computer

खून करून तिहारच्या बाहेर मृतदेह टाकणारा थंड डोक्याचा सीरिअल किलर!! तो पोलिसांना चिठ्ठ्याही पाठवायचा!

गुन्हेगारीच्या जगात जाणारा रस्ता हा वन वे असतो अस म्हणतात. काही लोक पैशांसाठी हा रस्ता स्वीकारतात, तर काही नाईलाजाने. पण काही लोक असे असतात जे स्वतःहून या रस्त्यावरती पाऊल टाकतात. या प्रकारातले गुन्हेगार सर्वात धोकादायक असतात. स्वतःच्या समाधानासाठी, स्वार्थासाठी, कधी कधी मजा म्हणून ते गुन्हे करत असतात. मग ती चोरी असो दरोडा असो किंवा खून.
आपण अनेक सीरिअल किलर्सबद्दल ऐकल असेल. रमन राघव, गावित बहिणी, ऑटो शंकर, साइनाईड मल्लिका.. यादी तशी मोठी आहे. पण यांपैकी एक असा सिरियल किलर होता जो खून करून मृतदेह चक्क तिहार जेलच्या समोरच टाकायचा. त्याचं नाव होतं चंद्रकांत झा!!

या सगळ्याची सुरुवात १९९८ साली झाली. दिल्लीच्या आदर्शनगर भागात पोलिसांना एक डोक नसलेला मृतदेह सापडला. खुनाची पद्धत इतकी भयानक होती की पोलीस देखील हादरून गेले होते. पोलिसांनी असा प्रकार यापूर्वी पहिला नव्हता. पोलिसांनी खूप चौकशी शोधाशोध केली पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यांना मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आल नाही. त्यामुळे त्यांना ती केस बंद करावी लागली.
त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच २६ जून २००३ रोजी तिहार जेलच्या गेट नंबर ३ जवळ पुन्हा एकदा शीर नसलेला मृतदेह लोकांना आढळून आला. पोलीस आले आणि तपासाला सुरुवात झाली. गुन्ह्याची पद्धत आणि मृतदेह पाहून पोलीस पुन्हा एकदा हादरून गेले होते. दिल्लीत सगळीकडे भीतीचे वातावरण होते. मृतदेह पाहून आणि तो टाकण्याचे ठिकाण यावरून पोलिसांना लगेच कळले हे कुणा लेच्यापेच्याचं काम नाही. पोलिसांनी खूप कसून शोध घेऊन देखील त्यांच्या हाती काहीच पुरावे लागले नाहीत. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी असाच शीर नसलेला मृतदेह अलीपूर विभागात सापडला आणि या सगळ्या खुनांमागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना कळून चुकले की ते एका सीरिअल किलरच्या शोधात आहेत. खूप शोध घेऊनही पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा लागत नव्हता.

यानंतर चौथा मृतदेह एका कचर्‍याच्या पेटीत सापडला, तर पाचवा मृतदेह २० ऑक्टोंबर २००६ रोजी तिहार जेलच्या बाहेर बरोबर त्याच जागी सापडला ज्या जागी २००३ मध्ये मृतदेह सापडला होता. तो मृतदेह अगदी त्याच जागी ठेवण्यात आला होता. एक इंचदेखील पुढे मागे नाही. यानंतर २५ एप्रिल २००७ रोजी अजून एक मृतदेह तिहारच्या बाहेर सापडला. दिल्ली हादरून गेली होती. पोलीस देखील हैराण झाले होते. तिहारसारख्या गजबजलेल्या ठिकाणी मृतदेह टाकणे म्हणजे खरंच निर्ढावलेल्या माणसाचं काम होतं. पोलिसांना काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज होती. त्यांची नाचक्की होत होती. खुनी प्रत्येक मृतदेहांसोबतच पोलिसांना चिट्ठी पाठवत होता. सगळ्या चिठ्ठ्यांचा आशय एकच होता- "हिम्मत असेल तर मला पकडून दाखवा." चिठ्ठीमध्ये पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिव्यादेखील देण्यात आल्या होत्या. असं पत्र लिहून पोलिसांना धमकावणं हे या खुन्याच्या अंगलट आलं. त्यातच त्याने दुसरी चूक केली ती म्हणजे आझादनगर पोलीसस्टेशनमध्ये पोलिसांना फोन करून मृतदेह ठेवल्याचे सांगणे. तीच चूक त्याला सगळ्यात जास्त नडली आणि पोलिसांनी ज्या PCO वरून फोन आला होता तो शोधून काढला. पुढील तपासात हा फोन चंद्रकांत झा या माणसाने केल्याचे निष्पन्न झाले. अशा रीतीने गेली ७ वर्षे पोलिसांना फिरवणारा सीरिअल किलर पोलिसांना सापडला होता. दिल्लीने सुटकेचा निश्वास टाकला. एका फोन कॉलच्या जोरावर चंद्रकांतवर केस करणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याचे हस्ताक्षर मिळालेल्या चिठ्ठ्यांशी मिळवून बघितले, हस्ताक्षर त्याचेच होते. आणि पोलिसांनी हा तपास पुढे चालूच ठेवला.

चंद्रकांतला अटक केल्यानंतर खूप गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. त्याने हे खून का केले कसे केले, त्याने मृतदेहांच्या शीरांचं काय केलं, सगळं काही स्पष्ट झालं.  पण चंद्रकांत हा हिस्टरीशीटर होता. त्यामुळे फक्त त्याच्या स्टेटमेंटच्या जोरावर पोलीस त्याला कोर्टात नेऊ शकत नव्हते. तो कोर्टात पलटण्याची शक्यता होती. पोलिसांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा चंद्रकांत अतिशय शांतपणे त्यांना म्हणाला “मला जर तुम्ही मारलेत, तर मी एकही गोष्ट सांगणार नाही. पण जर न मारता प्रश्न विचारलेत तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन.” जेव्हा त्याला कोर्टातून बाहेर आणत असताना पत्रकारांनी तू हे सात खून का केले? असा प्रश्न विचारला तेव्हा, “कशावरून मी फक्त सातच खून केले आहेत? तुम्ही पत्रकार सगळ्या खोट्या बातम्याच का छापता?” असे उत्तर त्याने दिले होते. यावरून तुम्ही त्याच्या मानसिक आरोग्याचा अंदाज लावूच शकता. पोलिसांना स्टेटमेंट देताना त्याने काहीही न लपवता सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या. त्याने ज्या-ज्या ठिकाणी मृतदेहांचे तुकडे टाकले होते, तिथूनच ते मिळाले होते. त्याला खून केलेल्या व्यक्तीचे त्याला कल्याण करायचे असायचे म्हणून तो त्यांचे शीर यमुना नदीमध्ये फेकत असे.

चंद्रकांत हा मुळचा बिहारचा राहणारा. आई शिक्षिका. त्याला चार भाऊ होते. त्याची आई त्याला नीट सांभाळत नसायची. म्हणून पोट भरण्यासाठी त्याने लहान वयातच मजुरी करायला सुरुवात केली. तो लहानपणापासूनच रागीट होता. त्याला खोट्याची खूप चीड होती. यातूनच गावातील एकाला त्याने चाकूने भोकसले होते. तेव्हापासून गावातील लोक त्याला वचकून असत. नंतर तो कामाच्या शोधात दिल्लीला आला आणि मार्केटमध्ये पोती उचलण्याची कामे करू लागला. पहिल्यांदा त्याला १९९८ मध्ये अटक करण्यात आली होती तेव्हा तिहार जेलमध्ये एका कॉन्स्टेबलने त्याचा खूप छळ केला होता. म्हणून त्याने सगळे मृतदेह तो कॉन्स्टेबल ड्युटीवर असलेल्या गेट जवळच टाकले होते. त्याने अशा लोकांना आपली शिकार बनवलं होत जे त्याच्या ओळखीचे होते. तो त्यांना मारून मृतदेहाचे तुकडे करून टोपलीत भरायचा आणि तिहारच्या बाहेर टाकून यायचा. तो एकदा पोलीसांची गंमत पाहण्यासाठी लोकांच्या पुन्हा तिहारच्या बाहेर आला होता, तेव्हा पोलीस त्याने ठेवलेली टोपली उघडण्याचा प्रयत्न करत होते. ती टोपली खूप घट्ट बांधण्यात आली होती. तेव्हा चक्क चंद्रकांतने पोलिसांना ती टोपली उघडायला आपल्या छोट्याश्या चाकूने मदत केल्याचं तो सांगतो.
 

तो त्याच्या टार्गेट असलेल्या व्यक्तीला त्याच्या खोलीवर बोलवत असे. त्याला खायला घालत असे आणि नंतर हातपाय बांधून त्याचा खून करत असे. त्याच्या तावडीतून सुटलेल्या त्याच्याच एका गाववाल्याने अंगावर शहारे आणणारा किस्सा सांगितला होता. “चंद्रकांत माझा मित्र होता. तो एकदा गावी आला होता. तेव्हा त्याने रूम शिफ्ट करायची आहे, मला मदत करायला दिल्लीला येशील का म्हणून विचारले. मी तयार झालो आणि त्याच्यासोबत दिल्लीला गेलो. जेव्हा आम्ही त्याच्या रूमवरती पोहोचलो, तेव्हा तिथले दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिथे तीन व्यक्ती हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होत्या. चंद्रकांतने माझे ही हातपाय बांधले आणि धमकी दिली मी आता या सगळ्यांना मारणार आहे आणि तुला ही. मी खूप घाबरलो होतो. एकट्या व्यक्तीने अशा तीन माणसांना बांधून ठेवणे म्हणजे खायची गोष्ट नव्हती. चंद्रकांतकडे एक कॅमेरा होता. त्याने आमचे फोटो काढले, मी त्याला म्हणालो तू आम्हांला मरणारच आहेस, तर आम्हाला शेवटचं खायला तरी दे. तो जसा जेवण आणण्यासाठी बाहेर पडला तसे आम्ही सगळ्यांनी एकमेकांना सोडवले आणि तिथून पळून गेलो.” त्यांना तुम्ही तक्रार का केली नाही असे विचारले असता ते म्हणाले, "त्याच्याकडे माझे फोटो होते आणि मला भीती होती मी जर कुणाला काही सांगितले तर तो पुन्हा येऊन मला मारून टाकेल” हा किस्सा सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
 

पुढे तपासात पोलिसांना चंद्रकांत विरुध्द ठोस पुरावे हाती लागल्याने त्याच्यावरच्या सात खुनांच्या आरोपांपैकी पाच खुनांमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. चंद्रकांत इतका क्रूर होता की खून केल्यानंतर तिथेच बसून पोटभर जेवायचा आणि मग त्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा.
चंद्रकांतचं म्हणण आहे कि त्याने सातपेक्षा जास्त खून केले आहेत. पण पोलिसांना या विषयी कोणतेच पुरावे सापडले नाहीत. अशा या क्रूर चंद्रकांतवरती बनवलेली एक डॉक्युमेंट्री नुकतीच Netflix वरती रिलीज झाली आहे. यामध्ये त्याच्या केसचा तपास करणार्‍या अनेक अधिकाऱ्यांची मुलाखत तसेच त्याच्या तावडीतून सुटलेल्या त्याच्या मित्राची मुलाखत देखील आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required