Paedophile: तुमच्या मुलांना या मनोविकारग्रस्त लोकांपासून वाचवा

अस्वस्थ आई-वडील क्लिनिक मध्ये येतात, सोबत साधारण दहा वर्षांची मुलगी. समस्या अशी की, मुलगी अंघोळ करायला नकार देते! झोपेत बेड ओली करते आणि रात्री स्वप्नात ओरडत उठते! शाळा म्हटलं की, पोटात दुखतं... मात्र अंगाला हात लावू देत नाही!

'कुठे त्रास होतोय' म्हणून हात जवळ नेला तर प्रचंड रडारड! स्पर्शच नको! प्रचंड तिटकारा...भिती!

मुलगी फार घाबरलेली होती.

हळूहळू विचारपूस केली तेव्हा कुठे एकेक गोष्ट उलगडू लागली.

कोणीतरी जवळचे 'काका' गणित शिकवायला येतात... आणि सगळ्या अंगावरून हात फिरवतात!

ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही अगदी अशीच केस होती... त्यावेळी मुलगा होता! जवळपास चार महिने मुलगा शाळेत गेला नव्हता! आई-वडिलांसमोर तो कधीच बोलला नव्हता पण बरीच विचारपूस केल्यावर त्याच्या सांगण्यावरून समजलं की, शाळेतील एक शिक्षक एकट्यात घेऊन त्यांना वाटेल तिथे स्पर्श करायला लावायचे.

'पिडोफिलीया'...

हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये लहान मुलांबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट,

खरंतर दुर्दैवच म्हणता येईल कारण हे सगळे लोक एकतर जवळचे नातेवाईक असतात किंवा शेजारी, आई- वडिलांचे मित्र असतात... यामध्ये ९० टक्के गुन्हेगार हे जवळचेच लोक असतात!

'गुड टच-बॅड टच' हे आईवडीलांनी‌ आपल्या मुला-मुलीला शिकवणं फार आवश्यक आहे. आजकाल आपल्या लहान मुलींना आई हे शिकवते पण मुलांना नाही शिकवत. 'मुलांना काय गरज आहे?' असं वाटतं पण त्यांनासुद्धा गरज असते... लहान 'मुलं' सुद्धा तेवढीच पीडीत होतात! जगभरात साधारणपणे ४ पैकी एक लहान मुलगी आणि १३ पैकी एक लहान मुलगा या अत्याचाराचे पिडीत आहेत.

साधारणपणे मुख्य करून पंधरा ते तीस या वयोगटातील तरुण आणि पन्नाशीनंतरचे काही पुरुष पिडोफिलीयाने ग्रस्त असतात. सगळेच नाही पण काही जण तर नक्कीच असतात. अशा लोकांना आपण कोण आहोत, आपलं शिक्षण, पद, पैसा, समाजातील स्थान, कुटुंबातील स्थान याने काहीएक फरक पडत नाही. हा एक मानसिक आजार आहे आणि या या आजाराची कारणे बरीच आहेत. आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे की, जास्तीत जास्त १३ वर्षे आणि कमीत कमी ६ महिन्यांचं बाळ यांचे शिकार असतात!

दुर्दैवाने या विषयावर आपल्याकडे कोणीही चार चौघात बोलत नाही, यावर चर्चा होत नाही. असा काही प्रकार असतो हे सुद्धा कोणी स्वीकार करत नाही. कधी कधी पीडितांच्या आई-वडिलांना सांगून सुद्धा त्यांचा विश्वास बसत नाही. कधी कधी वास्तव कळून सुद्धा समाजाच्या भितीपोटी दुर्लक्ष केलं जातं

प्रामाणिकपणे स्वतःला विचारायला हवं की, वर जे काही लिहिलंय ते स्वतः सोबत किती प्रमाणात जुळतंय. जवळपास प्रत्येक स्त्री या अनुभवातून कधीतरी गेली आहे आणि हे करणारे आपल्याच जवळचे कोणीतरी नातेवाईक असतात!

कधीकधी अशा गोष्टींचा त्या मुलांच्या मेंदूवर कायमचा आघात होऊ शकतो. खासकरून मुली पुढे जाऊन प्रत्येकाकडे संशयाने बघणाऱ्या, आत्मविश्वास गमावललेल्या, भित्र्या किंवा प्रचंड चिडखोर बनतात. लहाणपणाची ती 'मानसिक जखम' एखादीचं आयुष्य उध्वस्त करू शकते!

पोस्टच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या त्या मुलीचं आणि आई-वडीलांचं समुपदेशन केलं... अजून वेळ लागेल पण ते कुटुंब नक्कीच यातून बाहेर पडेल.

आजकालच्या मुलांना फार लवकर भरपूर गोष्टी कळतात त्यामुळं आधी सारखं गोष्टी लपवून ठेवायचे दिवस गेले. त्यांना बोलत राहा या विषयावर. शरीराच्या अवयवांबद्दल त्यांना माहिती द्या... कुठे हात लावू द्यायचा, कुठे नाही हे स्पष्ट शिकवा!

त्यांना 'नाही' म्हणायला शिकवा!

आपल्या मुलांवर आपलं लक्ष असतंच... आपल्या मुलांशी फार जवळीक कोण करतंय यावरही लक्ष ठेवणं आवश्यक असतं!

डॉ. प्रकाश कोयाडे

सबस्क्राईब करा

* indicates required