computer

खून करुन मानवी मांस दोन वर्षं लोकांना खाऊ घालणाऱ्या अमेरिकन विकृत खुन्याची गोष्ट!!

रस्त्याच्या कडेचे चटपटीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. तिथे तयार होणाऱ्या पदार्थांचा खमंग दरवळ इतका जबराट असतो की खवय्यांची पावलं हमखास तिकडे वळतात. गंमत म्हणजे त्या पदार्थात नक्की काय माल भरला आहे याचा कधी कुणी विचारही करत नाही. "कौआ बिर्याणी" किस्सा तर प्रसिद्ध आहेच. भेळ, पाणीपुरी यांसाठी भैय्ये काय लायकीचं पाणी वापरतात हे कित्तीतरी वेळा फोटोव्हिडिओसह व्हायरल झालेलं असतं. लेकिन हमें कुछ फरक नहीं पडता! पण हे असं चापून झाल्यावर समजा एखाद्याला कळलं की आपण जे खाल्लं त्यात माणसाचं मांस मिसळलेलं होतं, तर त्याची प्रतिक्रिया काय होईल? दचकलात ना! हे खरं घडलंय. अमेरिकेत.. काही वर्षांपूर्वी. हे घडवून आणणाऱ्या माणसाचं नाव होतं जो मेथनी. पण त्याने असं मानवी मांस कुणाला खायला घातलं होतं?

 

१९९६ च्या डिसेंबर महिन्यात जो मेथनी पोलिसांच्या ताब्यात सापडला. आपल्यासमोर उभ्या असलेल्या त्या सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या आणि ५०० पौंडाच्या अवाढव्य देहाकडे पोलीस विस्मयाने बघत होते. आपण पकडल्यावर हा प्राणी सुटण्यासाठी धडपड करेल, पळून जायचा प्रयत्न करेल अशी त्यांची अटकळ होती. एकंदरीत त्याची देहयष्टी पाहता तो पोलिसांना सहज लोळवू शकला असता. पण प्रत्यक्षात तो काहीही न करता शांतपणे उभा होता. लाकडाच्या वखारीत काम करणारा हा माणूस प्रत्यक्षात एक सीरियल किलर होता. तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सहज पळून जाऊ शकत होता, पण प्रतिकाराचा थोडाही प्रयत्न करत नव्हता. हे आश्चर्य होतं. त्यापेक्षाही जास्त आश्चर्यकारक होतं ते त्याचं बोलणं. अत्यंत निर्ढावलेल्या माणसाच्याही अंगावर सरसरून काटा येईल अशाप्रकारे त्याने आपण केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली होती. "मी एक विकृत मनुष्य आहे (I am a sick person)" हे त्याने आधीच सांगून टाकलं होतं. ते सांगतानाही त्याच्या स्वरात कुठेही अपराधीपणा, पश्चात्ताप यांचा लवलेश नव्हता. त्याच्याशी बोलताना पोलिसांना जाणवलं, की हा मनुष्य सूडाने पेटलेला आहे. पण ही सूडभावना इतकी तीव्र होती की तिचं विकृतीत रूपांतर झालं होतं. माणसांना मारण्यात त्याला एक प्रकारचा आनंद मिळू लागला होता. पोलिसांना तो हे ज्या थंडपणे सांगत होता ते अधिक थरकाप उडवणारं होतं.

जो ची बायको त्याला सोडून तिच्या बॉयफ्रेंडबरोबर पळून गेली होती. ती स्वतः ड्रग ॲडिक्ट होती. त्यामुळे तिला शोधून त्याला तिला चांगला धडा शिकवायचा होता. तिचा शोध घेत असताना ती न सापडल्याने त्याच्या मनातला तिरस्कार आणि संताप इतका वाढत गेला की बेघर असलेल्या वेश्यांना त्याने आपलं लक्ष्य बनवलं. अशा वेश्या हेरून त्यांच्यावर बलात्कार करून तो त्यांना ठार मारायचा आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावायचा.

ही विल्हेवाट लावण्याची पद्धत तर अंगावर अजूनच शहारे आणणारी होती. सहसा कोणताही खुनी प्रेताची विल्हेवाट लावताना ते जाळून टाकतो, किंवा लांबवर कुठेतरी नेऊन फेकून देतो, किंवा नदीत टाकतो, किंवा लोकांच्या नजरेला न येईल अशाप्रकारे एखाद्या ठिकाणी पुरतो. या माणसाने मात्र अनोखी शक्कल लढवली. तो शरीराचे तुकडे करून त्यातला वापरण्याजोगा आणि मांसल भाग पोर्कमध्ये मिसळायचा. नंतर या मिश्रणाच्या पॅटीज तयार करून विकायचा. अमेरिकेतल्या मेरीलँड येथे त्याने रस्त्याकडेला एक बार्बेक्यू स्टॉल सुरू केला होता. तेथे ग्राहक चवीचवीने या पॅटीज खायचे. तब्बल दोन वर्षं तो केलेले खून पचवत होता आणि त्याचे ग्राहक आपल्यासारख्याच दुसऱ्या माणसांचं मांस खात होते! गंमत म्हणजे एकाही ग्राहकाला त्या पॅटीजमध्ये काही गडबड आहे असं वाटलं नाही. जोच्या मते, माणसाचं मांस आणि डुकराचं मांस चवीला साधारण सारखंच असल्याने कुणाला काही जाणवलं नव्हतं.

त्यापूर्वी जेव्हा त्याची ड्रग ऍडिक्ट असलेली बायको त्याला सोडून गेली होती तेव्हा तिच्या शोधात असताना त्याची गाठ रस्त्याकडेला राहणाऱ्या दोन माणसांशी पडली होती. त्यांनी आपल्या बायकोबरोबर ड्रग्ज घेतल्याच्या संशयावरून आणि त्यांना तिचा ठावठिकाणा माहीत नसल्याने त्याने त्यांचा खून करून त्यांची प्रेतं नदीत टाकली होती. तिथे असलेल्या एका कोळ्याला त्याने केवळ तो या गोष्टीचा साक्षीदार म्हणून मारून टाकलं होतं. या गुन्ह्यासाठी त्याला दीड वर्ष तुरुंगात डांबलं गेलं, पण सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं.

तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने परत माणसांना मारण्याचा उद्योग सुरू केला. आता खून करण्याच्या क्रियेतून त्याला एक विकृत आनंद मिळायला लागला होता. पूर्वीच्या सूडाच्या भावनेपेक्षा या आनंदाचं पारडं जड होतं. मात्र यावेळी प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी तो त्यांना पूर्वीसारखं नदीत फेकणार नव्हता. त्यासाठी त्याने अभिनव (!) युक्ती शोधून काढली होती. ती प्रेतं घरी आणायची, त्यांचे बारीक तुकडे करायचे, त्यातला वापरण्याजोगा भाग फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आणि टाकाऊ भाग तो काम करत असलेल्या वखारीच्या टेम्पोमधून दूर कुठेतरी रवाना करायचा. फ्रीझरमधलं मांस बीफ, पोर्क यात मिसळून पॅटीमधून गिऱ्हाईकांच्या पोटात. सोपं काम, परत कुणाला संशय नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने दहा लोकांना अशा प्रकारे मारलं होतं.

पण म्हणून जो अजिंक्य राहणार नव्हता. शेवटी एकजण त्याच्या तावडीतून निसटलाच. आपली शिकार करू पाहणाऱ्या या नराधमाविरुद्ध त्याने थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली. जो परत एकदा पोलिसांच्या ताब्यात आला. न्यायालयाने त्याला सुरूवातीला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली, परंतु २००० मध्ये ती बदलून त्याला दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावण्यात आली. २०१७ मध्ये तो तुरुंगामध्येच मृतावस्थेत आढळून आला. मरण्यापूर्वी आपल्याला सोडचिठ्ठी देऊन पळून जाणाऱ्या बायकोला आणि तिच्या प्रियकराला मारण्याची त्याची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही.

काही जणांच्या म्हणण्यानुसार, जो मेथनीच्या या विकृतीची मुळं त्याच्या बालपणातच रुजलेली आहेत. त्याच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि तो केवळ सहा वर्षाचा असताना ते एका कार अपघातात मारले गेले. आईला सहा पोरांचा सांभाळ करायचा होता. त्यामुळे घर चालवण्यासाठी तिला अक्षरशः डबल शिफ्ट मध्ये काम करावं लागे. त्यातूनच जो सारख्या मुलाची प्रचंड हेळसांड झाली. त्याच्या म्हणण्यानुसार त्याचे आईवडील त्याला अनेकदा इतर लोकांच्या घरी सोडून द्यायचे. त्याच्याकडे फारसं कुणाचं लक्षही नसायचं. तर त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार लहानपणी जो हा एक हुशार, शांत, आणि नम्र स्वभावाचा मुलगा होता; त्याची कुणीही उपेक्षा केली नव्हती. मात्र पुढे जो सैन्यात दाखल झाला आणि त्यानंतर त्याचा कुटुंबाशी संबंध तुटला. जोच्या म्हणण्यानुसार तो व्हिएतनाममध्ये असताना त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं. अर्थातच या सर्व कथा सांगोवांगी आहेत. त्यामुळे त्यात खरं किती खोटं किती याला काही प्रमाण नाही.

फक्त एकच गोष्ट खरी आहे : या माणसामुळे त्या काळी मेरीलँडमधल्या काहीजणांनी, नकळत का होईना, माणसाचं मांस खाल्लं आहे!!

स्मिता जोगळेकर

 

सबस्क्राईब करा

* indicates required