computer

'मलाल’ : महाराष्ट्रीयन चाळीतील परप्रांतीय प्रेमाची गोष्ट ! 

   बॉलिवूडचा बादशाह श्रीयुत शाहरुख खान यांनी ‘चलते चलते’ चित्रपटात एक मंत्र सांगितला होता. ‘जिच्यावर प्रेम करता तिचे प्रेम मिळविण्यासाठी ‘प्रयत्न’ करीत राहायला हवे, जरी तिचे दुसऱ्याबरोबर लग्न ठरले असले तरीही !!!.  नंतर ‘प्रयत्न’ केला नाही म्हणून अनुताप व्हायला नको’. हाच फॉर्म्युला लेखक, दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांच्या ‘मलाल’ या चित्रपटात वापरला गेला आहे

खरंतर ‘मलाल’ सेल्वराघवन च्या तामिळ ‘७ जी रेनबो कॉलनी’ चा रिमेक आहे. नव्वदीच्या उत्तरार्धातील कथानक असून मुंबईतील महाराष्ट्रीयन चाळीतील ही गोष्ट आहे. त्या काळातील घडणारे पिष्टोक्तीयुक्त प्रसंग व तशाच प्रकारची पात्रं असल्यामुळे कथेत नाविन्य आढळत नाही. एखाद्या यशस्वी चित्रपटाचा रिमेक करणे सोपे वाटत असले तरी त्यात धोकाही असतोच. ‘सैराट’ चा ‘धडक’ कसा बनला होता हे ताजे उदाहरण समोर आहेच. असो. ‘टिंग्या’ सारखा वास्तविक चित्रपट दिग्दर्शित केलेल्या हाडवळे यांना ‘मलाल’ सारखा कमर्शियल चित्रपट बनविताना थोडाफार त्रास झाल्यासारखे जाणवते. 

 ज्यावर्षी ‘टायटॅनिक’ भारतात प्रदर्शित झाला होता त्या १९९८ साली मुंबईतील परळ भागातील आंबेवाडी चाळीत त्रिपाठी कुटुंब राहावयास येते. व्यवहारामध्ये मोठा आर्थिक फटका खाल्ल्यामुळे ते उच्चभ्रू वस्तीतील बंगल्यातून येथे प्रोफेसर भोसले (सुनील तावडे) यांच्या भाड्याच्या खोलीत आलेले असतात. आस्था त्रिपाठी (शार्मिन सेगल) ही सीए ची तयारी करीत असते व तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न श्रीमंत कुटुंबातील आदित्यसोबत ठरविलेले असते. तेथील नगरसेवक प्रतापराव सावंत (समीर धर्माधिकारी) हा परप्रांतीयांविरोधात मराठीजनांना भडकवत असतो. त्याच्यासाठी काम करणारा शिवा मोरे (मिझान जाफरी) त्याच चाळीत आई (चिन्मयी सुमीत), वडील (अनिल गवस) व लहान बहिणीसोबत राहत असतो. परप्रांतीय आपल्या चाळीत आले म्हणून सुरुवातीला तो आस्था व तिच्या कुटुंबीयांचा दुस्वास करतो. परंतु एकाच चाळीत राहत असल्यामुळे वारंवार होणाऱ्या नजरभेटींमुळे त्याला ती आवडायला लागते. त्याचे शिक्षण कमी, कमाईचे काहीही साधन नाही, दारू, सिगरेटचे व्यसन अशी ओळख तर आस्था उच्चशिक्षित, खानदानी व सालस. याच सामाजिक विरोधाभासामुळे दोघे एकमेकांकडे आकृष्ट होतात. आस्थाचे लग्न ठरलेले असूनही तिला तो आवडू लागतो. शिवाच्या आईला ती आवडत असते तर आस्थाचे आईवडील शिवाच्या नावाने नाकं मुरडत असतात. त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळल्यावर आस्थाचे आईवडील तिला त्याला भेटायची बंदी घालतात. त्यांच्या प्रेमाची शोकांतिका होते की सुखांतिका हे ‘मलाल’ पाहूनच कळेल. 

 

 बिघडलेला मुलगा व आपल्या प्रेमाने त्याला सुधरायला लावणारी मुलगी, अशा प्रकारच्या कथा बऱ्याच चित्रपटांतून चित्रित झाल्या आहेत. मराठी वातावरणात घडणाऱ्या कथानकात मराठी कलाकार चपखल बसतात परंतु नायकाचे तुटक मराठी खटकते. स्थानिक-परप्रांतीय वाद उगाचच दाखविल्यासारखे वाटते कारण पहिल्या एक दोन प्रसंगानंतर त्याचा विसर पडलेला दिसतो. दिग्दर्शकाने नायक नायिकेचे अवखळ प्रेम संस्थापित करण्यात पूर्वार्ध खर्ची घातला आहे. परप्रांतीयांचा दुस्वास करणारा शिवा, आस्थाच्या एकाच शिकवणीत बदलतो हे पटत नाही. साधारणतः चाळीत कुठलीही गोष्ट लपून राहत नाही म्हणूनच चाळीतील वातावरणात त्यांचे प्रेम फुलत असताना इतर चाळकऱ्यांच्या काहीच प्रतिक्रिया समोर येत नाहीत. 

 

चित्रपटाचा शेवट मात्र वेधक झाला आहे. चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साली यांची आहे तसेच संगीतही त्यांनीच दिले आहे. संगीत चांगले असले तरी प्रेक्षक कोणतेही गाणे घेऊन चित्रपटगृहाबाहेर पडत नाही. नवोदित शार्मिन सेगलने (संजय लीला भन्साली यांची भाची) आपली भूमिका नीटसपणे पार पाडली आहे. 
दुसरा नवोदित मिझान जाफरी (अभिनेता जावेद जाफरी चा मुलगा) पहिल्याच चित्रपटात चमक दाखवतो. काही प्रसंगात त्याच्यात रणवीर सिंगची झलक जाणवते. अनिल गवस लक्षात राहतात. बाकी सर्वांनी चांगले काम केले असून चिन्मयी सुमीत आपल्या भूमिकेत जीव ओतते. तिचा वास्तविक अभिनय उठावदार आहे. 


तसं पाहिलं तर ‘मलाल’ हा वाईट चित्रपट म्हणता येणार नाही, परंतु अजून चांगला बनू शकला असता असे जरूर म्हणता येईल. 

-- कीर्तिकुमार कदम.

सबस्क्राईब करा

* indicates required