computer

मास्टर मदन- १४ वर्षांच्या या असामान्य प्रतिभेच्या गायकाला पारा खायला घालून कुणी का मारलं असेल?

आपल्याकडे खूप कमी वयात यशस्वी होऊन तेवढ्याच कमी वयात गायब झालेले अनेक लोक सापडतील. प्रत्येकाची अर्थात वेगळी आणि त्या-त्या लोकांपुरती वाजवी कारणं असू शकतात. पण जेव्हा प्रतिभा असूनही असे लोक इतरांच्या असूयेमुळे किंवा त्यांनी केलेल्या राजकारणामुळे नाहीसे होतात तेव्हा जास्त वाईट वाटते. आम्ही अशाच एका अवलियाची गोष्ट आज घेऊन आलो आहोत. या मुलाने अगदी कमी वयात सगळ्यांना भुरळ घातली होती. लोक सांगतात की तो जर अजून काही वर्षे जिवंत राहिला असता तर त्याने यशाची नवी समीकरणे तयार केली असती. कोण होता तो अवलिया? आणि काय झाले त्याच्या सोबत? चला जाणून घेऊया!!

या मुलाचं नाव आहे मास्टर मदन. आजही भारतातल्या जुन्याजाणत्यांना त्यांच्या गाण्यांच्या आठवणींनी गहिवरुन येते. गाण्याचं कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण किंवा परंपरा नसताना मास्टर मदन अवघ्या आठ वर्षांच्या वयातच अशा परिपक्वतेने गात असत की ते भल्याभल्या गवय्यांनाही अवघड असेल. मास्टर मदनचं आयुष्यच इतकं छोटं होतं की त्यांना त्यांचं कर्तृत्व दाखवायलाही खूप कमी अवधी मिळाला.

त्यांनी जेमतेम ८ गाणी म्हटली. कित्येक वर्षे त्यातली दोनच गाणी रसिकांकडे ग्रामोफोनच्या तबकड्यांवर होती. काही दर्दींनी आणखी कसून शोध घेतला आणि आणखी काही गाणी हाती गवसली. पण त्यांच्या गायकीची साक्ष देणारी दोन-तीन गाणी अजूनही सापडत नाहीत. पण उपलब्ध गाणी अशी आहेत की त्यावरुन या मुलाच्या महानतेची चुणूक मिळते आणि लोक त्या गाण्यांचे वेड्यासारखे फॅन आहेत. सघर निझामींच्या 'यूं न रहरहकर हमें तरसाईये' आणि 'हैरतसे ताक रहा है जहाँ मुझे' या मास्टर मदननी गायलेल्या गझला ऑल इंडिया रेडिओ आणि रेडिओ पाकिस्तानवरही नेहमी वाजवल्या जायच्या. स्त्रीच्या मधाळ आवाजातल्या या गझला ऐकून त्यांवर फिदा झाले. पण नंतर जेव्हा लोकांना कळलं की या गझला कुणी कसलेल्या गायिकेने नाही, तर एका दहा वर्षांच्या मुलाने गायल्या आहेत तेव्हा त्यांना आश्चर्य वाटल्यावाचून राहावलं नाही.

मास्टर मदन यांचा जन्म जालंधरचा. २८ डिसेंबर १९२७ या दिवशीचा. अवघ्या ३ वर्षांचे असताना त्यांनी गायनाला सुरुवात केली आणि अगदी कमी दिवसांत ते भारतभर प्रसिद्ध झाले. मास्टर मदन साडेतीन वर्षांचे असताना त्यांचा हिमाचल प्रदेशातल्या धरमपूर येथे आपला पहिला गायनाचा कार्यक्रम झाला. तेव्हा त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण कुठे घेतलं होतं याची माहिती उपलब्ध नाही, पण त्यांना संगीत आणि त्यांतल्या बारकाव्यांची जाण होती हे मात्र सगळीकडे वाचायला मिळतं. या धरमपूरच्या कार्यक्रमात त्यांनी 'धृपद' गायकीनं सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं होतं. तो कार्यक्रम ऐकणाऱ्यांच्या मते ज्या पद्धतीने त्यांची लयकारी आणि सुरतालावर पकड होती ते पाहून रसिकजन तल्लीन होत असत. या मनमोहक गाण्याच्या कार्यक्रमानंतर त्यांना सोन्याची अंगठी, शाल आणि सुवर्णपदक देण्यात आले. पहिल्याच यशस्वी कार्यक्रमामुळे ते रातोरात प्रसिद्ध झाले. दुसऱ्या दिवशी पेपरांचे रकानेच्या रकाने मास्टरांच्या प्रतिभेचे गुणगान करत होते. त्याकाळचे पेपरांचे क्लिपींग्ज आजही त्यांची पुतणी रविंदरकौर यांनी जपून ठेवले आहेत.

एक लहान पोरगं स्वर्गीय आवाज घेऊन गायनात उतरलं आहे ही गोष्ट देशभरातील संगीत क्षेत्रात पसरायला वेळ लागला नाही. या पहिल्याच यशानंतर ते आपले मोठे बंधू मास्टर मोहन यांच्यासोबत गायनाचे कार्यक्रम करू लागले. सगळीकडून त्यांना प्रचंड मागणी व्हायला लागली. पोस्टरवर जरी दोन्ही भावांचे नाव असले तरी लोक फक्त मास्टर मदन यांना ऐकण्यासाठी येत असत.

सात वर्षांचे असताना त्यांनी पंडित अमरनाथ यांच्या हाताखाली ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. मास्तरांचे मोठे बंधू मोहन हे वायोलिन सुद्धा वाजवत असत. हा तेव्हाचा काळ आहे जेव्हा "जब दिल ही टूट गया" किंवा " बाबूल मोरा नैहर छूटो जाय" ही गाणी देणारे प्रसिद्ध संगीतकार के. एल. सेहगलसुद्धा शिमल्यात राहत असत. तर हे सेहगल आपली हार्मोनियम घेऊन मास्टर मदन यांच्या घरी जात आणि अत्यंत असामान्य अशा या लोकांची मैफिल तिथे जमत असे. अशा मैफिलींव्यतिरिक्त त्याकाळच्या राजे-राजवाड्यांच्या दरबारातसुद्धा त्यांचे कार्यक्रम होत असत. तिथे मास्टर मदनना बरीच पदके आणि बक्षीसे मिळत असत. त्यांना मिळालेली पदके ते आपल्या कार्यक्रमात घालून गायन करत असत. त्यांच्या गायनासाठी त्यांना पैसा आणि प्रसिद्धी मुबलक मिळत होती आणि हे यश पाहून त्यांचा परिवारसुद्धा खुश होता.

मास्टर मदन यांच्याबद्दल बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. त्यातल्या काही दंतकथाही असू शकतील. त्यातलीच १९४० सालची एक गोष्ट सांगितली जाते. महात्मा गांधी यांची शिमल्यात एक बैठक होती. बैठकीला आमंत्रितांपैकी मोजकेच लोक आले होते. कारण त्यातले बरेच लोक मास्टर मदन यांच्या कार्यक्रमाला ऐकायला गेले होते.

सततचा प्रवास आणि नेहमीचे कार्यक्रम यांचा भार त्यांच्या १४ वर्षं वयाच्या शरीराला मानवत नव्हता. ते आजारी पडू लागले. त्यांना लवकर थकवा जाणवू लागला. सुरुवातीच्या काळात त्यांनी डॉक्टरांना दाखवणे टाळले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर मात्र डॉक्टरांनी आता आम्ही काहीच करू शकत नसल्याचे सांगितले. त्यांच्या शरीराला हळूहळू विषबाधा होतेय आणि ती हळूहळू त्यांचे शरीर पोखरत आहे असे डॉक्टरांचं म्हणणं होतं. आपल्या दैवी प्रतिभेसह हा असामान्य कलावंत ५ जून १९४२ साली हे जग कायमचे सोडून निघून गेला. त्यांच्या सर्व मेडल्ससहित त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.

मास्टर मदन यांच्या मृत्यूबद्दल आजही लोकांना अनेक प्रकारच्या शंका आहेत. त्यांचा मृत्यू घातपात असावा असे म्हटले जाते. त्यांच्या मृत्यूबद्दल दोन-तीन कहाण्या सांगितल्या जातात. एकदा अंबाला येथे कार्यक्रमाला गेले असताना तिथल्या एका गायक मुलीने त्यांना कोठ्यावर बोलविले आणि विषारी विड्याचे पान दिले अशी एक कथा आहे. मास्टर मदन दिल्ली रेडिओ स्टेशनला गायला जात असत तेव्हा तिथल्या कँटिनमधलं दूध पित असत. त्या दुधातून त्यांना पारा देण्यात आला असंही म्हणतात. अजून एक कोलकाता येथील गोष्ट सांगण्यात येते ती म्हणजे तिथे त्यांची प्रसिद्ध ठुमरी बिनती सुनो मेरी गायल्यानंतर कुणीतरी त्यांना हळूहळू अंगात भिनणारे विष दिले. या कार्यक्रमानंतर ते कधीच गाऊ शकले नाहीत.

मास्टर मदन यांना परिवारातीलच द्वेष करण्याऱ्यांनी संपवले की गायन क्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यानी, हे आजही गुलदस्त्यात असले तरी हा असाधारण अवलिया त्याच्या कलाकारीने आजही जिवंत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required