computer

दिनविशेष : चित्रपट सृष्टीतला एक अजरामर व्हिलन...वाचा अमरीश पुरी यांच्या सिनेमाचा प्रवास !!

बॉलिवूडमध्ये असा एक व्हिलन होऊन गेला ज्याच्यावर लोकांनी भरभरून प्रेम केले. त्याची प्रत्येक भूमिका सगळ्यांच्या मनावर कोरली गेली आहे. आजपण त्या व्हिलनचे डायलॉग अमर आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय व्हिलन असे त्यांच्याबद्दल म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कदाचित आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला कळलेच असेल. मंडळी तो अफलातून व्हिलन होता अमरीश पुरी!! आज त्यांची जयंती आहे. आणि त्यांचा सन्मान गुगलने सुद्धा केला आहे. गुगलने डुडलद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बॉलिवूड म्हटले म्हणजे सिनेमा हिट होतो तो हिरोमुळे व्हिलन तर बिचारा त्याच्या रोलमुळे शिव्याच खातो राव!! पण अमरीश पुरी त्याला अपवाद होते ते सिनेमात आहेत ही एकमेव गोष्ट सिनेमा हिट ठरण्यासाठी काफी होती.

त्यांनी तब्बल 250 सिनेमांमध्ये काम केले आहे. आपल्या जादुई अभिनयाने त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत केली होती. थेटरमध्ये त्यांचा भारदस्त आवाज घुमायला लागला की वातावरणात कमालीची शांतता निर्माण व्हायची. ते आसुरी हास्यात 'मोगॅम्बो खुश हुवा' म्हणणे असो की भावूक होऊन 'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी' सर्वच भन्नाट होते.

अमरीश पुरी यांची सुरुवातीची कारकीर्द.

मंडळी, अमरीश पुरी हे फिल्म इंडस्ट्री मध्ये चक्क हिरो बनायला आले होते, पण त्यांच्या लुक्समुळे त्यांना बाद ठरवण्यात आलं. आता करायचं काय म्हणून त्यांनी State Insurance Corporation मध्ये नोकरी मिळवली. पण महत्वाचं म्हणजे त्यांनी अभिनयाची कास कधीच सोडली नाही. नोकरी करत असताना त्यांनी टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलं. सोबत ते नाटकात काम करत होते.

(पृथ्वी थियेटर आणि अमरीश पुरी)

तुम्हाला माहीत नसेल पण अमरीश पुरींनी आपल्या करियरची सुरुवात मराठीपासून केली आहे. त्यांनी 'शांतता! कोर्ट चालू आहे' या मराठी सिनेमामधून फिल्मी दुनियेत पाय ठेवला होता. हे वर्ष होतं 1967 चं त्यांनतर 1971 साली त्यांना 'रेश्मा और शेरा' या बॉलिवूड सिनेमात चान्स मिळाला आणि त्यांचा झंझावात सुरू झाला. त्यांच्या अभिनयाला खरी ओळख मिळाली ती ‘नगीना’ मधून!! श्रीदेवी आणि त्यांची जुगलबंदी तुफान गाजली होती.

मिस्टर इंडियाच्या वेळचा किस्सा तर भयानक आहे राव!! मिस्टर इंडिया मधील रोलसाठी एका वाईट दिसणाऱ्या व्हिलनची गरज होती. अमरीश पुरींची निवड होणे शक्य नव्हते कारण अमरीश पुरी दिसायला चांगले होते पण डायरेकटरचा आग्रह होता शेवटी मेकअप करून अमरीश पुरींना मोगॅम्बो बनवण्यात आले. आणि मिस्टर इंडिया हाऊसफुल व्हायला लागला. मिस्टर इंडिया मधील अनिल कपूर किंवा श्रीदेवीचा रोल आज लोकांना आठवत सुद्धा नाही पण मोगॅम्बो मात्र लोकांच्या मनात जाऊन बसला आहे.

आज हॉलीवूडमध्ये काम मिळावे म्हणून बॉलिवूडवाले किती प्रयत्न करतात हे सर्वांना माहीत आहे, पण त्याकाळी अमरीश पुरींनी हॉलीवूड सुद्धा गाजवले होते. स्टीफन स्पिलबर्ग सारख्या प्रसिद्ध डायरेक्टरच्या 'इंडिना जोन्स - द टेम्पल ऑफ डूम' या सिनेमात त्यांनी काम केले होते. त्या सिनेमातील कामाने हॉलिवूडवाले एवढे इंप्रेस झाले की त्यांना हॉलीवूड कडून खूप साऱ्या ऑफर यायला लागल्या, पण त्यांनी नंतर एकही ऑफर स्वीकारली नाही. त्याचे कारण त्यांनी सांगितले की “तिथे बॉलिवूडच्या लोकांना कमीपणा घेऊन काम करावे लागते. आणि आपल्यात क्वालिटी असून पण आपण कमीपणा का घ्यावा?” मंडळी, अश्या प्रकारे स्वाभिमानी बाणा दाखवणारे अमरीश पुरी पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यात सुद्धा कठोर होते.

कोयला, शहेनशहा, करन- अर्जुन, गदर, नायक यांच्यासारख्या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका आजसुद्धा मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जातात...

अशा या एका दिग्गज अभिनेत्याला जन्मदिनानिमित्त बोभाटातर्फे आदरांजली.