computer

जय हो- स्टार वॉर्सचा जनक जॉर्ज लुकास!! त्याचा अपघात झाला नसता तर स्टारवॉर्सची मालिकाच कदाचित आली नसती..

जय हो' मालिकेतलं आजचं व्यक्तिमत्व आहे कार रेसिंगचं वेड असलेला अंतराळातील चित्रपटांचा दिग्दर्शक- जॉर्ज वॉल्टन लुकास. हो, तोच स्टार वॉर्सचा दिग्दर्शक! याचाही प्रवास साधासरळ नव्हता, पण त्यातूनही खचून न जाता त्याने पुढे काय केलं हा प्रवास मोठा रंजक आणि प्रेरणादायी आहे..

जॉर्ज वॉल्टन लुकास याचा जन्म १४ मे १९४४चा. कॅलिफोर्नियातलं मॉडेस्टो त्याचं जन्मगाव. जॉर्ज लुकास एक अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे. त्याने आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक लोकप्रिय चित्रपट तयार केले. स्टारवाॅर्ससारख्या वैज्ञानिक काल्पनिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याआधी जॉर्ज लुकास त्याच्या किशोरवयीन वर्षांमध्ये एकच स्वप्न उराशी धरत जगला: कार रेसिंग.

त्याला गाड्यांची प्रचंड आवड होती. वेगाचा थरार, कोणत्याही बंधनाशिवाय जगण्याची उमेद, कॅलिफोर्नियातल्या माॅडेस्टोमध्ये रात्रीच्या वेळी मुलींवर इंप्रेशन मारण्याची संधी किंवा इतर कार उत्साहींना शर्यतीसाठी शोधणे ह्यात त्याचे तारूण्याचे दिवस उडून जात होते. १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात तो थॉमस डाउनी हायस्कूलमध्ये दाखल झाला तेव्हा त्याला एक रेसर मोटारसायकल मिळाली. ती घेऊन तो अख्खा गाव हिंडला. मग वडिलांच्या मागे लागून त्याने कार घेऊन देण्याची गळ घातली. त्यांनी देखील लाडाने एक लहान, दोन-सिलेंडर इंजिन असलेली पिवळ्या रंगाची ऑटोबियंची बियान्चिना त्याला घेऊन दिली.

आपल्या नव्या कारला घेऊन लुकास ताबडतोब स्थानिक गॅरेजमध्ये गेला आणि कामाला लागला. कारण त्या साध्या कारला त्याला बनवायचं होतं रेसिंग कार! शक्तिशाली इंजिन, रेसिंग बेल्ट इत्यादी लावल्यावर त्याची बियांचिना कार म्हणजे छोटं रॉकेट बनलं, आणि लुकास संपूर्ण शहरात ती कार वेगाने चालवू लागला. पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले नसते तर नवलच. लुकासने त्याचे ड्रायव्हिंगचे कौशल्य प्रादेशिक शर्यतींमध्ये आजमावून पाहिले आणि काही स्पर्धा जिंकल्या देखील.

शाळेत असताना लुकास अत्यंत सामान्य कुवतीचा मुलगा होता. आपल्या मुलाला कौटुंबिक स्टेशनरीचा व्यवसाय करण्यात रस नसल्याबद्दल त्याचे वडील नाखूष होते. त्यामुळे घरातही तणावपूर्ण वातावरण होतं. लुकास व्यावसायिक रेस कार ड्रायव्हर बनण्याचं स्वप्न बघत होता; एक असं करियर, जे त्याला मोडेस्टोच्या बाहेरील रोमांचक जगात घेऊन जाईल.

१२ जून १९६२ हा दिवस त्याच्या आयुष्याला कलाटणी देणार होता. लायब्ररीमधून तो घरी निघाला होता. लुकासने त्यांच्या रॅंचमध्ये प्रवेश करण्यासाठी डावीकडे वळण घेत असताना, एक शेव्ही इम्पाला विरुद्ध दिशेने आली आणि तो चालवत असलेल्या बियान्चिनावर जोरात आदळली. जोराच्या धक्क्यामुळे त्याची लहान कार खेळण्यासारखी लांब भिरकावली गेली आणि एका अक्रोडाच्या झाडावर आदळली. रेसिंगचा पट्टा तुटला आणि लुकास फुटपाथवर फेकला गेला.

बेशुद्धावस्थेत असलेला लुकास काळानिळा पडला आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेत असताना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्याची अनेक हाडे तुटली आणि तो जबर जखमी झाला. पण त्याच्या सुदैवाने तो चांगल्या स्थितीत होता आणि काही तासांतच त्याला शुद्ध आली. पुढच्या चार महिन्यांत लुकासला हॉस्पिटलच्या खिडकीतून बाहेर टक लावून विचार करायला भरपूर वेळ मिळाला. त्याच्या मनांत विचार आला की त्याचा रेसिंग बेल्ट आघाताने तुटला नसता, तर तो सीटला जखडल्यामुळे कारसकट झाडावर आदळला असता. त्याने ज्या व्यावसायिक कार रेसिंग स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे स्वप्न पाहिले होते, तिथे तर भीषण अपघातांची अधिक शक्यता होती.

१८ वर्षांच्या लुकासच्या लक्षात आलं की रेस कार ड्रायव्हर बनणं हे जिकिरीचं आणि धोकादायक काम आहे. आतां आपल्याला काय करता येईल ह्याचा तो विचार करू लागला. त्याचे कारवरील प्रेम अबाधित राहिले आणि त्याने रेसिंग इव्हेंटचे फोटो काढण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि रेसिंग फॅन हॅस्केल वेक्सलर याच्याशी त्याची मैत्री झाली. त्याने लुकासला युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास प्रोत्साहन दिले.

१९६६ मध्ये लुकासने लॉस एंजेलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या फिल्म विभागातून बॅचलर ही पदवी प्राप्त केली. तेथे असताना भावी दिग्दर्शक जॉन मिलियस आणि एक वर्गमित्र यांनी लुकासला जपानी दिग्दर्शक कुरोसावा अकिरा यांच्या कामाची ओळख करून दिली. त्याचा प्रभाव लुकासच्या कामावर पडला. लुकासने १९६५ मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवात प्रथम पारितोषिक मिळविलेल्या इलेक्ट्रॉनिक लॅबिरिंथ THX 1138 4EB या फ्युचरिस्टिक सिनेमासह अनेक प्रशंसापात्र चित्रपट बनवले. १९६७ मध्ये त्याने वॉर्नर ब्रदर्समध्ये सहा महिन्यांची इंटर्नशिप केली, तिथे त्याने 'गाॅडफादर' फ्रान्सिस फोर्ड कोपोला याला सहाय्य केले.

वॉर्नर ब्रदर्स-सेव्हन आर्ट्सने लुकासला त्याने विद्यार्थीदशेत बनवलेल्या THX 1138 चा पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शक म्हणून साइन केले. दूरच्या भविष्यातील रोबोटाइज्ड, अमानवीय समाजाबद्दल एक भयंकर कल्पनारम्य असा हा THX 1138 सिनेमा होता. जाणूनबुजून अतिजलद केलेल्या चित्रणामुळे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही तो खूप उत्साहाने स्वीकारला नाही.

१९७१ मध्ये लुकासने लुकासफिल्म लिमिटेड ही प्राॅडक्शन कंपनी स्थापन केली. यात एक विभाग होता इंडस्ट्रियल लाइट अँड मॅजिक. हा विभाग हाॅलिवुडमधले सर्वात प्रतिष्ठित स्पेशल-इफेक्ट वर्कशॉप म्हणून ओळखले जात होते. त्याचा दुसरा चित्रपट होता "अमेरिकन ग्राफिटी", यात त्याने १९६० च्या दशकातील किशोरवयीन अमेरिकन जीवनाची झलक दाखवली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक यश मिळाले. एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा कमी खर्चात आणि एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत शूट केलेला अमेरिकन ग्राफिटी दशकातील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांपैकी एक होता आणि त्यात नवोदित कलाकार रिचर्ड ड्रेफस, पूर्वीचा बालकलाकार रॉन हॉवर्ड आणि हॅरिसन फोर्ड यांचा समावेश आहे.

अमेरिकन ग्राफिटीच्या यशामुळे लुकासला त्याला अत्यंत प्रिय असलेल्या विषयावर चित्रपट बनवण्याइतके पैसे मिळाले. खरं तर १९६८ मधील "प्लॅनेट ऑफ द एप्स" आणि "२००१: ए स्पेस ओडिसी" यासारखे दुर्मिळ अपवाद सोडले, तर विज्ञान काल्पनिका बॉक्स-ऑफिसवर यशस्वी होत नव्हत्या. म्हणजे हे एक प्रकारचा लुकासने पत्करलेला धोकाच होता. हा चित्रपट ल्यूक स्कायवॉकर (मार्क हॅमिल) या तरुणावर केंद्रित आहे, तो हुकूमशाही साम्राज्य आणि बंडखोर शक्ती यांच्यातील आंतरग्रहीय युद्धात अडकलेला असतो. स्कायवॉकर त्याचा गुरू ज्ञानी जेडाई नाइट ओबी-वान केनोबी (सर ॲलेक गिनीज) आणि संधीसाधू तस्कर हान सोलो (हॅरिसन फोर्ड) यांना प्रिन्सेस लिया (कॅरी फिशर) यांना डेथ स्टारच्या घातक डार्थ वेडर, ज्याचा खोल, यांत्रिकरित्या वाढलेला आवाज (जेम्स अर्ल जोन्सचा आवाज) बंदिवासातून वाचवण्याचे काम सोपवण्यात येते. या चित्रपटात वेगाने जाणाऱ्या अंतराळयानांचा पाठलाग दाखवण्यात आला. आपलं रेस कार ड्रायव्हर बनण्याचं स्वप्न लुकासने अशा प्रकारे पूर्ण केलं. या चित्रपटाच्या संपूर्ण सीरीजला अभूतपूर्व यश मिळालं.

काही वर्षांनंतर त्याने दिग्दर्शन करण्याचे थांबवले आणि फक्त चित्रपट निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्याच्या इंडस्ट्रियल लाइट अँड मॅजिक या प्रसिद्ध स्टुडिओत अनेक स्पेशल-इफेक्ट असलेले ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रपट आणि ॲनिमेशनपट बनले आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required