computer

पीतज्वर:एक घातक विषाणूजन्य रोग आणि त्याला रोखणार्‍या व्हॅक्सिनचा इतिहास

१९ वे शतक संपता संपता पश्चिम गोलार्धात आणि पश्चिम आफ्रिकेच्या किनारी प्रदेशात पीतज्वर म्हणजेच यलो फीवरने चांगलाच धुमाकूळ घातला होता. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. रुग्णाला ताप, पचनमार्गात रक्तस्राव, यकृत निकामी होणे अशी लक्षणे दिसून नंतर त्याचा मृत्यू होत असे. याचे कारण अज्ञात असल्यानं त्यावर ठोस असा उपायही सापडत नव्हता. आफ्रिकेतून तेव्हा इतर देशांत गुलाम म्हणून निग्रो लोक नेले जात. त्यांच्या माध्यमातून हा रोग पश्चिमेकडेही पसरला. हा रोग वाहून नेणारे वाहक होते ईडीस इजिप्ती जातीचे डास. हे डास साथ असलेल्या देशांकडून येणाऱ्या जहाजावरच्या पाण्याच्या पिंपांमधून पश्चिमेकडे, मुख्यतः अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे पोहोचले आणि तिथे पीतज्वराची साथ आली. तेव्हा हा रोग डासांमुळे फैलावतो हे लक्षात आले. क्युबामधील एक डॉक्टर कार्लोस फिन्ले याने हे शोधून काढले, मात्र त्याचे मत स्वीकारले जायला मध्ये बराच काळ लोटावा लागला.

पुढे १९३० मध्ये हार्वर्ड विद्यापीठातील मॅक्स थायलर याच्या असे लक्षात आले की पीतज्वराच्या विषाणूंची लागण पांढऱ्या उंदरांमध्येही होते. त्यामुळे या रोगाच्या प्रादुर्भावाला अटकाव करणारी प्रतिपिंडे किंवा अँटीबॉडीज तयार होत आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी पांढऱ्या उंदरांवर चाचण्या करता येतील असे त्याच्या लक्षात आले. यापूर्वी या प्रयोगांसाठी माकडांचा वापर केला जाई. उंदरांवरही याचा परिणाम होतो हे दिसल्याने सहज उपलब्ध होऊ शकणारे उंदीर संशोधनासाठी वापरले जाऊ लागले. ही प्रक्रिया आधीच्या तुलनेत सोपी आणि स्वस्त होती. मग संशोधकांनी पीतज्वराचे विषाणू उंदराच्या मेंदूत सोडून त्याचा एक भाग अँटीबॉडीज असलेल्या रक्तरसामध्ये मिसळला आणि हे मिश्रण इतर उंदरांच्या मेंदूत सोडले.

यात अपेक्षित परिणाम दिसल्यावर त्यांच्या संशोधनाला गती आली. एका उंदराकडून दुसऱ्या उंदराकडे संक्रमित होताना विषाणूची क्षमता कमी होते हे त्यांच्या लक्षात आले. हीच थिअरी वापरून १९३०-४० या दशकात त्यांनी विकसित केलेले पहिले व्हॅक्सिन पश्चिम आफ्रिकेच्या रहिवाशांसाठी वापरले गेले. पुढे १९५१ मध्ये थायलरने पीतज्वर व्हायरसची कोंबडीच्या भ्रूणात वाढ केल्यास त्याची रोगकारकता कमी होत असल्याचे दाखवून दिले. हा उपाय अधिक प्रभावी आणि सोपा असल्याने साऱ्या जगभर त्याचाच उपयोग केला गेला. थायलरला त्याच्या औषध क्षेत्रातील कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार दिला गेला. पुरस्काराची रक्कम होती ३२ हजार यूएस डॉलर्स. एवढ्या पैशाचे काय करणार असे विचारल्यावर त्याचे उत्तर होते - एक स्कॉचची केस आणून निवांत स्कॉच पीत ब्रूकलीन डॉजर्स टीमची एखादी बेसबॉल मॅच पाहत बसायची त्याची इच्छा होती!

वास्तविक थायलरचे मूळचे संशोधन अमिबिक डिसेंट्री आणि रॅट बाईट फीवर यांच्यावर होते. पुढे त्याला पीतज्वराच्या संशोधनात रस निर्माण झाला. सुरुवातीला हा रोग जिवाणूंमुळे होतो असा समज होता. थायलरनेच हा रोग विषाणूंमुळे होतो हे पुराव्यानिशी सिद्ध केले.
गेल्या काही वर्षांत अँटीबॉडीज तयार करण्याच्या तंत्रात बरेच बदल झाले आहेत. १९६० च्या सुमारास हिमाग्लुटीनेशन-इनहिबिशन अँड कॉम्प्लिमेंट फिक्सेशन या चाचण्या विकसित करण्यात आल्या. त्यांच्या मदतीने अँटीबॉडीज शोधून काढणे जास्त सोपे झाले. या चाचण्यांच्या मदतीने विशिष्ट विषाणूला अँटीबॉडीज किती प्रमाणात निष्प्रभ करतात हे मोजले जाते.

आजही या रोगावर ठोस उपचार नाहीत, त्यामुळे त्याला फक्त रोखणे हाच योग्य उपाय आहे. आज उपलब्ध असलेले व्हॅक्सिन केवळ एका डोसमध्ये आयुष्यभराची प्रतिकारकशक्ती देते, मात्र अजूनही त्याचा पुरवठा पुरेसा नाही. त्यातल्या त्यात सुदैव हे, की याचे रूपांतर अजूनतरी जागतिक महामारीत झालेले नाही. जो काही त्याचा उद्रेक मर्यादित राहिला आहे, त्याचे श्रेय नक्कीच थायलर महाशयांचे आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required