computer

पैसे धुवायचा धोबीघाट ? मनी लॉंडरिंग म्हणजे काय ?

मनी लॉंडरिंग हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला/वाचला असेल. बेकायदेशीर मार्गाने कमावलेल्या पैशाला कायदेशीर अखत्यारीत आणणे म्हणजे मनी लॉंडरिंग करणे. पण, तरीही लॉंडरिंगचा म्हणजे धुवून काढण्याचा  आणि पैशाचा काय संबंध असा विचार तुमच्याही मनाला शिवलाच असेल. काळा पैसा, पांढरा करण्याच्या या कृतिशी हाच शब्द का जोडला गेला असेल? तुम्ही कधी विचार केलाय का?


 

२० शतकात पहिल्यांदा मनी लॉंडरिंग हा शब्द वापरात आला. मनी लॉंडरिंग म्हणजेच पैसा धुणे. हा मनी लॉंडरिंगचा शब्दश: अर्थ दर्शवणारी एक कृती त्याकाळी अमेरिकन सरकारने अंमलात आणली होती. सर्वात जास्त मळली जाणारी वस्तू म्हणजे पैसा. कारण, हा पैसा एका दिवसात किती लोकांच्या हातातून फिरतो याला काही मोजमाप नाही आणि अशा अनेकांच्या हातातून पुढे गेलेला पैसा म्हणजे नोटा घाण तर होणारच. नव्या नोटा छापण्यापेक्षा अशा मळलेल्या नोटा स्वच्छ करून पुन्हा वापरत आणल्या जाऊ शकतात हे लक्षात आल्यावर अमेरिकन सरकारने नोटा धुण्याचा उपक्रम सुरु केला. १०० नव्या नोटा छापण्यासाठी जिथे १.३० डॉलर खर्च येतो तिथे १०० नोटा धुण्यासाठी फक्त ०.३० डॉलर इतका खर्च येत होता. यासाठी अमेरिकन सरकारने नोटा धुण्याच्या खास मशीन्सही मागवल्या आणि तिथून मनी लॉंडरिंग हा शब्द जन्माला आला. यानंतर काही कारणाने, नोटा धुण्याची ही प्रक्रिया बंद पडली आणि मनी लॉंडरिंग शब्दाला आजाचा प्रचलित अर्थ प्राप्त झाला. पण तो शब्द बेकायदेशीर पैसा कायदेशीर बनवण्याच्या प्रक्रियेशी कसा जोडला गेला हा खरा प्रश्न आहे. 

१९७० साली उजेडात आलेल्या वॉटरगेट स्कॅंडल प्रकरणात पहिल्यांदा अशा प्रकारचा पैसा वापरण्यात आला. तेव्हापासून हा शब्द नव्या अर्थाने प्रचलित झाला. पण त्याही आधी हा शब्द आणि ही प्रक्रिया दोन्हीही अस्तित्वात होते. 

वॉटरगेटच्याही आधी माफीया डॉन अल कॅपोनेने आपला काळा पैसा पांढरा करण्याच्या काही अनोख्या वाटा शोधल्या होत्या. रोजच्या व्यवहारात वापरत असलेला पैसा म्हणजेच ज्याला आपण लिक्विड कॅश म्हणतो अशा पैसाकडे लक्ष देणे तितके सोपे नसते म्हणूनच तर अनेकजण रोख स्वरुपात व्यवहार करून काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करतात. 

कुख्यात अमेरिकन गँगस्टर माफीया डॉन अल कॅपोनेने ही आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी एक भन्नाट कल्पना अंमलात आणली होती. रोजच्या व्यवहारात वापरला जाणारा पैसा ज्याला आपण लिक्विड कॅश म्हणतो, त्याच्या व्यवहाराकडे लक्ष देणे थोडे कठीणच जाते. याच त्रुटीचा फायदा घेत अल  कॅपोनेने आपला पैसा पांढरा करण्यासाठी लॉंडरिंग व्यवसायाचा आधार घेतला आणि तेव्हापासून काळा पैसा पांढरा करण्यासाठीही हा शब्द वापरला जातो. याशिवाय, त्याने बँकिंग, हॉटेल आणि विविध प्रकारच्या उद्योगधंद्यात हा पैसे गुंतवून त्याला कायदेशीररित्या व्यवहारात आणला.  

मनी लॉंडरिंग शब्दाचा हा छोटेखानी  इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मधून जरूर सांगा. 

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required