computer

ॲव्हेंजर्स सिरीज संपली म्हणून हळहळताय ? हे घ्या आगामी ७ सुपरहिरो सिनेमे !!

मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी ॲव्हेंजर्स एंडगेम पाहिला असेल. तब्बल २० सिनेमे आणि १० वर्षांचा प्रवास संपला.  अनेकांना मार्व्हलच्या सिनेमांनी अक्षरशः वेड लावले होते. ३ तासांच्या शेवटच्या सिनेमाने अनेकांना रडू कोसळले. कित्येकांना हे संपूच नये असे वाटत होते. नाही का?

पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! मंडळी, 'आयर्न-मॅन'पासून सुरू झालेला प्रवास एंडगेमने संपला असला तरी येत्या काही काळात मार्व्हलचे तब्बल सात सिनेमे येत आहेत. 

तर कोणकोणते सिनेमे येणाऱ्या काळात रिलीज होणार आहेत बघू या.

1) स्पायडरमॅन फार फ्रॉम होम

स्पायडरमॅन होमकमिंगचा सीक्वल असणारा स्पायडरमॅन फार फ्रॉम होम २ जुलै २०१९ ला रिलीज होत आहे. हा सिनेमा एंडगेमनंतर मार्व्हलचा पहिला सिनेमा असणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आधीच रिलीज करण्यात आलाय. पीटर पार्करचीच कथा पुढे दाखवण्यात येणार आहे. पण यात एंडगेम आधीची स्टोरी असेल की एंडगेम नंतरची, हे मात्र समजत नाही. स्पायडरमॅन फार फ्रॉम होम मार्व्हल सिनेमेटिक यूनिवर्सच्या तिसऱ्या फेजमधला शेवटचा चित्रपट असणार आहे. 

2) ब्लॅक पँथर २

मार्व्हल पिक्चर्समधला ब्लॅक पँथर हा एकमेव सिनेमा ऑस्करच्या बेस्ट पिक्चरसाठी नामांकित झाला होता. हाच ब्लॅक पँथर त्याच्या सिक्वलमधून पुन्हा आपल्या भेटीसाठी येत आहे. हॉलीवूड मीडियाच्या म्हणण्यानुसार डायरेक्टर रायन कुगलर या सिनेमाला डायरेक्ट करणार आहेत. मात्र, अजून या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

3) डॉक्टर स्ट्रेंज २

बेनेडिक्ट कंबरबॅक आपल्या अफलातून अभिनयातून पुन्हा एकदा डॉक्टर स्ट्रेंज साकारणार आहे. डॉक्टर स्ट्रेंजचा सीक्वल येतोय आणि डायरेक्टर स्कॉट डेरिक्सन पुन्हा एकदा कमबॅक करायला सज्ज झाले आहेत.

4) गार्डियन्स ऑफ गॅॅलक्सी व्हॉल्यूम ३

२०१८ साली आधीच्या दोन्ही सिनेमांचे डायरेक्टर असलेल्या जेम्स गन यांना त्यांच्या लहान मुलांच्या लैंगिक शोषण आणि रेपबद्दलच्या आक्षेपार्ह ट्विट्समुळे काढून टाकण्यात आले होते. तर आता पुन्हा त्यांना मार्व्हलने गार्डियन ऑफ गैलक्सीच्या वॉल्यूम ३ साठी बोलावून घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमाचं शूटिंग २०२१ ला सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. तर मंडळी तुम्हाला पुन्हा गृट आणि रॉकेटची धमाल पाहण्यासाठी अजुन २ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 

5) ब्लॅक विडो प्रीक्वल

मंडळी, ब्लॅक विडोला तिच्या स्वतःच्या सिनेमात पाहण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. या सिनेमात स्कारलेट जॉन्सन तिचा अव्हेंजर्समधला रोल आणि आधीची स्टोरी उलगडून सांगणार आहे. असे सांगण्यात येत आहे की या सिनेमाचे डायरेक्शन केट शार्टलँड हे करणार आहेत आणि तेच नताशा रोमानोफची पूर्ण स्टोरी सांगणार आहेत. रशियन हेर असलेली नताशा कशी अमेरिकन हेरगिरी करणारी संस्था  शील्डसाठी काम करू लागते याची फुल्टू स्टोरी आपल्याला या सिनेमात कळणार आहे. मित्रांनो, ब्लॅक विडोचा हा अवतार रोमांचक असणार आहे.

6) शांग ची

हा मार्व्हलचा एशियन हिरो असलेला पहिला चित्रपट असणार आहे. स्वतःचे असंख्य डुप्लीकेटस तयार करू शकणाऱ्या मार्शल आर्टमधला मास्टर असलेल्या मुलाची ही स्टोरी असणार आहे.  डायरेक्टर डेस्टिन क्रेटन कॅप्टन मार्व्हल ब्री लार्सन सोबत याआधी काम केले आहे. तेच हा चित्रपट डायरेक्ट करणार आहेत. 

7) द इटर्नल्स

हा मार्व्हलच्या इतिहासातल्या अनेक रोमांचक प्रकल्पांपैकी एक असणार आहे.  स्वर्गीय शक्तींद्वारा निर्माण झालेल्या  द इटर्नल्सची स्टोरी हा सिनेमा सांगणार आहे. त्यांच्याकडे एलियन्ससारख्या दैवी शक्ती असतील आणि ते वाईट लोकांकडून चांगल्या लोकांचे रक्षण करतील. या सिनेमात मुख्या भूमिकेत हॉलीवूड सुपरस्टार अँजेलीना जोली असणार असल्याचे सांगितले जात आहे. 

तर मित्रांनो, मार्व्हलच्या अद्भुत दुनियेची सफर करण्यासाठी तुम्ही तयार झाले असणार. पण एकटे सफर करून मजा थोडी आहे मंडळी! या रोमांचक सफरीची माहिती तुमच्या मित्रांना पण असायला नको का? चला तर मग, तुमच्या मित्रांना पण मार्व्हलच्या येणाऱ्या सिनेमांबद्दल सांगा आणि मार्व्हलच्या रंगतदार दुनियेची सफर करा...