computer

विषकन्या ते हनी ट्रॅप : एक प्रवास (भाग -३ अंतिम)

काळ बदलत गेला आणि उच्चपदस्थांसाठी खास कार्यरत असणारा हनी ट्रॅप आता सर्वसामान्यांना लुबाडण्यासाठी विविध मार्गाने वापरला जाऊ लागला. सोशल मीडिया
नावाच्या भुताने झपाटलेले बरेच लोक आपल्या संपूर्ण आयुष्याचा रंगपट उघडून बसलेली होतीच. सकाळी उठल्यावर काय खाल्ले त्यापासून ते दिवाळी खरेदी आणि ख्रिसमस ट्रीपचे वेळापत्रक सार्वजनिक करतच होती. नवी गाडी, नवी ज्वेलरी मिरवली जात होती. प्रत्येक दिवशी आज आपला मूड कसा आहे हे सांगण्याची देखील स्पर्धा चालू होती. साता समुद्रापार बसलेला माणूस तुमच्या शेजारच्याला नसेल येवढी तुमच्या बद्दलची माहिती बाळगून राहायला लागला होता. प्रत्यक्ष न भेटता तुम्हाला सापळ्यात ओढण्याचा खेळ सुरू झाला.
 

ट्रॅप पहिला -भावनेला हात घालणे

सदाभाऊ साधारण ६५ वयाच्या आसपासचे विधुर. एका मोठ्या कंपनीतून रिटायर्ड झालेले. मुलगा आणि सून अमेरिकेत वास्तव्याला. सदाभाऊंचे विरंगुळ्याचे साधन म्हणजे सोशल मीडिया आणि संध्याकाळी सोसायटीतल्या मित्रांचा अड्डा. सदाभाऊ काय लेखक किंवा शब्दांचे जादूगार नव्हते. त्यामुळे आवडलेली एखादी पोस्ट कधीतरी आपल्या फेसबुकच्या भिंतीवर फॉरवर्ड करणे हेच काय ते त्यांचे काम. एके दिवशी अशीच एक पोस्ट शेअर केली आणि कोणा सुकन्याचा मेसेज त्यांना मिळाला. ’काका तुम्ही किती छान पोस्ट शेअर करता हो. मन एकदम प्रसन्न होऊन जाते.’ पुन्हा चार दिवसांनी अशाच आशयाचा मेसेज हजर. आता निवांत वेळ हातात असलेल्या सदाभाऊंनी ह्या सुकन्याचे प्रोफाइल तपासले. मुलगी मुंबईची होती आणि सध्या लंडनला शिकत होती. प्रोफाइल वरून अगदी उत्साही आणि निरागस वाटत होती. पुढे मग तिच्या मेसेजेसला सदाभाऊंचे उत्तर जायला लागले. मग चार पाच दिवसातून होणारा एखादा मेसेज लांब राहिला आणि दिवसाला चार पाच मेसेज होऊ
लागले. मग प्रकरण व्हॉट्सऍपवर शिफ्ट झाले. ’अहो काका’चे अरे ’सदा काका’ झाले. पोरीच्या लोभस स्वभावाने सदाभाऊ सुद्धा अगदी तिच्यात मुलीसारखे गुंतले होते.
अशातच अचानक सुकन्या एकदम गायब झाली. गायब म्हणजे संपर्क नाही, मेसेजला उत्तर नाही, व्हॉट्सऍप कॉल उचलणे नाही. सदाभाऊ प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांना काय करावे सुचेना.अशातच एकदा त्यांनी पुन्हा फोन लावला आणि तो चक्क उचलला गेला. सुकन्याची मैत्रीण फोनवर होती. सुकन्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले आणि सदाभाऊंना धक्काच बसला. दोन चार दिवसात स्वतः सुकन्याने फोन केला आणि माफीमागितली. सदाभाऊ आधी तिच्यावर संतापले, असे करण्याचे कारण विचारले. तिने रडत रडत सांगितले की, कॉलेजने ह्या आणि पुढच्या टर्मची फी एकदम भरायला सांगितली आहे आणि ती देखील वाढवली आहे. नुकतीच वडिलांची हार्ट सर्जरी झाली आहे, त्यात शैक्षणिक कर्ज काढलेले आहे. तिचे भविष्यच उद्ध्वस्त झाले आहे. क्षणाचाही विचार न करता सदाभाऊंनी तिच्याकडून बँक डिटेल्स मागवले आणि दोन लाख रुपये ट्रान्स्फर दिले. आणि मग दरवेळी एक नवी अडचण आणि सदाभाऊंची मदत हे सत्र सुरू झाले. एक दिवस
सदाभाऊंच्या मुलाने सहज त्यांचे बँक खाते तपासले आणि त्याला धक्काच बसला सदाभाऊंनी जवळपास २४ लाखाची रक्कम सुकन्याला दिलेली होती.
अर्थातच, पुढे संशय आल्याचे लक्षात आल्यावर सुकन्याचे खाते बंद झाले, नंबर बंद झाला आणि सुकन्या देखील हवेत विरली.
प्रत्येकवेळी मैत्रीण अथवा प्रेयसी बनून हनी ट्रॅप लावला जातो असे थोडेच आहे?

ट्रॅप दुसरा - एकाकीपणा हेरणे

रजत एका छोट्या आयटी कंपनीत कामाला. दिसायला काही विशेष नव्हता, त्यात केस अकाली गळायला लागलेले. अभ्यास, खेळ अशा कुठल्याच गोष्टीत तो फारसा शार्प नव्हता. अर्थात मित्र मंडळ कमी आणि त्याला थट्टेचा विषय बनवणारे जास्त. फेसबुकवर ही बरेचदा त्याचे एखादं दोन ओळीतले लिखाण अथवा फॉरवर्ड केलेली पोस्ट ही टिंगलीचा विषय होणार हे नक्की. पण दुसरा विरंगुळा तरी आयुष्यात काय होता? मूक वाचक बनून राहायला लागला. काही दिवसात एका मुलीचा मेसेज आला. ’तुम्ही आजकाल लिहीत का नाही? मिस करते आहे तुमचे लिखाण.’ पोरीच्या प्रोफाइलवर गुलाबाचा डिपी. कोण मुलगी आहे का कोणी थट्टा करत आहे कळेना. पण आयुष्यात पहिल्यांदा कोणी तरी केलेले कौतुक, वाचकाचा पहिला वाहिला मेसेज, त्यातही स्त्रीचा. रजतची कळी जरा खुलली. मग दोन चार मेसेजेसची देवाण घेवाण झाली आणि ती बहुदा ऑफलाईन गेली. पुढे सहा सात दिवस हा नुसता अधीर पण पोरगी गायब. मग एके दिवशी पुन्हा तिचा मेसेज पुन्हा थोडे फार
संभाषण. एक महिन्यात मग हे संभाषण रोजच्या रोज गप्पांवर आले. तिने तिचे नाव रेखा सांगितले. मग ह्याने फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली तर ती मात्र तिने स्वीकारली नाही. तिला ह्यापूर्वी फेसबुकवर काही अत्यंत वाईट अनुभव आले होते त्यामुळे ती लगेच विश्वास ठेवायला तयार नव्हती. त्यालाही ते पटले. काही दिवसांच्या संभाषणानंतर मग एक दिवस खुद्द तिनेच फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली. आता संभाषण थोडे खाजगीकडे झुकायला लागले. घरात कोण आहे, फ्यूचर प्लॅन्स काय आहेत ? त्यासाठी सेव्हिंग किती केली आहे अशा चर्चा रंगायला लागल्या. मग नंबरची देवाण घेवाण, व्हॉट्सऍप अशी पायरी चढली गेली. व्हॉट्सऍपचे संभाषण थोडे रोमॅंटिक व्हायला सुरू झाली आणि एक दिवशी तिने चक्क व्हिडिओ कॉलची मागणी केली. तिला पाहून तो थक्कच झाला. काय सुंदर रूप होते. मग काही दिवसांनी संभाषणात अश्लीलतेच्या मर्यादा पार
व्हायला लागल्या. तिने आपले काही अश्लील व्हिडिओ रजतला पाठवले अन बदल्यात रजतने पण तेच केले. फक्त बेभान झालेल्या रजतच्या लक्षात एक गोष्ट आली नाही की, त्याच्या व्हिडिओत तो संपूर्ण दिसायचा, मात्र तिच्या व्हिडिओत तिचा चेहरा कधी फारसा दिसलाच नाही. शेवटी व्हायचे तेच झाले. एक दिवस अनोळखी नंबरवरून त्याला त्याचाच नग्न व्हिडिओ पाठवण्यात आला आणि तो व्हायरल करायची, नातेवाइकांना पाठवण्याची धमकीदेऊन लुबाडणुकीचे सत्र सुरू झाले. त्याच्या सेव्हिंगचा अंदाज घेतला आधी गेला होताच.

 

ट्रॅप तिसरा - लग्न

स्नेहाने वयाची ३४ पार केली होती. लग्नाचे अजून कुठे काही जुळत नव्हते. ती दिसायला तशी सामान्य, मात्र हुशार आणि कर्तबगार. एका मोठ्या फर्ममध्ये कामाला होती.
बर्‍यापैकी पैसा राखून होती. अशातच एका मॅट्रोमनी वेबसाइटवर तिची आणि संजयची ओळख झाली. संजय विधुर होता आणि दुबईत एक फर्म चालवत होता. दुसरे लग्न करायचे होते पण भारतीय मुलीशीच करायचे असे त्याने ठरवले होते. संभाषण वाढत गेले, एकमेकांबद्दल अधिक माहिती होत गेली आणि दोघेही एकमेकांच्यात गुंतले. संजयने तिला भेटण्यासाठी खास भारत दौरा आखला. स्नेहा आनंदाने जणू वेडी झाली होती. संजय आला तो दिवस तिला अक्षरशः स्वर्गसुखासारखा वाटला. मूव्ही, शॉपिंग आणि जेवण झाल्यावर संजयने त्याच्या हॉटेल रूममध्ये जाऊन वाइन घ्यायचा आग्रह केला आणि ती नाही म्हणू शकली नाही. त्यानंतर रात्रभर जे काही घडले त्यावर मग तिचाही ताबा राहिला नाही. शेवटी आपला होणारा नवरा तर आहे.. हाच तो घात करून गेलेला विचार. दोन दिवसांनी संजय परत गेला आणि त्याचा नंबर कायमचा बंद झाला आणि प्रोफाइल देखील गायब झाले. आणि मग जो अनुभव रजतचा तोच अनुभव स्नेहाचा..
हे सर्व अनुभव आपण अनेकदा वाचलेले असतात, पेपरात रोज अशा गुन्ह्यांच्या बातम्या ठळकपणे येत असतात. मात्र, हे सर्व वाचून, पाहून त्याच्या परिणामांची माहिती कळल्यावर देखील आपण बदललेलो आहोत का? आपला सोशल मीडियावरचा आपला वावर आपण अधिक सुरक्षित केला आहे का? अनोळखी लोकांशी संवाद साधताना आपण सावध राहायला लागलो आहोत का? आजही अनोळखी नंबरवरून येणारे व्हॉट्सऍप कॉल, व्हिडिओ कॉल आपण बेफिकीरपणे रिसीव्ह तर करत नाही ना? हे सगळे प्रश्न प्रत्येकाने पुन्हा एकदा स्वतःला विचारायला हवे आहेत!
-प्रसाद ताम्हनकर

सबस्क्राईब करा

* indicates required