computer

४२ वर्षे एकाच ठिकाणी पार्क केलेली कार हलवली जातेय, प्रशासन तिचं काय करणार असेल असे तुम्हांला वाटते?

एखादी गाडी एकाच ठिकाणी पार्क करून वर्षानुवर्षे तिच्याकडे कुणी फिरकलेच नाही तर काय होईल? गाडीचे काही पार्टस् गायब होतील आणि गाडी भंगारात घालण्याच्याच योग्यतेची बनेल. हा झाला आपला अंदाज! मात्र इटलीमध्ये गेली चाळीस पेक्षा जास्त वर्षे एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या गाडीचे चक्क स्मारक केले जात आहे.
इटलीतील कोनीगॅनो शहरात एंजेलो फ्रीगोलंट यांचा न्यूजपेपर आणि मासिकांचा स्टॉल होता. त्यांच्या लान्सिया फुलवा १९६२ कारमधून ते वर्तमानपत्र आणि मासिकांचे गठ्ठे आणत आणि आपल्या दुकानात उतरवून घेत. गठ्ठे उतरवल्यानंतरही त्यांची ही लान्सिया फुलवा दुकानासमोरच पार्क केलेली असे. एंजेलो यांचा हा नित्याचाच दिनक्रम बनला होता. कालांतराने त्यांनी आपले हे दुकान बंद केले, पण आपली कार मात्र त्या दुकानाच्या दारातच पार्क करून ठेवली. सुमारे ४७ वर्षे झाली त्यांची लान्सिया अजूनही त्याच ठिकाणी पार्क केलेली आहे.

इतक्या वर्षांत एकाच ठिकाणी पार्क केलेली ही गाडी आजूबाजूच्या लोकांसाठी तर सवयीची बनून गेलीच, पण बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही हिचे आकर्षण सुटले नाही. अनेक लोकांनी या कार सोबत काढलेले सेल्फी सोशल मिडीयावर पोस्ट केले. त्यामुळे तर कुणाला घराचा पत्ता वगैरे सांगताना या इटालियन स्ट्रीटवर राहणारे लोक लँडमार्क म्हणून आवर्जून या कारचा उल्लेख करू लागले.

शहर प्रशासनाने सुमारे चार दशकांहून एकाच ठिकाणी उभी असलेली ही कार आता हलवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला त्यांनी या कारची डागडुजी करवून घेतली आणि ही कार पाजूआ शहरातल्या मोटारींच्या संग्रहालयात ठेवली. पण आता ते ही कार एंजेलो यांच्या घरासमोरील रस्त्यावरच पार्क करणार आहेत. त्यामुळे एंजेलो यांना आपल्या खिडकीतूनच आपल्या या प्रिय कारचे दर्शनही होईल आणि पर्यटकांनाही लान्सिया फुलवासोबत सेल्फी घेण्याचा आनंद मिळेल. लान्सियाची किर्ती तशी जगभर पसरलेली आहेच. १९७२ साली या कारने इंटरनॅशनल रॅली चॅम्पियनशिप देखील मिळवली होती.

लान्सिया फुलवा ही कार खास स्पोर्टिंगसाठी बनवली गेली होती. एंजेलो यांचे तर आपल्या या कार र निरतिशय प्रेम होते. त्यांची बायको बर्टीला मोदोलू तर चेष्टेने त्यांची कार म्हणजे त्यांची दुसरी बायकोच असल्याचे म्हणते.

शहर प्रशासनाच्या मते आता ज्या ठिकाणी ही कार पार्क केलेली होती त्याठिकाणी रहदारीला अडथळा होत होता. म्हणून त्यांनी कार हलवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ही कार त्यांनी अशाच जगातील उत्तमोत्तम गाड्या ज्या संग्रहालायात ठेवण्यात आल्या आहेत त्या पाजूआ शहरातील मोटार संग्रहालयात ठेवण्याचा निर्णय घेतला पण नंतर पुन्हा त्यांनी आपला हा निर्णय बदलून त्याच शहरात आणि विशेषत: एंजेलो यांच्या घरासमोरच कारचे स्मारक बनवून तिथे पार्क करण्याचे ठरवले.

स्थानिक लोकांच्या मते ती कार त्यांच्या शहराचा एक अविभाज्य भाग बनली आहे, तेव्हा ती शहारातून दूर हलवणे योग्य ठरणार नाही. शहरवासीयांच्या भावनांचा आदर करत शहर प्रशासनाने आपला निर्णय बदलल्याने एंजेलो यांच्यासह संपूर्ण शहरवासी आनंदात आहेत.
तुम्हालाही लान्सिया फुलवा सोबत सेल्फी घ्यायला आवडेल ना?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required