महाराणीचा महाल व्हिला व्हिएन्ना, नरिमन दुबाश ते शाहरुखची मन्नत!! या आलिशान घराचा इतिहास तर जाणून घ्या!
शाहरुख खान हा बॉलिवूड सुपरस्टार जगभर प्रसिद्ध आहे. पण शाहरुख इतकाच प्रसिद्ध त्याचा बंगला देखील आहे. मुंबईत गेले म्हणजे शाहरुखचे फॅन त्याच्या बंगल्याबाहेर सेल्फी घेतल्याशिवाय राहत नाहीत. शाहरुखचा मन्नत हा मुंबईमधील बंगला किती आलिशान आहे याबद्दल आजवर अनेक ठिकाणी तुम्ही वाचले असेल, पण हा मन्नत बंगला शाहरुखने बांधलेला नाही. या बंगल्याची कहाणी रंजक आहे.
हा बंगला मूळचा हिमाचल प्रदेशातल्या मंडीचे राजे बिजय सेन (१८४६-१९०२) यांनी आपल्या महाराणीसाठी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला होता. त्याचे नाव होतं विला व्हिएन्ना. पुढे १९१५मध्ये हा विला व्हिएन्ना मानेकजी बाटलीवाला यांना विकण्यात आला. हे मानेकजी केकू गांधी प्रसिद्ध गॅलरिस्ट केकू गांधी (Keckoo Gandhi) यांच्या आईचे बाबा. नाना बाटलीवाला कर्जात बुडाले होते. त्यांनी व्हिला व्हिएन्ना कर्ज चुकवण्यासाठी बहिणीला विकला. या बहिणीला बाळ नव्हते म्हणून तिने तो बंगला दुसऱ्या बहिणीच्या मुलाला, म्हणजे नरिमन दुबाश यांना भेट म्हणून दिला.
हे नरिमन दुबाश मोठे उद्योगपती होते, गोदरेजमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते. शाहरुख खान जेव्हा १९९७ साली येस बॉस हा सिनेमाचे शूटिंग करत होता. त्यावेळी त्याने या व्हिला व्हिएन्ना बद्दल ऐकले. त्याच्या मनात हे घर घ्यायचे पक्के झाले होते. त्याला त्यावेळी पैशांची अडचण होती की इतर कारण होते हे माहीत नाही, पण त्याने २००१ साली नरिमन दुबाश यांची हे घर घेण्यासाठी भेट घेतली. नरिमन दुबाश यांनी एकाच भेटीत शाहरुखला घर विकले असे झाले नाही. शाहरुखला दुबाश यांची प्रचंड मनधरणी करून त्यांच्या अटी मान्य करून मगच हे घर स्वतःच्या नावे करता आले. शाहरुखने घर त्यावेळी १३.३२ कोटी रुपये देऊन अधिकृतपणे विकत घेतले आहे. आज मात्र या घराची किंमत २०० कोटींच्या घरात आहे.
सुरुवातीला या घराचे नाव जन्नत ठेवावे असे शाहरुखच्या मनात होते, पण या घरात आल्यावर आपली सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली असे म्हणत शाहरुखने घराचे नाव मन्नत असे ठेवले. २००५ पासून व्हिला व्हिएन्ना हा बंगला मन्नत या नावाने ओळखला जात आहे. १९२० च्या काळातील हे घर इटालियन आर्किटेक्चरचे अफलातून उदाहरण म्हणून ओळखले जात असे. शाहरुखने हे घर घेतल्यावर त्याची इंटिरियर डिझायनर बायको आणि आर्किटेक्ट कैफ फाकी या दोघांनी मिळून नंतर या घराच्या सौंदर्यात बरीच भर घातली आहे.
मन्नतमध्ये सुंदर बेडरूम्सबरोबर बॉक्सिंग रिंग, टेनिस कोर्ट, आलिशान पूल आहे. याच सोबत या घरात अनेक महाग गोष्टी आहेत. यात सुभाष अवचट यांच्या रेक्लायनिंग क्लाऊन ही भव्य पेंटिंग, राधा कृष्णची मार्बल कलाकृती तसेच विविध देशांतून आणलेल्या अनेक कलाकृती तिथे आहेत.
शाहरुख आपल्या अनेक मुलाखतीत सांगतो की घर या गोष्टीचे त्याच्या आयुष्यात वेगळे स्थान आहे. कदाचित याचसाठी त्याने स्वतःचे घर इतके आलिशान बनवले असावे.
उदय पाटील




