computer

नेटफ्लिक्सचा १९९चा बेसिक प्लॅन घ्यावा की चौघांत मिळून ७९९चा प्रिमियम? या घ्या टीप्स..

सध्या वेबसिरीजचा जमाना आहे. तरुण पब्लिकने टीव्ही केव्हाच बाजूला केला आहे. अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेऊन देशविदेशातील अफलातून सिरीज, सिनेमे पाहून आपली जनता पण ग्लोबल होतेय.  पण काय आहे, हे सगळे चॅनेल्स फुकट पण येत नाहीत ना राव!!

हे जरी असलं तरी गेम ऑफ थ्रोन्सने लोकांना किमान दीड महिन्यासाठी का होईना हॉटस्टार घ्यायला लावलं. त्यातच गेल्या काही काळात आलेल्या सेक्रेड गेम्स, स्ट्रेंजर थिंग्स यांच्यासारख्या सिरीजने लोकांना नेटफ्लिक्स वेबसिरीजकडेसुद्धा मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले आहे राव!! नेटफ्लिक्स पहिल्या महिन्याला फ्री मध्ये चालते हे तुम्हाला माहीत असेलच.  पण नंतरचे प्लॅन्स काही स्वस्त नाहीत हो.  आणि हेच तर दुखणे आहे राव!! भारी भारी सिनेमे, सीरिज तर पाहायच्या आहेत पण खिशाला एवढी कात्री लावायची ईच्छा पण होत नाही. अशा गोंधळात अडकलेल्या लोकांसाठी नेटफ्लिक्स भन्नाट प्लॅन घेऊन आली आहे राव!!

नेटफ्लिक्सने दरमहा १९९रुपये वाला एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. कंपनीने या प्लॅनचे नाव ग- मोबाईल ठेवले आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त SD क्वालिटीचे व्हिडीओ पाहायला मिळणार आहेत. आणि या प्लॅनचा वापर फक्त एका स्क्रीन करता येणार आहे राव!! या १९९रुपये वाल्या प्लॅनचा वापर करत असताना याला तुम्ही TV वर कास्ट नाही करू शकत. 

मंडळी, आधी बातमी अशी होती की कंपनी भारतीय ग्राहकांसाठी आठवड्याचा प्लॅन घेऊन येणार आहे. पण आता कंपनीने १९९रुपयेला प्लॅन जाहीर करून महिन्याचा प्लॅनच राहील हे स्पष्ट केले आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे तो जुन्या आणि कमी क्वालिटीच्या स्मार्टफोन्सवर सुद्धा चालणार आहे. पण याला फक्त 480p च्या SD क्वालिटीवर बघता येणार आहे.

मंडळी, नेटफ्लिक्सचे जगभरात सर्वाधिक ग्राहक भारतात आहेत. त्यांच्यासाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. म्हणूनच भारतीय मनाचा ठाव घेऊन ते सिरीज निर्माण करण्यावर भर देत असतात. आता त्यांनी त्यांचा बिजनेस प्लॅनसुद्धा भारतीयांना परवडेल अशा स्वरूपात बनवायला सुरुवात केली आहे. नेटफ्लिक्स भारतात सुरू झाले त्यावेळी त्याची किंमत किमान ५५० रुपये महिना होती. त्याकाळी सर्वाधिक महाग ऑनलाइन प्लॅटफॉर्म अशी नेटफ्लिक्सची ओळख होती. पण आता नेटफ्लिक्स हळूहळू लवचिक होत आहे राव!!

या प्लॅनचा फायदा लहान शहरातल्या लोकांना जास्त करून होणार आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत आहेत. आता लहान शहरांमध्ये सुद्धा वेबसिरीजचे वारे घुसले आहे. तेच ओळखून नेटफ्लिक्सने हा प्लॅन मार्केटमध्ये आणला आहे. नेटफ्लिक्सची प्रतिस्पर्धी कंपनी असलेली अमेझॉन प्राईम पण असा काही प्लॅन आणेल असे तुम्हांला वाटते का? 

पण आता अंदरकी बात सांगू का? आपल्या देसी लोकांकडे सगळ्याच गोष्टींचे भारी जुगाड असतात. आता नेटफ्लिक्सचा सगळ्यात महाग प्लॅन आहे  ८००रुपये दरमहाचा. यात HD क्वालिटी व्हिडिओ, एकाच वेळेला चार स्क्रीन्सवर पाहता येतो, कोणत्याही डिव्हाईसवरती पाहता येतो आणि आपल्याला हवे तर व्हिडिओ डाऊनलोड पण करता येतात. असा हा प्लॅन घेऊन तो चौघांत शेअर केला तर म्हणजे महिन्याचे २००च रुपये पडतील ना राव!! वर क्वालिटीही भन्नाट!!

काय म्हणता मग? चौघांत शेअर करायचा ८००रुपये महिनावाला प्लॅन घेणार की फक्त मोबाईलवर चालणारा १९९रुपयेवाला गो-मोबाईल घेणार?