computer

भारताला पाहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथैय्यांनी साकारलेल्या ११ अजरामर वेषभूषा!!

भानुमती राजोपाध्ये उर्फ भानू अथैय्या!! १९५६ च्या सीआयडीपासून २०१५च्या नागरिक सिनेमापर्यंत ५९ वर्षं रुपेरी पडद्यावर कलाकारांना वस्त्रसाज चढवणाऱ्या वेशभूषाकार!! भारताला पहिलं ऑस्कर मिळवून देणारी व्यक्ती!! त्यांचं काल १५ ऑक्टोबर २०२०ला निधन झालं. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या विशेष गाजलेल्या काही वेषभूषांची यादी आम्ही आज बोभाटाच्या रसिक वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.  तर पाहूया त्यांच्या गाजलेल्या काही वेषभूषा, यांतल्या तुमच्या आवडीच्या कोणत्या हे ही आम्हांला कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. 

१. छोटी बहू

 साहब बिवी और गुलाम हा भारतीय सिनेमातला एक मैलाचा दगड. त्यातली "पिया ऐसो जियामें समायो गयो रे" म्हणणारी छोटी बहू भानूंच्या वेषभूषेने सजली होती. 

२. साधना आणि वक्त

"ऐ मेरी जोहरांजबी" हे गाणं असलेल्या वक्तमधल्या साधनाच्या शिफॉनच्या साड्या आणि इतर पुरुष पात्रांचे कपडेही भानूंनी डिझाईन केले होते. इतर सिनेमांतही साधना भानूंनी डिझाईन केलेले पंजाबी ड्रेसेस आणि चुडिदार वापरत असत. आता पाहताना ते अगदी तंग आणि अक्षरश: अंगावरच शिवल्यासारखे वाटत असले तरी एकेकाळी त्या डिझाईन्स तरुणींमध्ये खूप प्रिय होत्या.

३. गाईड

गाईडबद्दल काय बोलावे? गाणी, कथा, अभिनय, संगीत.. सगळ्या बाबतींत वरचढ असलेला हा सिनेमा रसिकांचा अतिशय लाडका आहे. यातली नायिका-वहिदा रहमान-रोझी ही नर्तिका आहे. तिचा एक एक कॉश्च्युम ही भानूंच्या कामातली विविधता दाखवून देतात. पुन्हा एकदा " पिया तोसे नैना लागे रे" पाहा आणि याची प्रचिती घ्या. फक्त यावेळेस वहिदाचं नृत्य, गाण्याचे बोल आणि संगीतासाठी गाणं न पाहाता वहिदाच्या वेगवेगळ्या वेषभूषाही पाहा.

४. इंडोवेस्टर्न लूक्स्

भानू त्यांच्या भारतीय पारंपारिक वेषभूषांसाठी प्रसिद्ध असल्या तरी त्यांचा पहिला सिनेमा १९५६ मधला सीआयडी आणि नंतर तीसरी मंझिलसाठी सुरैय्या आणि आशा पारेख, हेलनसाठी हॉलीवूड-मीट्स-बॉलीवूड किंवा आज आपण ज्याला इंडोवेस्टर्न म्हणतो तशाप्रकारचे ड्रेसेस डिझाईन केले होते.  याबाबतीतही त्या ट्रेंडसेटर होत्या असं म्हणायला हरकत नाही. विशेषत: तीसरी मंझिलमधले हेलनबाईंचे कॅबरे कॉश्च्युम्सही पाहाच. 

५. आम्रपाली

याबद्दल काय बोलावं? भानूंनी डिझाईन केलेला ड्रेस आजही सिनेमांत शास्त्रीय नृत्यांत सर्रास वापरला जातो, इतर कार्यक्रमांतही तो वापरला जातो. जणू काही अशा प्रकारच्या नृत्यांत हाच ड्रेस घातला पाहिजे असा नियम असावा  इतकं या ड्रेसचं आणि नाचाचं घट्ट समीकरण बनलं आहे. हा ड्रेस डिझाईन करताना भानूंनी अजिंठा लेण्यांमधल्या नर्तकींच्या वेषभूषांचा अभ्यास केला होता आणि तो आम्रपाली या सिनेमासाठी वैजयंतीमालासाठी डिझाईन केला गेला होता. या ड्रेसला आम्रपाली ड्रेस म्हणूनच ओळखलं जातं.

६. मुमताज साडी

आजही रेट्रो लूक म्हटलं की नजरेसमोर येते ती अवखळ मुमताज आणि "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे"गाण्यामधली तिची ही साडी. श्रेय अर्थातच भानू अथय्यांचेच!!

७. मेरा नाम जोकर

राज कपूरचा विदूषक वेष भानूंनीच डिझाईन केला होता. दुर्दैवाने या सिनेमासाठी बनवलेले बरेच कपडे आर. के. स्टुडिओला लागलेल्या आगीत भस्मसात झाले.

८. सिद्धार्थ

हा भानू अथैयांचा पहिला परदेशी प्रोजेक्ट. यात त्यांनी कलाकारांना वेषभूषेतून राजस रुप बहाल केले. 

९. गांधी

सिद्धार्थमधून त्यांना गांधी हा सिनेमा मिळाला. अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी मुख्य आणि इतर सर्व कलाकारांसाठी कपडेपट तयार केला. याचं चीज झालं आणि बेस्ट कॉश्च्युम डिझाईनसाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय व्यक्ती होत्या.

१०. चांदनी

अहाहा. फक्त चांदनी म्हटलं तरी साध्याशा पिवळ्या साडीत अतिशय सुंदर दिसणारी, पांढऱ्या पंजाबी ड्रेसमधली, "मेरे हाथोंमें नौ नौ चूडियाँ है" म्हणणारी अशी श्रीदेवीची किती रुपं आठवली हे सांगा?? ती अशी लक्षात राहायला अर्थातच भानूंच्या वेशभूषाही कारणीभूत आहेत हे विसरून चालणार नाही..

११. लगान

भानूंच्या कामांची यादी खूप मोठी आहे. पण यातला लगान हा वगळता न येण्यासारखा त्यांचा प्रोजेक्ट!! भूजच्या खेड्यांतल्या लोकांपासून ब्रिटिश रेजिमेंटपर्यंत सगळ्या कलाकारांचे वेष त्यांनी डिझाईन केले होते.


कितीही प्रयत्न केले तरी ही यादी परिपूर्ण नसेल ही आमची मर्यादा आणि भानूंची महानता आहे. भानू अथैयांना बोभाटातर्फे श्रद्धांजली!!

सबस्क्राईब करा

* indicates required