computer

भाग ४ - २०२२ सालचे फोर्ब्स 30 under 30!! पाहा या युवापिढीची गरूडझेप!!

आजची तरुण पिढी म्हणजे आळशी आणि फक्त मोबाईलमध्ये घुसलेली असा सूर सगळीकडे ऐकायला मिळतो. मोबाईलमध्ये घुसून गेम्स खेळणे आणि गप्पा मारणे. फोटो ,व्हिडीओ काढणे एवढ्याच गोष्टी मुलं करतात का? खरंतर ही नाण्याची एकच बाजू आहे.आज जग झपाट्याने बदलत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजीचा आविष्कार होत आहे. आजची हुशार तरुणाई शिकून मिळालेल्या संधीचे सोने देखील करत आहे. आपापले कौशल्य दाखवून यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करत आहे. Quick and fast अशी ही पिढी आहे. आपल्या मेहनतीच्या, कल्पकतेच्या जोरावर आपले अस्तित्व सिद्ध करत आहे. म्हणूनच फोर्ब्स इंडियाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. फोर्ब्स 30 under 30 २०२२ची यादी जाहीर झाली आहे. आणि त्यात आपली भारतीय युवकांनी वर्चस्व सिद्ध केले आहे.

आपण या लेखमालिकेद्वारे थोडक्यात त्यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून घेऊया...

अर्णव किशोर, संस्थापक - फायरबोल्ट

सध्याच्या काळात स्मार्टवॉचला खूप मागणी आहे. हीच मागणी ओळखून किशोर आणि त्यांची बहीण आयुषी यांनी २०१९ मध्ये फायरबोल्ट या स्मार्टवॉच आणि ऑडिओ मेकर कंपनीची स्थापना केली. नवे तंत्रज्ञान आणि स्मार्ट लुक याची सांगड घालत या कंपनीने नवनवी घड्याळे आणली. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. फायरबोल्ट सध्या भारताच्या स्मार्टवॉच मार्केटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी ७५ करोडची विक्री झाली असून पुढच्या वर्षी १५० करोडची विक्री होण्याचा अंदाज आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेता विकी कौशल या सेलिब्रिटींनी या ब्रँडचा प्रचार केला आहे.

हर्षित अवस्थी, अहमद फराज आणि सशक्त त्रिपाठी, सहसंस्थापक – कलाम लॅब्स

मेटाव्हर्स ही कल्पना प्रत्यक्षात कशी आहे हे सगळ्यांना येणाऱ्या काळात कळेलच. पण हीच संकल्पना घेऊन ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी, अहमद फराज, सशक्त त्रिपाठी आणि हर्षित अवस्थ हे STEM मेटाव्हर्स तयार करत आहेत. यामध्ये मुलांना अंतराळ आणि डायनासोर यांसारख्या विज्ञान विषयांबद्दल शिकवण्यासाठी लाइव्ह मल्टीप्लेअर गेमिंगचा वापर केला जातो. त्यांना live व्हिडिओ आणि चॅटद्वारे शिक्षकांशी संवादही साधता येतो. सध्या ३०,००० मुले याद्वारे शिकत आहेत. या प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला ही मुले 3 ते 5 तास घालवतात. कलाम लॅब्सला आतापर्यंत गुंतवणूकदारांकडून २० लाखांची कमाई झाली आहे.

जावेद खत्री, - eBikeGo

मुंबईच्या झोपडपट्टीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या खत्रीने के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आणि अतिशय कष्टाने आपले स्वप्न पूर्ण केले. खत्री आणि त्यांची टीम जगातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहन ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत आहे. २०१९ मध्ये त्यांनी यावर काम सुरु केले. तेव्हापासून eBikeGo ने ७० किलोपेक्षा जास्त CO2 उत्सर्जन वाचवले आहे. त्यांनी टाटा, एअरटेल, बजाज इलेक्ट्रिकल्स, इंडिगो पेंट्स आणि ताज हॉटेल्स सारख्या ब्रँड्ससोबत काम केले आहे. जशी जशी इलेक्ट्रोनिक वाहने वाढतील त्यांचे कामही विस्तारणार आहे.

भव्य गोहिल आणि आतुर मेहता, सहसंस्थापक - स्क्वेअर ऑफ

कुठलाही खेळ आवडला की त्यात निष्णात होण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक हवाच. हीच संकल्पना बुद्धिबळ या खेळात भव्य गोहिल आणि आतुर मेहता यांनी आणली. २०१५ मध्ये स्क्वेअर ऑफची स्थापना झाली होती. हा एक स्मार्ट रोबोटिक बुद्धिबळ बोर्ड आहे जो वापरकर्त्यांना प्रत्यक्ष बोर्डवर कुठूनही खेळता येतो. एवढच नाही तो हा खेळ शिकण्यास मदतही करतो. स्क्वेअर ऑफने २०२० पर्यंत २५,००० सेट विकले आहेत. गेल्या वर्षी यातून ३५ लाख कमाई केली आणि पुढील वर्षी हा आकडा दुप्पट होण्याची अपेक्षा आहे

जिज्ञासा लब्रू, सीईओ - स्लॅम आऊट लाऊड

मूळच्या हिमाचल प्रदेशातील असलेल्या जिज्ञासा लब्रूने आपल्या शाळेत असल्यापासूनच अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत स्वयंसेवक म्हणून काम केले. पदव्युत्तर शिक्षणानंतर तिने दिल्लीच्या सरकारी शाळांमधील सहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून टीच फॉर इंडियात फेलो म्हणून काम केले. स्लॅम आउट लाऊड ही एक ना-नफा (ngo)संस्था आहे जी वंचित मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी परफॉर्मन्स आणि व्हिज्युअल आर्ट्सचा वापर करते .मुलांना व्हिज्युअल आर्ट्सद्वारे, आत्मविश्वास, संवाद आणि इतर जीवन कौशल्ये सादर करण्याची करण्याची संधी देते. त्यांनी आतपर्यंत भारतातील चार राज्यांमधील ९०० समुदायांमधील ५०,००० वंचित मुलांना मार्गदर्शन केले आहे. हे काम आता फक्त भारतात नाही तर १९ देशांर्यंत पोहोचले आहे. लाखो वंचित मुले या द्वारे शिकली आहेत आणि सक्षम झाली आहेत.

आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required