computer

सर्वार्थाने सधन जिल्हा - जळगाव ! सुपीक मातीतल्या संस्कृतीचा ठेवा लाभलेल्या या जिल्ह्याबद्दल वाचलेच पाहिजे !

खान्देशातला एक महत्वाचा जिल्हा म्हणजे जळगांव. जळगांव जिल्ह्याची खरी ओळख अनेक महान साहित्यिकांचा जिल्हा अशी आहे. बहिणाबाई चौधरी, ना. धों. महानोर, बालकवी ठोंबरे यांच्यासह अनेक थोर व्यक्तिमत्वांमुळे या जिल्ह्याला वेगळी उंची प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्रातील इतर नद्यांपेक्षा वेगळी असलेली तापी नदी ही जळगांव जिल्ह्यातून वाहत जाते, सातपुड्याने जळगावला घेरले आहे., तर याच्या दक्षिणेकडे अजिंठा डोंगररांगा आहेत. अहिराणी हीच या जिल्ह्याची मुख्य भाषा आहे. याठिकाणी घरे बांधण्यासाठी कामाची अशी दगड, वाळू, चुनखडी ही खनिजे सापडतात. तापी नदीच्या महत्वाच्या उपनद्या या जिल्ह्यात वाहतात. त्या म्हणजे गिरणा, पूर्णा, वाघूर, भोगावती, पांझरा.

बहिणाबाई चौधरी या शिक्षण झालेले नसूनदेखील साहित्य क्षेत्राला अतिशय मोठे योगदान देणाऱ्या कवयित्री या जिल्ह्यात होऊन गेल्या. त्यांच्या कविता आजही खान्देशातील गावागावात लोकांच्या ओठांवर असतात. त्यांचा सन्मान म्हणून जळगाव येथे असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नामकरण बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे करण्यात आले आहे.

आजवर मराठी माणूस पंतप्रधान झालेला नसला तरी मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाली आहे. अनेकांना हे माहीत नसते पण भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे माहेर हे जळगांव जिल्ह्यात येते. त्या अतिशय उत्तमपणे अहिराणी भाषा बोलू शकतात. आपल्या असामान्य अभिनयाने अजरामर झालेल्या अभिनेत्री स्मिता पाटील या देखील जळगांव जिल्ह्यातील होत्या. महिला सबलीकरणासाठी जळगांव जिल्ह्यातील या महिला मोठे उदाहरण आहेत. तसेच बचत गटांचे जाळे विणून रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या नीलिमा मिश्रा या देखील जळगांव जिल्ह्यातून येतात.

आज जगभर प्रसिद्ध असलेली आणि लाखो लोकांना रोजगार देणारी अझीम प्रेमजी यांची विप्रो कंपनी जळगांव जिल्ह्यातल्या अंमळनेर येथे स्थापन झाली होती. जैन इरिगेशन ही अजून एक कंपनी खान्देशातील हजारो लोकांना रोजगार देत आहे. या कंपनीचे संस्थापक भंवरलाल जैन हे आपल्या गांधीवादी विचारांमुळे ओळखले जातात.

पिकांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर जळगाव जिल्ह्याची महाराष्ट्रात असलेली ओळख म्हणजे केळी या पिकाचा जिल्हा अशीच आहे. पण यासोबतच कापूस हे येथील एक महत्त्वाचे पीक आहे. बाजरी, गहू, भुईमूग, ऊस यांसारखी पिके जळगावमध्ये घेतली जातात. एरंडोल चाळीसगांव परिसरात मोसंबीचे उत्पन्न घेतले जाते तर मेहरून भागात बोरे आणि पेरू प्रसिध्द आहेत. जळगांवमधील तापमान हे राज्यात चर्चेचा विषय असतो. उन्हाळ्यात काही ठिकाणी ४५ ते ४८ सेल्सिअसपर्यंत तापमान असते.

पर्यटकांसाठी जळगांव जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण म्हणजे उनपदेव येथील गरम पाण्याचा झरा. गोमुखातून सतत निघणारा गरम पाण्याचा झरा हे एक आश्चर्य मानलं जाते. याठिकाणी पर्यटकांची सतत गर्दी होत असते. एरंडोल तालुक्यात असणारे झुलणारे टॉवर्स हे पण सुंदर आहेत. १५ मीटर उंच असलेले हे दोन टॉवर आहेत. एक टॉवर फिरवल्यास दुसरा आपोआप फिरतो.

भंवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेले गांधीतीर्थ हे तर प्रत्येकाने एकदा तरी पाहावे असे आहे. अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरून गांधीजींच्या जीवनाचे आणि स्वातंत्र्यातील महत्वपूर्ण घटनांची ऑडीओ व्हिज्युल्स, टचस्क्रीन तसेच इतर तंत्रज्ञानाने सुंदर मांडणी केलेली आहे.

जळगाव जिल्ह्याची ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास इतरांसोबतही जरूर शेअर करा. तसेच तुमच्याकडे अधिकची माहीती असल्यास आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये सांगा. आम्ही लेखात नक्कीच भर घालू.

सबस्क्राईब करा

* indicates required