computer

जोकर आहे म्हणून बॅटमॅन आहे?? जोकरची खरी कथा एकदाची पडद्यावर येतेय भाऊ!!

जावेद अख्तर यांनी गब्बर सिंग विषयी बोलताना एकदा म्हटलं होतं की “गब्बर सिंग गाजला कारण गब्बर सिंगची मागची स्टोरी कोणालाच माहित नव्हती.” हे खरंही आहे. गब्बर सिंगला कोणताही भावनिक मुलामा नव्हता. तो क्रूर होता आणि बंडखोर होता. लोकांच्या मनातील विकृतीला त्याने अस्तित्वात आणलं. हे सगळं करत असताना त्याच्या मागचं कारण म्हणून कोणतीही भावनिक कथा त्याला चिकटलेली नव्हती.

असंच काहीसं आंतरराष्ट्रीय दर्जावर एका पात्राच्या बाबतीत घडलं आहे. ते पात्र म्हणजे “दि जोकर”.

जोकर पहिल्यांदा जन्मला DC च्या कॉमिक बुक्स मध्ये. त्यानंतर तो पहिल्यांदा पडद्यावर आला १९६६ च्या बॅटमॅन सिनेमात. त्यानंतर १९८९ सालच्या सिनेमात पण तो होता. आजवर ६ वेळा वेगवेगळ्या लोकांनी जोकर पडद्यावर रंगवला आहे.

बॅटमॅनच्या जुन्या नव्या सर्व सिनेमांमध्ये जोकरच्या मागची कथा सांगितलेली नाही. तो असा का आहे याला कारण दिलेलं दिसत नाही. कॉमिक बुक्स पण याबाबतीत गोंधळलेले दिसतात. एक प्रसिद्ध कथेप्रमाणे जोकरचं खरं नाव हे जॅक आहे. दुसऱ्या एका कथेप्रमाणे तो एका केमिकल टॅक मध्ये पडल्यानंतर त्याच्या त्वचेचा रंग उडाला आणि त्याचे केस हिरवे झाले. अशा प्रकारे जोकरचं रूप त्याला मिळालं.

ही एक प्रसिद्ध “ओरिजिन स्टोरी” आहे राव. खरं तर जोकर हे पात्र तयार झालं तेव्हा त्याला अशी कोणतीही गोष्ट देण्यात आली नव्हती. तो बॅटमॅनचा हाड वैरी आहे हे मात्र निश्चित. बॅटमॅन सोबत जे जे म्हणून वाईट झालं आहे त्याला या ना त्या कारणाने जोकरलाच जबाबदार धरलं जातं.

तर, जोकर खऱ्या अर्थाने जगभर गाजला किंवा त्याला एक कायमचा चेहरा मिळाला तो हिथ लेजर नावाच्या अभिनेत्यामुळे. ख्रिस्तोफर नोलनच्या “दि डार्क नाईट” या बॅटमॅन सिरीजच्या दुसऱ्या सिनेमात जोकर अवतरतो. या जोकरच्या चेहऱ्यावर एक मोठी ‘स्माईल’ होती. ती स्माईल वाटण्यापेक्षा कोणीतरी धारधार चाकूने कोरून तयार केलेली जखम वाटावी अशी होती. हिथ लेजरने तोवर रंगवलेल्या सर्व “जोकर”च्या पात्रांना विसरायला लावलं आणि अशा विकृत चेहऱ्याच्या माणसाला सर्वाधिक गाजलेला व्हिलन बनवलं.

दि डार्क नाईट सिनेमातल्या जोकरच्या मागची कथा पण अशीच गोंधळलेली आहे. एका दृश्यात जोकर म्हणतो की माझ्या वडिलांनी मला हा असा चेहरा दिला. दुसऱ्या एका दृश्यात तो म्हणतो की मी स्वतःच चाकूने चेहऱ्यावर ही स्माईल काढून घेतली. तिसऱ्या एका दृश्यात तर तो तिसरीच एक कथा सांगणार असतो पण तेवढ्यात बॅटमॅन अवतरतो आणि कथा अर्धवट राहते.

दिग्दर्शकाला जोकरचं नेमकं ओरिजिन सांगायचं नाही हे यातून स्पष्ट होतं.

अखेर यावर्षी जोकरची अधिकृत ओरिजिन स्टोरी सांगण्यात येणार आहे. कालच “जोकर” या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. “जॉकिन फिनिक्स” हा अभिनेता जोकर साकारत आहे. हिथ लेजरच्या जोकरने भारावलेली जनता कोण्या दुसऱ्या अभिनेत्याला जोकर म्हणून स्वीकारणं शक्यच नाही, पण ट्रेलर लोकांना भलताच आवडलेला दिसतोय.

तर, आपला मुद्दा होता जोकरच्या कथेचा. आगामी ‘जोकर’ सिनेमा हा पूर्णपणे जोकरची कथा सांगणारा  आहे. जोकर असा विकृत का झाला याचं अखेरीस आपल्याला उत्तर मिळेल. ट्रेलरवरून काही अंदाज नक्कीच बांधता येतात.

जोकरचं नाव आहे आर्थर फ्लेक. तो एक अयशस्वी स्टँडअप कॉमेडीयन  आहे. त्याची आई त्याच्यासोबत राहते. पुढे काही अशा घटना घडतात की तो विकृत, मनोरुग्ण होतो.

जोकरला देण्यात आलेली ही कथा जोकरच्या पूर्वापार चालत आलेल्या क्रौर्याला कमी करणारी वाटते. या जोकरला एक भावनिक बाजू देण्यात आली आहे. जर ही जोकरच्या मागची कथा असेल तर जोकरचं सगळंच व्यक्तिमत्व त्यात फिट बसत नाही.

जोकरची ही ओरिजिन स्टोरी काही प्रमाणात “Batman: The Killing Joke” या कॉमिक बुक मधून घेण्यात आली आहे. या कथेवर ‘मार्टिन स्कोरसॅजी’ या बड्या दिग्दर्शकाच्या सिनेमांचा पण आहे.

एकंदरीत नव्या कल्पना आणि जुन्या कल्पना एकत्रित करून जोकरला त्याची कथा देण्यात आली आहे. ट्रेलरवरून तरी हा प्रयत्न यशस्वी होईल असं दिसतंय. लोकांना हा जोकर आवडणार नाही असं म्हटलं जात होतं, पण चित्र काहीसं उलट दिसत आहे. ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना एकजण म्हणाला की “हिथ लेजर असता तर त्याला अभिमान वाटला असता”.

तर मंडळी, जगातल्या सर्वात आवडत्या आणि गाजलेल्या व्हिलनचं हे नवीन रूप तुम्हाला आवडलं का ?? तुमचं मत नक्की द्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required