computer

जय हो- डिसलेक्सिया, गरीबी, अर्धवट शिक्षण, नोकरी नाही.. यातूनही यशाची दारे उघडणारा जिम कॅरी..

आज 'जय हो' मालिकेत आहे जेम्स यूजीन कॅरी किंवा आपल्या परिचयाचा जिम कॅरी. आपल्या विनोदाने सर्व जगाला लोटपोट हसवणारा प्रसिद्ध विनोदी नट जिम कॅरी.

कॅरीचे सुरूवातीचे आयुष्य मात्र खडतर होते. शालेय जीवनाच्या काळात तो एकलकोंडा होता आणि त्याला फारसे मित्र नव्हते. तरीही त्याच्या लक्षात आलं की तो इतर मुलांना हसवून त्यांना आपला मित्र बनवू शकतो. खरं सांगायचं तर तोच त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरणार होता. विचित्र हावभाव करून इतर मुलांना हसवण्याच्या त्याच्या सवयीमुळे शाळेतील शिक्षकांचं त्यांच्याबद्दल खूप चांगलं मत नव्हतं. घरी देखील त्याला आरशात बघून नकला करण्यात आनंद होत असे.

त्याने आपल्या सहकारी विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यापलीकडे विचार करायला सुरुवात केली, तेव्हा त्याला स्वतःविषयी आत्मविश्वास वाटू लागला. वयाच्या दहाव्या वर्षी त्याने आपला बायोडेटा अभिनेत्री आणि कॉमेडियन कॅरोल बर्नेटला पाठवला होता. अर्थात, सगळ्यात आधी त्याला यशस्वी होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी डिस्लेक्सिया, म्हणजे त्याच्या शिकण्याच्या अक्षमतेवर मात करण्यासाठी प्रयत्न करावे लागले.

कॉमेडियन जिम कॅरीचा जन्म १७ जानेवारी १९६२ रोजी न्यूमार्केट, ओंटारियो, कॅनडातला. कॅरीने त्याची सुरुवात टोरंटो कॉमेडी क्लबमध्ये स्टँड-अप काॅमेडीयन म्हणून केली तेव्हा तो फक्त १५ वर्षांचा होता. १९७९ पर्यंत त्याने आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कारखान्यातील रखवालदाराची नोकरी केली. एक वर्षानंतर त्याने नोकरी सोडली आणि यशस्वी कॉमेडियन बडी हॅकेट आणि रॉडनी डेंजरफील्ड यांच्यासाठी प्रारंभिक ॲक्ट करायला सुरुवात केली.

त्याच्या वडिलांनी जरी त्याच्या वेड्याचाळ्यांना प्रोत्साहन दिले असले, तरी त्याची आई त्याच्या विक्षिप्त चेहरे करण्याच्या सवयीने घाबरून जाई आणि त्याला त्याच्या खोलीत जाऊन बसायला सांगत असे. छोटा जिम मनांत म्हणत असे "काही हरकत नाही - आरशासमोर सराव करण्यासाठी तेव्हढाच अधिक वेळ मिळाला".

पैसा हा आणखी एक अडथळा होता. त्याचे कुटुंब एका सामान्य लोकवस्तीमध्ये कमी भाड्याच्या घरात राहत होते. दहावीपर्यंत तो कारखान्यात रखवालदाराची नोकरी करत असे. आठ तासांच्या रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करून सकाळी अर्धवट झोपेत असताना शाळेत जायचं म्हणजे कर्मकठीण काम. तो इतका थकलेला असे की त्याचे शिक्षक कोणता विषय शिकवत आहेत हेच त्याला समजून येत नसे. त्याला वाटले की शाळेत शिकून आपल्याला काहीच फायदा होत नाही. १६ वर्षांचा असताना त्याने शाळा सोडली.

कॅरीच्या आई वडीलांना वाटलं की त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील वातावरणामुळे त्यांना योग्य दिशा सापडत नव्हती, म्हणून त्यांनी राहतं घर सोडलं आणि कायमस्वरूपी नोकरी नसल्याने कॅनडाला गेले. त्याचे आई-वडील आणि दोन भावंडं कॅम्पग्राउंड मध्ये आपली व्हॅन पार्क करत, आणि संपूर्ण आठ महिने ते पिवळ्या फॉक्सवॅगन कॅम्पर व्हॅनमध्ये राहत होते.

१९८३ मध्ये कॅरी हॉलीवूडला गेला. तिथे त्याने "इंट्रोड्यूसिंग…जेनेट" नांवाच्या टीव्हीसाठी बनवलेल्या चित्रपटात काम केले. "द डक फॅक्टरी" आणि "जिम कॅरीज अननॅचरल ॲक्ट" यांसारख्या टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये कॅरीच्या हजेरीमुळे "हिट कॉमेडी इन लिव्हिंग कलर" मध्ये तो नियमितपणे भूमिका करू लागला. मोठ्या पडद्यावर कॅरीचे पदार्पण १९८४ च्या "फाइंडर्स कीपर्स" मध्ये झाले, परंतु १९९४ मधील कॉमेडी "एस व्हेंचूरा: पेट डिटेक्टिव्ह" या चित्रपटात मुख्य भूमिका साकारेपर्यंत त्याला यश मिळाले नाही. तिथून मात्र कॅरीचा अर्थपूर्ण चेहरा, कौशल्यपूर्ण मिमिक्री आणि कॉमेडीचा ब्रँड सर्वमान्य झाला. त्यानंतर त्याने "द मास्क", "डंब अँड डंबर", "एस व्हेंचुरा: व्हेन नेचर कॉल्स", "बॅटमॅन फॉरेव्हर", "द केबल गाय" आणि "लायर लायर" असे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले.

आपण कॅरीच्या मानसिक स्थितीची फक्त कल्पना करू शकतो; अर्धवट शिक्षण, नोकरी नाही, किशोरवयीन अपेक्षा, बौद्धिकदृष्ट्या मागासलेले वाटणे, आणि गरिबीमुळे येणारा लाजिरवाणेपणा. तरीही, कदाचित अशाच विपरीत परिस्थितीमुळे त्याच्या यशाचा मार्ग मोकळा केला. त्याला वाटले की यशस्वी होण्यासाठी त्याला इतरांपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. त्याच्या सर्जनशीलतेचा सर्वात मोठा स्फोट निराशेतून झाला; त्यामुळे जोखीम घेण्याची त्याची विलक्षण तयारी होती.

टोरंटोच्या युक-युक कॉमेडी क्लबमध्ये त्याचा पहिला पब्लिक परफाॅरमन्स होता. क्लबची प्रचारक एलेनॉर गोल्डहार हिने कॅरीची जीवतोड मेहनत पाहिली होती. जेव्हा तो परफॉर्म करत नव्हता, तेव्हा तो इतर विनोदी कलाकारांच्या तुलनेत शांत होता. तो निरीक्षण करत असे आणि आजूबाजूला जे काही चालले आहे त्याकडे लक्षपूर्वक पहात असे.

जेव्हा तो हॉलीवूडमध्ये बेकार होता, तेव्हा तो मुलहोलँड ड्राइव्हवर त्याच्या कारमध्ये बसायचा, शहराकडे पाहायचा, आकाशाकडे बघून हात पसरायचा आणि म्हणायचा, “प्रत्येकाला माझ्यासोबत काम करायचे आहे. मी खरोखरच चांगला अभिनेता आहे. माझ्याकडे सर्व प्रकारच्या उत्तम चित्रपटांच्या ऑफर्स आहेत."

१९९२ च्या सुमारास कॅरीने स्वतःला १० दशलक्ष डॉलर्सचा चेक लिहिण्याचा निर्णय घेतला. त्याने तीन वर्षे नंतरची, थँक्सगिव्हिंग डे ची तारीख घालून "अभिनय सेवेसाठी प्रस्तुत" असं लिहून तो चेक स्वतःला दिला. कॅरीने स्मरणपत्र म्हणून हा चेक त्याच्या पाकिटात सुरक्षित ठेवला होता. तीन वर्षे उलटली आणि थँक्सगिव्हिंग डे ला बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या "डंब ॲंड डंबर" या चित्रपटासाठी त्याला १० दशलक्ष डॉलर्स मिळाले. हा अत्यंत संस्मरणीय क्षण कॅरीच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. जेव्हा कॅरीच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा कॅरीने आपल्या वडिलांच्या शवपेटीमध्ये १० दशलक्ष डॉलर्सचा स्वतःला लिहिलेला चेक त्यांना श्रद्धांजली म्हणून ठेवला.

अंगावर काटा येईल असा एक प्रसंग त्याच्या आयुष्यात घडला. तो हवाई बेटांवर सुट्टीवर असताना त्याच्या सेक्रेटरीने त्याला फोन करून सांगितलं की दक्षिण कोरियाने मिसाईल सोडले आहे आणि त्याच्याकडे जगण्यासाठी फक्त दहा मिनिटे आहेत. त्या क्षणी त्याला जीवन किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव झाली. ही बनावट क्षेपणास्त्र चाचणी असल्याचे लक्षात आल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.

परिस्थिती कितीही विपरीत असली, आणि कितीही संकटे आली तरी प्रयत्न करत राहिल्यास एक ना एक दिवस यश मिळतेच. खरं तर आपल्या क्षमतांचा शोध घेण्यासाठी संकट ही देणगीच ठरते हे जिम कॅरी ह्याने सिद्ध केले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required