एक राजा, एक ब्रिटिश, आणि एक राजज्योतिषी -१

ह्या लेखाचे शीर्षक आहे - एक राजा, एक ब्रिटिश, आणि एक राजज्योतिषी.त्यातला एक ब्रिटिश म्हणजे हे ’कन्फेशन्स ऑफ अ ठग’ कादंबरीचे लेखक मेडोज टेलर.ह्या मेडोज टेलरचा थेट संबंध एका भारतीय संस्थानाच्या राजाशी आला.त्या राजाचे वय होते ८ वर्षांचे. शाळकरी वय. योगायोगाने ह्या बालराजाची कुंडली म्हणजे होरोस्कोप मेडोज टेलरच्या हाती आला.त्यात एक भयंकर ज्योतिष राजज्योतिषाने वर्तविले होते.त्या कुंडलीतल्या ग्रहांवरून वर्तविलेले ते फलादेश टेलरच्या कानावर घालण्यात आले. हे भविष्य प्रकरण म्हणजे एक राजगुपित होते.फक्त त्या राजाची विधवा आई आणि ती कुंडली ज्याने तयार केली होती तो राजज्योतिषी, ह्या दोघांनाच त्याविषयी माहीत होते. राजा लहान असल्याने त्याला ते भविष्य सांगता येणे शक्य आणि इष्ट असे दोन्ही नव्हते.मात्र, मृत्युशय्येवर असल्याचा भास झाल्यानंतर एका विशिष्ट क्षणी राजाच्या आईने ते भविष्य त्या राजज्योतिषाच्या उपस्थितीत टेलरला सांगितले.एवढेच नव्हे, तर ती कुंडलीही मेडोज टेलरच्या हाती दिली. राणी (राजाची आई), राजज्योतिषी आणि मेडोज टेलर अशा तिघांच्या सही-शिक्क्यांनी ती कुंडली सील करण्यात आली आणि ती मेडोज टेलरने सांभाळावी असे ठरले. ही घटना १८८४ मधली. राजाचे वय तेव्हा फक्त ९ वर्षांचे होते. भारतातला हा संस्थानिक राजा कोण, आणि त्याचे ते भयंकर भविष्य नेमके काय होते, हा तपशील आपण ह्या लेखाच्या पुढल्या टप्प्यावर विस्ताराने पाहू. पण, त्या अगोदर हा ’एक ब्रिटिश’ मेडोज टेलर नेमका कोण होता, ते समजून घ्यावे लागेल. जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना मेडोज टेलरबद्दल सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र, इतरांना ते सांगणे गरजेचे आहे. कारण, मेडोज टेलर हे नाव एव्हाना इतिहासाच्या ढिगार्यात विस्मृतीत पार तळाशी गेले आहे. राजा आणि ज्योतिष ह्या सत्यकथेचा पाया मेडोज टेलरच्या व्यक्तिमत्त्वाशी बांधला गेलेला आहे.

सामान्यतः त्या काळातील ब्रिटिश मंडळी भारतीय ज्योतिषशास्त्राची,भविष्य वर्तविणार्या ज्योतिषांची टवाळी करीत.ती टवाळी केवळ बोली संवादातच असे, असे नाही. ज्या ज्या वेळी विषय आला त्या त्या वेळी इंग्रज लेखकांनी आपल्या पुस्तकांमध्ये वा लेखनामध्ये ज्योतिषाची पुरेपूर चेष्टा केल्याचे दिसेल.मेडोज टेलर हा त्याला अपवाद म्हणावा लागेल. या संदर्भात टेलरने आपल्या आत्मचरित्रातही लिहिले आहे. त्या राजाच्या कुंडलीची सत्यकथा बाजूस ठेवा, खुद्द टेलरला एकदा एक ज्योतिषी तुळजापूरजवळ भेटला. तो मराठी भाषिक होता.त्याने टेलरची कुंडली तयार केली, आणि टेलरला त्याचे भविष्यही सांगितले.पण तो विषय वेगळा.इथे मुद्दा टेलरच्या भविष्याचा नसून त्या राजाच्या कुंडलीतील भयंकर योगाचा, आणि टेलर त्या कुंडलीशी कसा निगडित झाला होता ह्या सत्यकथेचा आहे.
लेखक- माधव शिरवळकर