computer

पिसाळलेल्या कुत्र्याच्या जबड्यात हात घालणाऱ्या लुई पाश्चरने रेबीजवर लस कशी शोधली??

रेबीज हा विकार कुत्र्याच्या चावण्यामुळे होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. १८०४ मध्ये जगातला पहिला रेबीज संक्रमित माणूस सापडला. त्याचं नाव होतं जॉर्ज गॉटफ्रेड झिंके. त्याकाळी रेबीज हा जिवावर बेतणारा रोग होता. जगात काही क्षेत्रं रेबीजबाधित होती. या प्रदेशांत फक्त रेबीजमुळे मरण पावलेल्या व्यक्तींंची संख्या वर्षाला ५० हजार इतकी होती. यामध्येही आशिया खंडातील मृत्युसंख्या सर्वात अधिक होती. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी संशोधनास सुरुवात झाली.

या संशोधनात महत्त्वाचं योगदान देणारी व्यक्ती म्हणजे लुई पाश्चर. १८८० च्या दशकात पाश्चरच्या लक्षात आलं की रेबीजची लागण भटक्या कुत्र्या़ंंच्या चावण्यामुळे होते. मग काय, आता त्यावर उपाय शोधून काढायच्या नादाला तो लागला. त्याच्या प्रयोगांची कहाणी जितकी रंजक आहे तितकीच हटकेही! ध्यास घेतला की किती घ्यायचा याचा हा आदर्श नमुना आहे.

त्याचं असं व्हायचं, पाश्चरचे दोन नोकर रेबीज झालेल्या पिसाळलेल्या कुत्र्याचा जबडा दोन्ही बाजूंनी फाकवून धरायचे आणि पाश्चर कुत्र्याच्या तोंडात काचेची पोकळ नळी घालून तिच्यात कुत्र्याची लाळ जमा करायचा. हे अतिशय धाडसी आणि धोकादायक काम होतं. पण त्याने ते आव्हान स्वीकारलं होतं. असं सांगतात, की अगदी बोहल्यावर चढायच्या दिवशीही तो प्रयोगच करत होता. चर्चमध्ये वर्‍हाडी त्याची वाट पाहत बसलेले आणि या महाशयांचा पत्ताच नाही! शेवटी त्याच्या मित्रांना त्याच्या प्रयोगशाळेत जाऊन 'आज तुझं लग्न आहे' अशी आठवण करून द्यावी लागली होती.

रेबीजवर व्हॅक्सिन विकसित करताना केलेल्या एका प्रयोगात पाश्चरने या रोगाने मेलेल्या एका सशाच्या पाठीच्या कण्याचा एक तुकडा कापून चौदा दिवस एका निर्जंतुक बाटलीत ठेवला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की लागण झालेल्या टिश्यूजमध्ये पाण्याचा अंश कमी झाल्यास तो विषाणू कमकुवत होऊन त्याचा प्रभाव कमी होतो. मग त्याने या तुकड्याचे बारीक कण काही निरोगी कुत्र्यांच्या मेंदूंत टोचले. त्या कुत्र्यांना काहीही झालं नाही. नंतर त्याने दोन कुत्र्यांच्या शरीरात चौदा दिवसांपूर्वीचा, मग तेरा, मग बारा असं करत अगदी ‘ताजा' नमुना टोचला. त्याचवेळी दुसऱ्या दोन कुत्र्यांना त्याने आधीच्या स्टेप्स टाळून थेट पिसाळलेल्या कुत्र्याची ताजी लाळ टोचली. एका महिन्यानंतर ज्या दोन कुत्र्यांना पाश्चरनं दररोज वाढत गेलेल्या ताकदीचे लाळीचे डोस दिले होते ती निरोगी राहिलेली दिसली, पण ज्या दोन कुत्र्यांना त्याने एकदाच ताजी लाळ टोचली होती ती दोन्ही कुत्री मेलेली आढळली.

रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंवर मात करण्याचा मार्ग मिळाला!

पूर्वी पिसाळलेलं कुत्रं चावल्यास चौदा इंजेक्शनं घ्यावी लागायची. यात पहिल्या दिवसापासून चौदाव्या दिवसापर्यंत कुत्र्याच्या लाळेतलं विषाणूंचं प्रमाण वाढवत नेत अशी लाळ टोचली जात असे. नंतर या प्रकारात सुधारणा होऊन पिसाळलेल्या कुत्र्याच्या लाळेसारखी वेगवेगळी मिश्रणं एकत्र करून एखाद दोन इंजेक्शन्सवर भागायला लागलं. १८८५ च्या जुलैमध्ये पाश्चरनं पिसाळलेला कुत्रा चावलेल्या एका लहान मुलावर आपल्या उपायाचा पहिला प्रयोग करून बघितला आणि तो एकदम यशस्वी ठरला.

या व्हॅक्सिनच्या विकसनातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यादरम्यान मिळालेलं यश. निर्मितीदरम्यान अतिशय कमी फेल्युअर्सची नोंद झालेलं हे व्हॅक्सिन आहे. पिसाळलेलं कुत्रं चावल्याने थेट मृत्यू ओढवण्याचे प्रसंग आजकाल फारसे येत नाहीत, यासाठी या लुई पाश्चर महाशयांचं ऋण नक्कीच मान्य करायला हवं.

सबस्क्राईब करा

* indicates required