computer

ज्या स्पर्धेतल्या कामगिरीने भारतीय संघातले स्थान पक्के होते ती सय्यद मुश्ताक अली स्पर्धा कुणाच्या नावे भरते माहित आहे?

क्रिकेटमध्ये भारी कामगिरी केली म्हणून आजवर अनेकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अर्जुन पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार तसेच इतरही पुरस्कार दिले जातात. पण ज्यांच्या नावावर स्पर्धा भरवल्या जातात असे खेळाडू मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. दुलिपसिंगजी, रणजितसिंगजी, विजय हजारे, डी. बे. देवधर, झेड. आर. इराणी ही त्यातली काही नावे. या यादीतलं आणखी एक नाव म्हणजे सय्यद मुश्ताक अली!!

ज्या स्पर्धेत चांगली कामगिरी करून खेळाडू भारतीय संघातील आपले स्थान पक्के करतात ती स्पर्धा म्हणजे सय्यद मुश्ताक अली स्पर्धा!!! ज्या सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावरून ही स्पर्धा भरवली जाते, त्यांच्याबद्दल आज आपण वाचणार आहात.

आजच्या काळात क्रिकेटचा खेळ बराच बदलला आहे. पूर्वीच्या संथपणाची कात टाकून खेळ वेगवान झाला आहे. हे सय्यद मुश्ताक अली असे क्रिकेट ५० वर्षांपूर्वी खेळत असत. भारतीय संघाचे तत्कालीन कॅप्टन सी. के. नायडू यांनी या भन्नाट फलंदाजाला शोधून काढले होते. सुरुवातीला बॉलर म्हणून सुरुवात केल्यावर पुढे जाऊन ते मुसळधार बॅटिंग करू लागले.

सय्यद मुश्ताक अली यांचा जन्म १७ डिसेंम्बर १९१४चा. इंदौर त्यांचं जन्मगाव. अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी इंग्लंडविरुद्ध क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण संपूर्ण जगात त्यांच्या नावाचा डंका वाजवणारी खेळी त्यांनी इंग्लंड विरुद्धच ओपनिंगला येऊन केली होती. त्या दिवशी त्यांनी तुफान बॅटिंग करत इंग्लिश खेळाडूंची यथेच्छ धुलाई केली होती.

सय्यद मुश्ताक अली यांनी एकूण ११२ धावांची खेळी करत इतिहास घडवला होता. कारण तोवर परदेशी भूमीवर कोणीही शतक केले नव्हते. सय्यद अली ही कामगिरी करणारे पहिले भारतीय ठरले होते. सय्यद अली यांची लोकप्रियता आजच्या खेळाडूंच्या लोकप्रियतेलासुद्धा मागे टाकणारी होती.

एकदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध ईडन गार्डनवर होणाऱ्या सामन्यात सय्यद यांना घेतले नव्हते. ही गोष्ट लोकांना समजताच त्यांनी सामन्यावरच बहिष्कार घातला होता. मैदानाच्या बाहेर नो मुश्ताक नो टेस्टच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. अवघ्या ३४ वर्षांत त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण या काळात त्यांनी भारतीय संघासोबतच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल ४० विविध संघांसाठी सामने खेळले होते.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर तब्बल ३० शतके आणि १३ हजारांपेक्षा अधिक धावा आहेत, तर बॉलिंगमध्ये पण कमाल करत त्यांनी १६२ विकेटस् घेतल्या होत्या. त्यांनी तब्बल चार वेळा होळकर रणजी संघ जो सध्या मध्य प्रदेश क्रिकेट संघ म्हणून ओळखला जातो त्यांना रणजी स्पर्धेत विजेता होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.

त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना १९६४ साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता आणि २००९-१० साली नुकत्याच सुरू झालेल्या T20 स्पर्धेचे नामकरण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी असे करण्यात आले.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required