computer

जय हो !! संगीताचे शिक्षण न घेतादेखील 'राॅक ॲंड रोल आयकाॅन' झालेला एल्व्हिस प्रेस्ली!!

आजची गोष्ट आहे एका सुप्रसिद्ध गायकाची. तो जगप्रसिद्ध झाला, पण् लोकांसमोर गात असताना त्याचे पाय भीतीने लटपटायचे. यावर उपाय म्हणून त्याने गाताना विशिष्ट प्रकारे पाय हलवण्याची लकब आत्मसात केली. शाळेत असताना त्याला अत्यंत सामान्य कुवतीचा मुलगा मानलं जात असे आणि इतर विद्यार्थी त्याला विशेष ओळखत नसत. त्याने संगीताचं रितसर शिक्षण घेतलं नव्हतं. शाळेत असताना तो गाणं गातो हेच कुणाला माहीत नव्हतं. त्यामुळं तो गाणं गायला स्टेजवर आला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुरु झाली!!

तो होता एल्व्हिस प्रेस्ली. तरूणाईला वेड लावणारा राॅक ॲंड रोल आयकाॅन.

त्याचं पूर्ण नाव एल्व्हिस ॲरॉन प्रेस्ली. तो अमेरिकन गायक आणि अभिनेता होता. तो "रॉक अँड रोलचा राजा" होता. एल्व्हिसचा जन्म मिसिसिपी राज्यातल्या टुपेलोचा. तो १३ वर्षांचा असताना त्याचं कुटुंब मेम्फिस, टेनेसीला स्थलांतरित झालं. १९५४ मध्ये त्याच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात झाली. निर्माता सॅम फिलिप्स यांच्यासोबत सन रेकॉर्डमध्ये एल्व्हिसने रेकॉर्डिंग केले. या सॅम फिलिप्सना आफ्रिकन-अमेरिकन संगीत अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे होते. प्रेस्लीचं पहिलं सिंगल‌ गाणं "हार्टब्रेक हॉटेल" जानेवारी १९५६ मध्ये रिलीज झालं आणि ते अमेरिकेत हिट ठरलं. एका वर्षाच्या आत आरसीए ह्या रेकाॅर्ड कंपनीने त्याच्या दहा दशलक्ष रेकाॅर्ड विकल्या. टेलिव्हिजनवरील कार्यक्रम आणि चार्ट-टॉपिंग रेकॉर्डसह, प्रेस्ली रॉक अँड रोलचा नवीन आयकाॅन बनला. पण हा फक्त त्याच्या यशाचा गोषवारा झाला. त्याचं आयुष्य प्रचंड खडतर होतं.

एल्व्हिसचे वडील व्हरनॉन प्रेस्ली सतत नोकऱ्या सोडत आणि त्यामुळं त्यांचं कुटुंब अनेकदा शेजाऱ्यांच्या मदतीवर आणि सरकारी अनुदानावर अवलंबून असे. तो लहान असताना १९३८ मध्ये त्याच्या बाबांना जागा मालकाने लिहिलेल्या चेकमध्ये फेरफार केल्याबद्दल घराबाहेर काढले गेले. त्याचे बाबा व्हरनॉनना आठ महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला, तर एल्व्हिस त्याची आई ग्लॅडिस प्रेस्ली सोबत नातेवाईकांकडे राहायला गेला.

लहान असताना प्रेस्ली ईस्ट टुपेलो कन्साॅलिडेटेड शाळेत शिकला. तिथे त्याचे शिक्षक त्याला "सर्वसाधारण" विद्यार्थी मानत. सहा वर्षांचा असताना त्याने सकाळच्या प्रार्थनेदरम्यान "ओल्ड शेप" हे देशी गाणे सादर केले. या सादरीकरणाने त्याच्या शाळेतील शिक्षक प्रभावित झाले आणि त्याला गायन स्पर्धेत प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. ३ ऑक्टोबर १९४५ रोजी मिसिसिपी-अलबामा फेअर येथे आयोजित करण्यात आलेली स्पर्धा हा त्याचा पहिला परफाॅरमन्स होता. दहा वर्षांचा प्रेस्ली काऊबॉयच्या वेषात होता आणि मायक्रोफोनपर्यंत पोहोचण्यासाठी खुर्चीवर उभा राहिला होता. स्पर्धेत त्याला पाचवा नंबर मिळाला. काही महिन्यांनंतर प्रेस्लीला त्याच्या वाढदिवसासाठी पहिलं गिटार मिळालं; खरं तर त्याला सायकल किंवा बंदूक मिळेल असं वाटतं होतं. पुढील वर्षभरात त्याला त्याच्या दोन काकांकडून आणि चर्चमधील एक पाद्री यांच्याकडून गिटारचे धडे मिळाले. "मी थोडं थोडं गिटार वाजवायला शिकलो, पण लोकांसमोर कधीच गाणार नव्हतो, कारण मी खूपच लाजाळू होतो", प्रेस्ली एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता.

सप्टेंबर १९४६ मध्ये प्रेस्ली मिलम या नवीन शाळेत दाखल झाला तेव्हा तो एकलकोंडा होता. पुढच्या वर्षी तो शाळेत दररोज गिटार आणू लागला. तो जेवणाच्या वेळी वाजवायचा आणि गायचा, आणि त्याला अनेकदा 'काहीतरी टुकार गाणी गातो' असं म्हणून हिणवले जायचे. प्रेस्ली हा टुपेलो रेडिओ स्टेशनवरील मिसिसिपी स्लिम ह्या गायकाच्या कार्यक्रमाचा चाहता होता. स्लिमचा धाकटा भाऊ प्रेस्लीचा वर्गमित्र होता आणि त्याला अनेकदा रेडिओ स्टेशनवर घेऊन जात असे. स्लिमने प्रेस्लीला गिटारच्या कॉर्डच्या तंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले. स्लिमने त्याला दोन ऑन-एअर परफॉर्मन्ससाठी शेड्यूल केले तेव्हा तो अवघा बारा वर्षांचा होता. आधी स्टेज फ्राईटमुळे तो घाबरला होता, पण नंतर त्याने भीतीवर मात केली आणि पुढील आठवड्यात त्याने यशस्वी परफॉर्मन्स दिला.

नोव्हेंबर १९४८ मध्ये प्रेस्ली कुटुंब मेम्फिस, टेनेसी येथे रहायला गेले. जवळपास वर्षभर एका खोलीत राहिल्यानंतर त्यांना लॉडरडेल कोर्ट्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या सार्वजनिक गृहनिर्माण संकुलात दोन बेडरूमचे अपार्टमेंट मिळाले. एल.सी. ह्युम्स हायस्कूलमध्ये प्रेस्लीला आठव्या इयत्तेत संगीतात फक्त सी ग्रेड मिळाली. जेव्हा त्याच्या संगीत शिक्षकाने त्याला सांगितले की त्याच्यात गाण्याची क्षमता नाही, तेव्हा त्याने दुसऱ्या दिवशी गिटार आणले आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी "कीप देम कोल्ड आइसी फिंगर्स ऑफ मी" हे हिट गाणे गायले. तो लाजाळू होता आणि सहसा उघडपणे गाणं सादर करत नसे. वर्गमित्र त्याला "आईवेडा मुलगा" म्हणून त्रास देत. १९५० मध्ये तो त्याच्याहून फक्त अडीच वर्षे मोठा असलेल्या ली डेन्सन याच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे गिटारचा सराव करू लागला. कुटुंबाला हातभार म्हणून एल्व्हिसने लोव्स स्टेट थिएटरमध्ये डोअरकीपर, प्रिसिजन टूल, एम ए आर एल मेटल प्रॉडक्ट्स अशा काही छोट्या मोठ्या नोकऱ्याही केल्या.

मग अचानकपणे प्रेस्ली त्याच्या वर्गमित्रांमध्ये उठून दिसायला लागला, कारण त्याची स्टाईल; खासकरून त्याच्या दिसण्यामुळे. त्याने आपले कल्ले वाढवले आणि केस गुलाबाचे तेल आणि व्हॅसलीनने स्टाईल केले. मोकळ्या वेळेत तो मेम्फिसच्या लोकप्रिय बील स्ट्रीटमध्ये जात असे आणि लॅन्स्की ब्रदर्सच्या दुकानातील भडक, चमकदार कपड्यांकडे उत्कटतेने पाहत असे. मनांतील भीतीवर मात करून त्याने लॉडरडेल कोर्ट्स संकुलाच्या बाहेर परफॉर्म करण्यासाठी एप्रिल १९५३ मध्ये "मिनस्ट्रेल" शोमध्ये भाग घेतला. त्याने गिटार वाजवून काही गाणी गायली. "मी शाळेत लोकप्रिय नव्हतो. बऱ्याच जणांना मी गातो हे देखील माहित नव्हतं. जेव्हा मी स्टेजवर आलो तेव्हा मी पाहिलं की लोक गोंधळ घालत आणि कुजबुजत होते. मात्र गाणी गायल्यानंतर मी शाळेत खूपच लोकप्रिय झालो."

एल्व्हिस प्रेस्लीला संगीताचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नव्हते आणि संगीताच्या नोट्स कशा वाचायच्या हे देखील माहित नव्हतं, पण त्याचा कान मात्र पक्का होता. अनेक प्रसिद्ध गायकांची गाणी ऐकून त्याने विविध प्रकारचे संगीत आत्मसात केले. जून १९५३ मध्ये त्याने हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. तोपर्यंत त्याने संगीतातच करियर करण्याचे ठरवले होते.

"तुला गाता येत नाही आणि तू कधी गायक होशील असं वाटतं नाही". "तुला मेलडी म्हणजे काय हे माहित नाही, तू आपला ट्रकच चालव". असे अपमानजनक शब्द अनेकदा ऐकून देखील एल्व्हिसने हार मानली नाही आणि गायक होण्याचे आपले प्रयत्न सोडले नाहीत. नंतर मात्र इतिहास घडला.

एल्व्हिस प्रेस्लीच्या जगभरात ५०० दशलक्ष पेक्षा जास्त रेकॉर्ड विकल्या गेल्याने, त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये स्थान मिळाले आहे. पॉप, रॉक अँड रोल, कंट्री, समकालीन आणि गॉस्पेल यासह अनेक शैलींच्या गाण्यांमध्ये तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला. प्रेस्लीने तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले, आणि वयाच्या ३६ व्या वर्षी ग्रॅमी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड प्राप्त केले. त्याच्या नांवावर अनेक विक्रम आहेत ज्यात सर्वाधिक गोल्ड आणि प्लॅटिनम अल्बम, बिलबोर्ड २०० वरील सर्वाधिक चार्ट बस्टर अल्बम, यूके अल्बम चार्टवर एकट्या कलाकाराचे सर्वाधिक नंबर-वन अल्बम असे अनेक.

२०१८ मध्ये प्रेस्ली या महान गायकाला डोनाल्ड ट्रम्प यांनी मरणोत्तर 'प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम' प्रदान केले.

सबस्क्राईब करा

* indicates required