computer

धंद्याची एकदम हटके आयडिया आहे तुमच्याकडे? तर चला शार्क टँकमध्ये आणि व्हा उद्योगपती !

समजा बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनात  व्यावसायिक कल्पना घोळते आहे.ही कल्पना तुमच्या मते एकदम अफलातून आहे.या कल्पनेवर तुम्ही पूर्ण जागृतावस्थेत,(समोर एकच प्याला वगैरे नसतानाही)सखोल विचार केला आहे. ही कल्पना जर प्रत्यक्षात आली तर तुमचा धंदा अगदी व्यवस्थित चालणार,नव्हे धावणार,असा तुम्हाला भरवसा आहे.किंवा तुमची एक छोटीशी कंपनी आहे. तुम्ही करत असलेल्या उत्पादनात जणू जग बदलून टाकण्याची क्षमता आहे.आता तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे पण एकच मोठ्ठा लोच्या असा अहे की तुमच्याकडे पुरेसं भांडवल नाही. त्यामुळे "तुझी आयडिया एकदम हटके आहे. चल, मी तुझ्या बिझनेस मध्ये पैसा गुंतवतो.'' असं म्हणणारा माणूस आज तुमच्यासाठी देवदूतासमान आहे.अर्थात हा देवदूत नावापुरताच देवदूत असणार आहे कारण प्रत्यक्षात तो एक अट्टल-मुरब्बी-कसलेला गुंतवणूकदार असणार आहे. तो पैसे असेच देणार नाही, तर बदल्यात तो तुमच्या बिझनेसचा 'लचकेतोड' वाटा मागणार हे नक्की.पण तरीही आज तुमचा बिझनेस चालवण्यासाठी असं भांडवल मिळालं तर हवंच आहे. त्यामुळे तुम्ही हा व्यवहार करायला तयार होता. आणि 'आंधळा मागतो एक डोळा..' या उक्तिनुसार एका ऐवजी पाच पाच देवदूत समोर उभे राहिले तर ...? 
तर काय घडेल हे समजण्यासाठी तुम्हाला 'शार्क टँक' हा अमेरिकन रिऍलिटी शो  बघायलाच हवा ! 
 

शार्क टॅंक म्हणजे व्यवसायासाठी भांडवल उभारणी करू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी हे एक हक्काचं व्यासपीठ आहे. या शोमध्ये कोणताही उद्योजक किंवा कंपनी आपलं उत्पादन किंवा बिझनेस आयडिया मांडू शकतात. यासाठी त्यांना साधारण पंचेचाळीस मिनिटांचा वेळ दिला जातो. पाच/सहा गुंतवणूकदारांचं पॅनल हे प्रेझेंटेशन पाहतं.या पॅनल मेंबर्सना शार्क असं नाव आहे. या शोमध्ये केविन ओ'लिअरी, डेमंड जॉन, मार्क क्युबन, रॉबर्ट हर्जेव्हॅक, बार्बारा कॉर्करान यांनी शार्क म्हणून काम केलं आहे.शो सुरू होतो तेव्हाच भॉ भॉ इंग्लिशमध्ये यात सहभागी गुंतवणूकदारांची ओळख करून दिली जाते. हे सगळे शून्यातून विश्व उभारलेले उद्योजक आहेत.या शोसाठी म्हणून त्यांना मानधन मिळतं, पण ते जे पैसे गुंतवतात ते त्यांचे स्वतःचे असतात. 

हे शार्क कितीही पैसेवाले वगैरे असले तरी शेवटी ती माणसंच आहेत. त्यामुळे मानवी गुणावगुण त्यांनाही चिकटलेले आहेत. यात केविन ओ'लिअरी हा सर्वात खत्रूड गुंतवणूकदार म्हणून ओळखला जातो. कॅनेडियन बिझनेसमन असलेल्या ओ'लिअरीची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे. तुलनेने बार्बारा ही मॅनहॅटनमधील रिअल इस्टेट एजंट मवाळ आहे. समोर सेल्स पिच करत असलेल्या उद्योजकांना बार्बाराचा आधार वाटतो. डेमंड जॉन हा कृष्णवर्णीय शार्क आहे. फुबू म्हणजे फॉर अस बाय अस (For Us By Us) या नावाच्या स्पोर्ट्सवेअर कंपनीचा तो सीईओ आहे. शार्क टँकच्या पाचव्या सीझनमध्ये १५ वर्षांच्या मोझिया ब्रिजेस या उद्योजकाला त्याने भांडवल पुरवण्याऐवजी मार्गदर्शन करायची युनिक ऑफर दिली होती. मार्क क्युबनचा कल फूड स्टार्ट अप्स मध्ये पैसे गुंतवण्याकडे आहे. 
जर एखादी कल्पना खरोखर हटके असेल, बिझनेस पोटेन्शियल असेल तर हे शार्क त्यासाठी भांडवल गुंतवण्याची तयारी दाखवतात. बदल्यात त्यांना या बिझनेसचा हिस्सा द्यावा लागतो.

मात्र हे शार्क गुंतवणूक अशीच करत नाहीत. ते आधी उद्योजकाच्या कल्पना, उत्पादन, बिझनेस मॉडेल, त्याने केलेलं त्याच्या कंपनीचं मूल्यांकन यांची चिरफाड करतात. पैसे गुंतवण्यापूर्वी त्या कल्पनेचं बिझनेस पोटेन्शियल आणि उद्योजकाची एकंदर तयारी या गोष्टी पारखल्या जातात. तुमच्या कल्पनेत खरोखर दम असेल तर तिला आर्थिक पाठबळ मिळतंही. पण तसं झालं नाही तरी निदान ती कल्पना जगासमोर यायला या शोमुळे मदत होते.प्रश्न विचारताना - धंद्याची पारख करताना हे उद्योजक जे प्रश्न विचारतात त्याव्रूनच तुमच्या लक्षात येतं की यांना 'शार्क' का म्हणतात ? 

आपली कल्पना सादर करताना हे उद्योजक त्यांना किती गुंतवणुकीची अपेक्षा आहे आणि बदल्यात ते बिझनेसचा किती टक्के वाटा देऊ इच्छितात हे सांगतात. जर दोन्ही बाजूंनी होकार असेल तर डील फायनल होतं. याला हँडशेक डील म्हणतात. पण जर एकाही शार्कला कल्पना पसंत पडली नाही किंवा त्यांनी देऊ केलेलं डील उद्योजकाने नाकारलं तर व्यवहार फिस्कटतो, आणि हे उद्योजक हात हलवत परततात. 

जी डील्स होतात त्यांचं पुढे काय होतं? तर काही शार्क्सच्या म्हणण्यानुसार झालेल्या व्यवहारांपैकी वीस टक्के व्यवहार प्रत्यक्षात येतच नाहीत. याचं कारण शो दरम्यान होणारा व्यवहार हा प्रत्यक्ष व्यवहार नसतो. ती एक प्रकारची कमिटमेंट असते. त्यानंतर संबंधित उत्पादनांची, कल्पनांची सखोल चाचणी केली जाते. कंपनीच्या स्पर्धकांचा कसून अभ्यास केला जातो. याशिवाय उद्योगाची आर्थिक स्थिती विचारात घेतली जाते. या सगळ्या कसोट्यांवर उत्पादन टिकलं तरच व्यवहार प्रत्यक्षात येतो. दुसऱ्या बाजूला अनेक उद्योजकांना प्रत्यक्ष व्यवहारात रस नसतो. ते केवळ आपलं उत्पादन किंवा कल्पना यांना प्रसिद्धी मिळावी या हेतूनेच शोमध्ये सहभागी होतात. यातून 'शार्क इफेक्ट' ही नवी संकल्पना उदयाला आली आहे. केवळ शोमध्ये हजेरी लावून मुहदिखाई करण्यानेदेखील या कंपन्यांचे विक्रीचे आकडे अगदी दहा वीस पटीनेही वाढतात.DoorBot नावाच्या एका उत्पादनाचा सौदा सार्क टँक वर फिसकटला पण नंतर हाच संपूर्ण धंदा अ‍ॅमॅझॉनने १ बिलियन डॉलर देऊन विकत घेतला 

 

त्यामुळे हा शो तिकडे खूप लोकप्रिय आहे. सुमारे ४०,००० कंपन्यांनी या व्यासपीठावर हजेरी लावली आहे. याचंच इंडियन व्हर्जन सोनी टीव्ही वर २० डिसेंबर पासून सुरू होत आहे. दर आठवड्याला सोमवार ते शुक्रवार हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. आपल्या भारतीय मातीतल्या बिझनेस आयडिया, त्या मांडणं आणि त्यांचं होणारं विश्लेषण हे सगळंच उत्कंठावर्धक असणार आहे. 
स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required