले नाही, ही केवढी शोकांतिका!भारतीय स्त्रियांमध्येही या आजाराचे  जाणवण्याइतके प्रमाण आहे.तरीही, त्या मानाने या आजाराबद्दल जागरूकता आणि माहिती आपल्याकडे फार कमी आहे.

काय आहे प्री एकलंपशिया

 प्री एकलंपशीया म्हणजे सोप्प्या शब्दात गरोदरपणात रक्तदाब  वाढून लघवी वाटे शरीरातील प्रोटीन बाहेर पडणे.  या आजारात आईचा रक्तदाब अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे आई व बाळ दोघांच्या जीवाला धोका असतो.एरवी निरोगी असलेल्या मातांचा गरोदरपणात रक्तदाब वाढू ( High Blood Pressure) लागतो. अशा वेळेस सतत असह्य डोकेदुखी, छातीत धडधड होणे, अचानक अंगावर सूज येणे, असे काही त्यांना होऊ लागते. हा त्रास साधारणपणे गर्भारपणाच्या  20 आठवडे, म्हणजे जवळजवळ ५व्या महिन्यापासून सुरू होतो. या आजारात गर्भवती मातेच्या रक्तातील प्रोटीन (जे त्यांच्या बीपी ला कंट्रोल करते) ते किडनीवाटे मुत्रातून बाहेर फेकल्या जाते. यामुळे या स्त्रियांच्या किडनी व लिव्हर वर मोठा ताण येतो. साहजिकच त्यामुळे गर्भातील बाळालाही नीट रक्तपुरवठा होऊ शकत नाही.

हा त्रास नेमका कशामुळे सुरू होतो ???

हा त्रास नेमका कशामुळे सुरू होतो याबद्दल अजून संशोधन चालू आहे पण संभाव्य कारणे खालील प्रमाणे आहेत:
लठ्ठपणा.मातेचे वय ३५ पेक्षा अधिक असणे.
गर्भात जुळी अथवा अधिक मुले असणे.गर्भाशयातील वार ( मातेच्या गर्भाशयातील बाळाला रक्तपुरवठा करणाऱ्या भाग) चुकीच्या ठिकाणी असणे किंवा त्याची वाढ नीट न होणे.
पहिले गरोदरपण असणे.गरोदर पणा पूर्वीपासूनच उच्च रक्तदाब, मधुमेहाचाअथवा दोन्हीही विकार असणे.पूर्वीपासूनच किडनी विकार अथवा लिव्हर विकार .
ज्यांच्या आई /आजीला त्यांच्या गरोदरपणात प्री-एकलंपशिया होऊन गेलेला असल्यास अशा गर्भवतीं नी जास्त काळजी घेतली पाहिजे.हा आजार अचानक सुरू होऊन लवकर च अक्राळ विक्राळ रूप धारण करतो. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी दर महिन्याला तपासणी साठी बोललेले असते त्याला नियमित गेले पाहिजे. तिथे डॉक्टर जे रक्तदाब तपासतात ते अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांना प्री एकलंपशिया ची शंका वाटल्यास ते तुमच्या लघवीची तपासणी करतात.

या आजाराची मुख्य लक्षणे

या आजाराची मुख्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
अचानक हातावर, चेहेऱ्यावर सूज येणे.
सततची असह्य डोकेदुखी.
अचानक कमी/ अंधुक दिसू लागणे.
श्वास घेण्यात अडचण येणे.
छाती व पोट यांच्या मध्ये दुखणे.
अचानक फिट्स ( झटके) येणे.
यांपैकी कोणतेही दोन गोष्टी एकावेळी होत असल्यास त्वरित डॉक्टर कडे जावे.प्री -एकलंपशिया मुळे गर्भातील बाळ सुद्धा धोक्यात येते. प्री-एकलंपशिया ची ट्रीटमेंट न घेतल्यमुळे बाळाची गर्भातील वजन वाढ आधी खुंटते, नंतर त्याची शारीरिक व बौद्धिक वाढ थांबते, आणि मग बाळाचा जीव जातो.प्री एकलंपशिया ने मृत्यू पावलेल्या अधिकांश मातांची बाळे देखील मृतावस्थेत जन्माला येतात. (stillborn)

प्री -एकलंपशिया चा उपचार

गर्भवती च्या चेक अप मध्ये तिचा बीपी वाढून आला आणि लघवी मध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन दिसले की आजार झाला असे म्हणतात. या आजाराला निश्चित असा एकच उपचार आहे, तो म्हणाजे गर्भाशय रिकामे करणे, अर्थात बाळाची डिलीव्हरी (प्रसूती). 
ही डिलिव्हरी शक्यतो सिझर द्वारे केल्या जाते कारण अशा केसेस मध्ये नॉर्मल डिलिव्हरी साठी आई ने प्रयत्न कारणे पण तिच्या आणि बाळाच्या जीवांसाठी धोकादायक असते.बहुतांश महिला ह्या सिझर डिलिव्हरी नंतर २ आठवड्यात हळूहळू बीपी नॉर्मल होऊन बर्‍या होतात. पण या काळात देखील मृत्यू होण्याची शक्यता पूर्ण कमी झालेली नसल्याने त्यांना सतत डॉक्टरांच्या निगरणीत ठेवावे लागते.

कधी कधी गर्भाची बाहेर येण्यासाठी पुरेशी वाढ झालेली नसते.अशा वेळेस डिलिव्हरी करणे बाळाच्या जीवाला धोक्याचे असते. त्यामुळे अशा वेळेस त्या मातांना गरोदरपणात चालणारी, बीपी कमी करण्याची औषधे दिली जातात. यामुळे माता व गर्भ दोघांना कमीत कमी हानी होऊन गर्भाची वाढ होऊ पर्यंत थांबता येते. अशा वेळी मातेला बेड रेस्ट अर्थात संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला जातो. काही वेळा औषधाने बीपी कमी होत नसल्यास अथवा अचानक मातेच्या जीवाला धोका उत्पन्न झाल्यास अपुऱ्या दिवसांचे अर्भक सुद्धा सिझर करून बाहेर काढून इनक्युबेटर, अर्थात नवजात अर्भकाच्या आय सी यू मध्ये ठेवावे लागू शकते.
गर्भवती ला जर अधू दृष्टी, अवघड श्वास, डोकेदुखी हे त्रास पण होत असतील तर त्यासाठी पण काही गोळ्या दिल्या जातात.

 

गर्भवती स्त्रियांना आपण नियमित प्रसुतीपुर्व तपासणीला जायचा आग्रह

प्री-एकलंपशियाने ग्रस्त मातांना वारंवार प्रसुतीपूर्व तपासणी साठी नेणे, त्यांच्या प्रकृती कडे बारीक लक्ष ठेवणे आवश्यक असते. मुळात आधी हा आजार आहे हे वेळेत माहीती पडल्यास धोका बराच कमी होतो कारण या मातांना वेळेवर मदत मागायचे कळते आणि ती लवकर दिल्या देखील जाते.
प्रसिद्ध धावपटू टॉरी बोव्ही यांच्या दुर्दैवाने त्यांनी प्रसूतीपूर्व तपासण्याना जाण्यास टाळाटाळ केली व त्यांना स्वतःला हा आजार आहे हे कळलेच नाही...आणि शेवटी राहत्या घरी एकट्या असताना अचानक फिट्स (झटके) येऊन त्यात त्यांचा मृत्यु झाला.
तर या लेखाच्या निमित्ताने आपण  आपल्या माहितीतील सर्व गर्भवती स्त्रियांना आपण नियमित प्रसुतीपुर्व तपासणीला जायचा आग्रह करूया.

लेखिका: डॉ. अवनी पाध्ये (BDS)

सबस्क्राईब करा

* indicates required