computer

ॲमेझॉनवर चक्क मुलांना मारायला काठ्या विकत मिळत आहेत?

छडी लागे छम छम, विद्या येई घमघम असे एक बडबडगीत आपण लहानपणी म्हणत होतो, तुम्हाला आठवत असेल. या बडबडगीतात मुलांना मारल्यामुळे त्यांना अक्कल येते असे बिंबवण्यात आले आहे. खरे तर घरात आई-वडिलांचा आणि शाळेत गुरुजी किंवा बाईंचा मार म्हणजे प्रसादच. म्हणजे कसं की त्याला नाही म्हणायची किंवा विरोध करायची हिंमतच व्हायची नाही. आज शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यावर विशेषत: छडीचा वापर करण्यावर बंदी असली तरी अजूनही पालकांना ती मुभा आहे.

मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना मारावेच लागते, असा आपल्या आजी-आजोबांच्या पिढीचा समज होता. त्यानंतर मुलांना शिस्त लावण्यासाठी कधीकधी एखादा फटका दिला तर चालतो, असा आपल्या आई-वडिलांच्या पिढीचा समज होता. आज मात्र काय शिस्त लावण्यासाठी मारणं? छे, किती तो क्रूरपणा! असे ऐकवले जाते बरोबर ना? पण प्रत्यक्षात खरोखरच पालक इतका सूज्ञपणा दाखवत असतील का हो? तुम्हाला काय वाटते? नसतील! हे उत्तर असेल तर तुम्ही बरोबर आहात.
मुलांना मारू नये असे म्हटले जात असले तरी तसे वागले जात नाही. अनेक पालक मुलांना शिस्त लावण्यासाठी, अभ्यास करवून घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांनी मुलांवर हात उचलतात. आता यात हात म्हणजे फक्त हात एवढंच अभिप्रेत नसतं. तर त्यात कधी चप्पल, कधी झादू, कधी रॉड, कधी काठी अशा कित्येक गोष्टींच मदत घेतली जाते. हे झालं पालकांचं!
 

आता बाजारपेठेचा नियम तर तुम्हाला माहितच आहे. ज्याची ज्याची गरज निर्माण होईल ते ते लोकांपर्यंत पोहोचवणे. मग जर पालकांना मुलांना मारण्यासाठी एखाद्या उत्तमातील उत्तम छडीची गरज पडणार असेल तर त्याची पूर्तता करणे हे बाजारपेठेचं कामच नाही का? तर तुम्हीही एक पालक असाल आणि तुमच्या मुलाला मारण्यासाठी तुम्हाला चांगल्या लांबसडक आणि मजबूत पण लवचिक छडीची गरज असेल तर तीही तुम्हाला मिळेल. अहो कुठे काय विचारताय? अमेझॉनवर शोधा ना.

हो चक्क अमेझॉनवर मुलांना मारण्यासाठी उपयोगी पडतील अशा काठ्या किंवा स्टिक्स विकल्या जात आहेत. त्याचे फोटो अपलोड करण्यात आले असून प्रोडक्ट नेममध्ये cane sticks for beating kids, असं लिहिण्यात आलं आहे. कोणा तरी चाणाक्ष युजरच्या हे लक्षात आलं आणि आपल्या रेडिट अकाऊंटवर त्याने अमेझॉनवरील या प्रोडक्टचा फोटो टाकला. त्यानंतर दुसऱ्या एका युजरने याची खात्री करण्यासाठी म्हणून अमेझॉनवर सर्च केले तर cane stick for beating kids, cane stick for beating animals, अशी त्याला सजेशन दिसू लागली. ज्या अर्थी अमेझॉनवर हे प्रोडक्ट विकले जाते म्हणजे त्याला मागणी असणारच असेही काहींना वाटते.

आपल्या पाल्यांना अशा क्रूर शिक्षा देणाऱ्या पालकांचा अनेकांनी आपल्या सोशल मिडियावरून धिक्कार केला आहे. ट्विटरवर तर या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करणारी एक मोहीमच चालवली जातेय की काय असे वाटावे इतपत लोकांनी यावर गंभीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुधा त्यानंतर ॲमेझॉनने प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन बदल्ले असावे, पण केन फॉर बिटिंग किड्स म्हणून सर्च केला तरी अशा काठ्या सर्च रिझल्टमध्ये येतात.

आपल्याकडे शिक्षकांनी मुलांना मारू नये म्हणून नियम असले तरी पालकांना कुठे हा नियम लागू होतो. तसे तर बाहेरच्या अनेक देशांत पालकांनी सुद्धा मुलांना मारायचे नाही, असा नियम आहे आणि हा नियम पालकांनी मोडल्यास त्यांना शिक्षाही होते. भारतात मात्र अद्याप पालकांना शिक्षा देणारा कायदा अस्तित्वात आलेला नाही म्हणून पालक असे काहीतरी ऑनलाइन सर्च करत असतील, तर ही खूपच लाजिरवाणी बाबा आहे.

तुम्हाला काय वाटते?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required