computer

फोर्ब्स ३०: संगीत आणि फ्युजनमधल्या प्रयोगांनी या तरुणांना फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळालं आहे....

भारतातल्या तरुण पिढीविषयी अनेकदा नकारात्मक लिहिले जाते. ती कशी बेजाबदार आहे, आळशी आहे असं काहीसे चित्र बऱ्याचदा उभे केले जाते.. पण हे खरे आहे का? नक्कीच नाही! आजची तरुण पिढी अगदी कमी वयात नोकरीमध्ये कितीतरी वरची पदे यशस्वीपणे  सांभाळात आहे. अगदी स्वतःचा व्यवसाय किंवा आपले समजाविषयीचे कर्तव्यही अगदी आत्मविश्वासाने बजावत आहे. वेगवेगळ्या आणि नवीन क्षेत्रात हे तरुण आपल्या भारताचे नाव जगभरात पोहोचवत आहेत. अशा  भारतीय  तरुण आणि तरुणींची दखल खुद्द फोर्ब्सने घेतली आहे. 

फोर्ब्स इंडियाने ३० अंडर ३० ची यादी जाहीर केली आहे. या यादीत  कर्तबगार भारतीय तरुणांचा गौरव केला आहे. गेले वर्षभर वय वर्षे ३०च्या आतील ज्या तरुणांनी स्वतःच्या कौशल्याने आपापल्या क्षेत्रात मेहनत घेऊन यश मिळवले त्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. या यादीतील काही मोजक्या तरुणांवर बोभाटा लेखमालिका घेऊन येत आहे. 

आजच्या भागात संगीत क्षेत्रातील २ तरुण चेहऱ्यांना भेटूया.

 

संगीत क्षेत्रात आज मोठी स्पर्धा लागून राहिली आहे, पण योग्य शिक्षण आणि तुमची अंगभूत कला या दोन्हीच्या जोरावर तुम्हाला नक्कीच यश संपादित करता येऊ शकते. आज आम्ही फोर्ब्सच्या यादीतील ज्या दोन व्यक्तींबद्दल बोलणार आहोत त्यांनीही आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आहे.

रित्विझ श्रीवास्तव (२४) आणि मालविका मनोज (माली) (२७) ही ती दोन नावे. फॉर्ब्सच्या ३० अंडर ३० यादीत त्यांचे नाव संगीत या सेगमेंटमध्ये झळकले आहे. 

रित्विझच्या घरातच संगीत होतं. आई-वडिल दोघेही संगीतकार असल्याने त्याचा संगीत प्रवास अवघ्या ११ व्या वर्षीच सुरू झाला. आईचा रियाझ ऐकत ऐकत त्याने शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. पाश्चिमात्य संगीत त्याला आवडत असले तरी भारतीय शात्रीय संगीत त्याच्या जास्त जवळचे आहे. यात काहीतरी वेगळा प्रयोग करून संगीत निर्माण करावं असा विचार त्याला आला. आणि त्याने इंडी पॉप फ्युजनमध्ये उडी घेतली. त्याचे ४ अल्बम्स आहेत, त्यात २४ गाणी आहेत.

त्याची वेगळ्या धाटणीची गाणी तरुण पिढी डोक्यावर घेत आहे. २०२० मध्ये त्याने बकार्डी इंडियाच्या सहकार्याने स्वत: चे YUV फेस्ट नावाचे संगीत आणि कॉमेडी शोज ही केले आहेत,  तसेच जुगाड मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने लॉकडाउन वर आधारित मिनी वेब सीरिज, केबिन फीव्हरचीही निर्मिती केली आहे. युट्यूब वर याचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत.  सध्या तो ७०० गाण्यांवर काम करत आहेत. भविष्यात रित्विझ हे नाव भारताच्या संगीत क्षेत्रात खूप पुढे जाईल असा अनेकांना विश्वास आहे. 

संगीत क्षेत्रातले अजून एक तरुण नाव म्हणजे  मालाविका मनोज. तिला संगीत क्षेत्रात माली या नावानेही ओळखले जाते. संगीत क्षेत्रात येण्यासाठी तिने नोकरी सोडली. तिने ठरवले होते ६ महिने प्रयत्न करायचा. जमलं तर ठीक नाहीतर परत नोकरी. त्यासाठी मुंबई सोडून ती चेन्नईला गेली. ए.आर. रहमान हे तिचे संगीत क्षेत्रातील गुरू. तिच्यासाठी दैवतच. आणि आज तिचे नाव युरो इंडी संगीतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ‘मंडेन’ या तिच्या गाण्याने युरो इंडी संगीत चार्टमध्ये सलग कितीतरी महिने पहिला नंबर लावला होता.

तिला पॉप संगीताची आवड आहे पण त्यात काही नवीन आणण्याचा तिचा प्रयत्न असतो. तिला लवकरच तिचा स्वतःचा व्हिडीओ अल्बम चॅनेलवर रिलीज करायचा आहे. जगभरातील कलाकारांसोबत तिला काम करायचे आहे. खुद्द ए.आर. रहमान यांनी तिचे संगीत ऐकून कौतुक केले आहे. ते म्हणतात,"ती उत्तम लिहिते, त्यामुळे तिच्यामध्ये आपोआप एक प्रगल्भता आहे. स्वतः उत्तम लिहून संगीत देणारे आणि गाणारे कलाकार फार कमी आहेत. पण मालविका त्यांच्यापैकी एक आहे." तीच्यासाठी हे कौतुक फार मोलाचे आहे. आता या यादीत झळकल्यावर अजून नवनवीन गाणी तिच्याकडून ऐकायला मिळतील याची अपेक्षा करूयात.

काही कलाकार  प्रवाहाबरोबर जातात तर काही स्वतः प्रवाह निर्माण करतात. या दोघांचीही शैली खास असल्यामुळे भारतीय संगीतात हे दोघे भविष्यात महत्वाचे योगदान करतील हीच आशा करूयात.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required