computer

वाचा ये रे घना गाण्याची जन्मकथा !! या अजरामर गाण्याचे कवी आरती प्रभूंच्या पुण्यतिथी निमित्ताने

आज २६ एप्रिल ! आज आरती प्रभू या नावाने परिचित असलेल्या चिं. त्र्यं. खानोलकर यांची पुण्यतिथी आहे. आरती प्रभू यांचे नाव मनात आल्यावर अनेक गाणी मनात वाजायला सुरुवात होते. कसे कसे हसायचे, कोणाच्या खांद्यावर, समईच्या शुभ्र कळ्या, गेले द्यायचे रहून, ती येते आणिक जाते, नाही कशी म्हणू तुला, लवलव करी पातं अशी अनेक गाणी आठवतात पण या सगळ्या गीतात सगळ्यांनाच आवडणारे गाणे आणि आजच्या भाषेत सांगायचं तर सगळ्यात 'व्हायरल' झालेलं गाणं  म्हणजे

ये रे घना, ये रे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना

या गाण्याच्या निर्मितीमागे एक कहाणी आहे जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आरती प्रभूंच्या १९६९ सालच्या 'दिवेलागण' या संग्रहातील ही एक कविता आहे. हृदयनाथ मंगेशकरांनी या गाण्याला चाल दिली. सगळी काही तयारी झाली पण...हा पण म्हणजे एक मोठी समस्या होती.

'दिवेलागण' या कवितासंग्रहात या कवितेच्या ज्या ओळी होत्या त्या गाणं ध्वनीमुद्रीत करण्यासाठी अपुर्‍या होत्या. गाण्याचा मुखडा आणि एक कडवे इतकाच ऐवज त्या कवितेत होता. पुढे आणखी दोन कडवी असणे आवश्यकच होते.

मूळ कविता अशी होती.

ये रे घना,
ये रे घना,
न्हाऊ घाल
माझ्या मना
फुले माझी
अळुमाळू,
वारा बघे
चुरगळू
नको-नको
म्हणताना,
गंध गेला
राना-वना

(हृदयनाथ मंगेशकर)

गाणं बांधून तयार पण पुढचा अंतराच नाही. ही एक विचित्र समस्याच होती. त्यानंतर खानोलकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यात चर्चा सुरु झाली. खानोलकर म्हणाले मी प्रयत्न करतो. मध्यंतरात बरेच दिवस गेले. खानोलकरांकडून पुढचे कडवे मिळालेच नाही. जर पुढचे कडवे नाही तर हे गाणे होणार नाही. हे गाणे नाही तर रेकॉर्डची दुसरी बाजू कोरीच राहणार. असे कधीच होत नाही. खानोलकरांचा स्वभाव लक्षात घेता त्यांच्यावर एखादी सक्ती करणे म्हणजे गाणे पूर्ण करण्याचे सर्व दरवाजे बंद करणे. आता काय करायचे ?

त्यानंतर हृदयनाथ मंगेशकरांनी खानोलकरांना म्हटले की उरलेले कडवे ते लिहिणार नसतील तर दुसर्‍या एखाद्या कविने लिहिलेले चालेल का ? खानोलकरांनी या प्रस्तावाला होकार दिला. त्यानंतर या कवितेचा मूळ भाव, कवितेची शैली, त्यातले आर्त हुबेहुब पुढच्या दोन कडव्यात कोण लिहू शकेल याचा शोध सुरु झाला. बर्‍याच विचारानंतर एकच नाव समोर येत गेले, ते म्हणजे कवयित्री शांताबाई शेळके यांचे ! शांताबाईंना विचारल्यानंतर त्यांनी आढेवेढे न घेता आणखी दोन कडवी लिहिण्याची तयारी दर्शवली.

(शांताबाई शेळके)

त्यानुसार एक बैठक निश्चित करण्यात आली. या बैठकीत खानोलकर - हृदयनाथ-शांताबाई एकत्र बसले. काही वेळ मूळ कवितेवर चर्चा झाली. हृदयनाथ आणि शांताबाईंनी पुन्हा एकदा खानोलकरांना लिहून बघण्याचा आग्रह केला. पण एकदा कविता लिहून झाल्यवार आता त्यात भर टाकणं जमणार नाही असं खानोलकरांनी म्हटल्यावर शांताबाईंनी समोर पडलेला एक कोरा कागद घेतला. एखाद्या बसच्या तिकीटामागे ज्या सहजतेने आपण टेलीफोन नंबर लिहितो त्याच सहजतेने शांताबाईंनी दोन कडवी लिहिली. खानोलकरांनी वाचल्यावर त्यांनीही त्वरीत होकार दिला. झालं, या बैठकीचा उद्देश सफल झाला. हृदयनाथ मंगेशकर पुढची चाल बांधायला मोकळे झाले. बैठक संपली शांताबाई घरी जायला निघाल्या आणि खानोलकर म्हणाले थांबा मीच लिहितो उरलेली कडवी आणि त्यांनी त्याच कागदावर पुढची कडवी लिहून दिली.

टाकुनिया
घरदार
नाचणार,
नाचणार
नको-नको
म्हणताना
मनमोर
भर राना
नको-नको
किती म्हणू,
वाजणार
दूर वेणू
बोलावतो
सोसाट्याचा
वारा मला
रसपाना
ये रे घना,
ये रे घना,
न्हाऊ घाल
माझ्या मना

या गाण्याच्या लोकप्रियतेबद्दल आम्ही काही लिहावे असे काहीच नाही. आज खानोलकरांच्या पुण्यतिथी निमित्त आठवले ते या 'बोभाटा'च्या वाचकांना दिले आहे इतकेच आमचे श्रेय आहे.

आरती प्रभूंची इतर अनेक गाणी लोकप्रिय आहेत. तुमच्या आवडीचे कोणते हे कमेंटमध्ये नक्की सांगा

सबस्क्राईब करा

* indicates required