शकुंतला देवींवरील आगामी सिनेमातल्या कामाचा अनुभव सांगत आहेत मंदार कमलापूरकर !!

'ह्यूमन कम्प्युटर' अर्थात मानवी संगणक अशी सार्थ उपाधी मिळवलेल्या प्रतिभावान गणिती म्हणजे शकुंतलादेवी! मोठमोठी आकडेमोड कुठल्याही साधनाशिवाय केवळ मनात, तीही अतिशय जलद करू शकणाऱ्या, आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकी मोठाली गणिते वेगाने करून अचूक उत्तर देण्यामध्ये साक्षात संगणकाला हरवणाऱ्या, 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'सह असंख्य प्रतिष्ठित ठिकाणी अनेक विक्रमांची नोंद करणाऱ्या विक्रमवीर शकुंतलादेवी म्हणजे खरोखरच मानवी रुपातील निसर्गाचा चमत्कार!

अशा या प्रतिभावान व्यक्तीच्या अलौकिक आयुष्यावर आधारित चरित्रपट म्हणजे 'शकुंतलादेवी'. सर्वांनाच माहिती आहे की यात शकुंतलादेवी ही मुख्य भूमिका साकारत आहेत विद्या बालन. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर लवकरच 'अमेझॉन प्राईम'वर होत असल्याने त्याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. या सिनेमाचं ध्वनी संयोजन करत आहेत मंदार कमलापूरकर. त्यांनी बोभाटाच्या वाचकांसाठी खास या सिनेमाबद्दल एक लेख दिला आहे. ध्वनी संयोजनाचं किचकट काम कसं होतं? विद्या बालनसोबत काम करण्याचा अनुभव आणि बऱ्याच गोष्टींबद्दल तुम्हांला थेट माहिती इथेच मिळेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

या चित्रपटासाठी मला 'सिंक साऊंड रेकॉर्डिस्ट' म्हणून काम करण्याची संधी मिळाली. साध्या भाषेत सांगायचे तर, चित्रपटाच्या शूटिंगवर सर्व संवाद आणि इतर आवाज (साऊंड इफेक्ट्स) रेकॉर्ड करण्याचे काम माझ्याकडे होते. पण यात केवळ आवाज रेकॉर्ड करणे एवढाच भाग नसतो. तर ते चित्रपटात उत्तम प्रकारे कसे वापरता येतील आणि संवादांचे स्टुडिओत पुन्हा डबिंग करावे लागणार नाही याची काळजी घेणे ही महत्त्वाची जबाबदारी असते.

आधी 'सिंक साऊंड' म्हणजे नेमकं काय ते जरा विस्ताराने सांगतो.

चित्रपटांचे ढोबळ मानाने दोन प्रकार पडतात - पहिला म्हणजे 'डब फिल्म'. या प्रकारच्या सिनेमात सर्व संवाद हे स्टुडिओत डब केले जातात. शूटिंगच्या वेळी कलाकारांनी बोललेले संवाद हे रेकॉर्ड केले जात असले तरी त्याचा उपयोग फक्त डबिंगच्या वेळी 'रेफरन्स' म्हणून केला जातो. त्याला 'पायलट साऊंड' असे म्हणतात. त्यात रेकॉर्ड केलेल्या संवादांचा दर्जा फार चांगला नसला, त्यात काही नको असलेला गोंगाट (नॉईझ) आला तरी फार बिघडत नाही. कारण शेवटी सर्व संवाद पुन्हा स्टुडिओत डब करावेच लागतात.

याउलट दुसरा प्रकार म्हणजे 'सिंक साऊंड फिल्म'. यात शूटिंगच्या वेळी बोललेले संवाद इतक्या चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड केले जातात की ते पुन्हा स्टुडिओत डब करण्याची गरज उरत नाही. त्याचा उत्तम दर्जा आणि त्यात कसलेही नकोसे आवाज नसल्याने ते चित्रपटात जसेच्या तसे (अर्थातच काही तांत्रिक सोपस्कार करून) वापरता येतात.

(मंदार कमलापूरकर)

आता या दोन्ही पद्धतींचे आपापले फायदे-तोटे आहेत. डब फिल्मला शूटिंगच्या वेळी थोडा वेळ वाचतो, कारण प्रत्येक संवाद, त्यातील प्रत्येक शब्द सुस्पष्ट ऐकू आला नाही किंवा त्यात कुठे गाडीचा हॉर्न किंवा ट्रॅफिकसारखा बाहेरचा नको असलेला आवाज आला तरी काही फरक पडत नाही. मात्र नंतर डबिंगसाठी सर्व कलाकारांना वेगळा वेळ द्यावा लागतो आणि स्टुडिओत येऊन प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य पुन्हा बोलावे लागते. त्यावेळी चित्रातल्या ओठांच्या हालचाली, पात्राचा मूड, इतकंच नव्हे तर प्रसंगातली शारीरिक एनर्जी या सर्व गोष्टी मॅच करत डबिंग करावे लागते.

याउलट 'सिंक साऊंड' प्रकारात शूटिंगचा वेळ थोडासा वाढतो. कारण प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य हे व्यवस्थित रेकॉर्ड होणे म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या उत्तम असणे आणि त्यातला भाव, शब्दोच्चार आणि भाषेचा लहेजा चांगला असणे (कलात्मकदृष्ट्या उत्तम असणे) या दोन्ही गोष्टी साधाव्या लागतात. त्यासाठी प्रसंगी वारंवार रीटेक्स घ्यावे लागतात. शिवाय त्यासाठी शूटिंगचे लोकेशन निवडण्यापासून अनेक गोष्टींचा आधीपासून विचार करावा लागतो. मात्र यात नंतर डबिंगसाठी लागणारा वेळ वाचतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शूटिंगवरचा मूळ, उत्स्फूर्त आणि सहज झालेला परफॉर्मन्स वापरायला मिळतो.

हल्ली जास्तीत जास्त फिल्म्स या सिंक साऊंड प्रकारात बनवल्या जातात. यात मी म्हटल्याप्रमाणे जरी शूटिंगचा वेळ काहीसा वाढत असला तरी त्याचे फायदे जास्त महत्त्वाचे असल्याने आणि नैसर्गिक परफॉर्मन्स मिळत असल्याने अनेक दिग्दर्शक आणि बरेचसे मोठे कलाकारही सिंक साऊंड जास्त पसंत करतात. मी आत्तापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी सिंक साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम केले आहे. तसेच अनेक वेबसीरिजसाठीही काम केले आहे.

'शकुंतलादेवी' चित्रपटातला माझा अनुभव सांगायचा तर यात माझ्यासाठी काही आव्हानात्मक गोष्टी होत्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Know_your_world (@gen_axis_space) on

पहिलं म्हणजे, ही एक पीरियड फिल्म आहे. म्हणजे चित्रपटाच्या कथेतील काळ हा आजचा नाही, तर अनेक वर्षांपूर्वीचा काळ आहे. त्यामुळे आवाज रेकॉर्ड करत असताना त्याकाळाशी विसंगत असा म्हणजे आजच्या काळातला एखादा आवाज त्यात येता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. शूटिंग चालू असताना मोबाईल रिंग किंवा ट्रॅफिक यांचे आवाज येऊ नयेत ही काळजी आम्ही नेहमीच प्रत्येक सिंक साऊंड फिल्मच्या सेटवर घेतो. मात्र या चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या वस्तू (उदा. टाईपरायटर) व गाड्या यांचेही आवाज त्या काळाला अनुसरूनच असले पाहिजेत, याकडे आम्ही विशेष लक्ष दिले.

दुसरा भाग म्हणजे शकुंतलादेवींचे अर्धे आयुष्य भारतात काही ठिकाणी, तर बरेचसे आयुष्य भारताबाहेर- विशेषतः लंडनला- व्यतित झाले. अर्थातच चित्रपटाचे शूटिंगदेखील त्याप्रमाणे भारतात व लंडनला करण्यात आले. तेव्हा या सर्व शूटिंग शेड्यूलमध्ये आवाजाची एकसमानता (कंसिस्टंसी) ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे संपूर्ण शूटिंगवर माझी साऊंडची टीम आणि साऊंड इक्विपमेंट ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच होती. बूम ऑपरेटर शेरखान आणि असिस्टंट रेकॉर्डिस्ट सच्चिदानंद तिकम हे दोघे गेली अनेक वर्षे माझ्यासोबत काम करतात. त्यांना माझी कामाची पद्धत चांगली माहिती असल्यामुळे कामाची आखणी करणं आणि काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवणं सोपं जातं.

स्रोत

आव्हानांसोबतच माझ्यासाठी या चित्रपटात काही जमेच्या बाजूही होत्या.

पहिली म्हणजे, विद्या बालन यांच्याशी असलेलं ट्यूनिंग! याआधी त्यांच्यासोबत मी 'बॉबी जासूस' हा चित्रपट केला होता. वास्तविक त्यानंतर काही वर्षे लोटली असली तरी त्या मला पहिल्याच दिवशी सेटवर अगदी कालपरवाच भेट झाल्याप्रमाणे अतिशय आपुलकीने भेटल्या, आमच्या छान गप्पा झाल्या. विद्याजींची ही खासियत आहे की त्या प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही संबंधांचा समतोल फार उत्तम साधतात. म्हणजे एकत्र काम करताना घडलेल्या छोट्या-छोट्या चांगल्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवणे, मधल्या काळात इतर कुठले चांगले प्रोजेक्ट्स केले याची आस्थेने चौकशी करणे, आणि मुख्य म्हणजे आपल्या स्टारडमचे समोरच्याला कसलेही दडपण न येऊ देणे!

एक अभिनेत्री म्हणून त्यांच्याविषयी खरंतर मी नव्याने काही सांगायची गरज नाही. त्यांच्या अभिनयाची जादू आपण सर्वांनीच अनेकदा अनुभवली आहे. पण मी एवढं नक्की म्हणेन की आताच्या पिढीतल्या तर त्या निःसंशय सर्वश्रेष्ठ अभिनेत्री आहेतच, पण सार्वकालिक सर्वोत्कृष्ट कलावंतांमध्येही त्यांचं निश्चित मानाचं स्थान आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेले आम्ही लोक तर विशेष भाग्यवान आहोत. कारण त्यांना कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना प्रत्यक्ष पाहणं हा तर अविस्मरणीय अनुभव असतोच! पण त्याहीपलीकडे कॅमेऱ्याबाहेर त्यांचा वावर पाहणं हाही तितकाच सुखद अनुभव असतो. त्यांच्याशी विविध विषयांवर मुक्तपणे चर्चा करणं, शाब्दिक आणि प्रासंगिक विनोद (विशेषतः 'पीजे' हा त्यांचा आवडता प्रकार!) करून त्यावर दिलखुलास हसणं आणि त्यांचं ते खळाळत्या धबधब्यासारखं हास्य अनुभवणं... सगळंच संस्मरणीय!!

 

इथे आणखी एका गोष्टीचा विशेष उल्लेख केला पाहिजे. तो म्हणजे, त्या जितक्या उत्तम अभिनेत्री आहेत तितक्याच त्या कमालीच्या प्रोफेशनल आहेत. सेटवर नेहमी वेळेवर येणे, ठरलेल्या वेळात मेकअप वगैरे करून तयार असणे, आपले प्रसंग-संवाद यावरचं होमवर्क करून आधीच तयार असणे, सहकलाकारांना सपोर्ट करणे, दिग्दर्शकाशी किंवा आमच्यासारख्या तंत्रज्ञांशी उत्साहाने चर्चा करून सर्वांच्या सूचना विचारात घेणे, आणि दिवसाच्या पहिल्या शॉटला जितका उत्साह आणि एनर्जी असते तेवढीच पॅकअप होण्याआधी शेवटच्या शॉटपर्यंत असणे... खरोखरच हे सगळे गुण एका कलाकाराच्या ठायी असणं हे फारच दुर्मिळ आहे! मी तर म्हणेन की त्यांची एनर्जी ही अतिशय 'संसर्गजन्य' आहे, कारण त्या सेटवर येताच सर्वच लोक दुप्पट उत्साहाने कामाला लागतात. प्रामाणिकपणे सांगायचं तर फारच कमी कलाकारांविषयी इतकं भरभरून चांगलं बोलण्याची संधी मिळते. पण विद्याजींसोबत एकदा काम करणाऱ्या प्रत्येकाला ते पुन्हापुन्हा करायला मिळावं असं वाटतं, यातच सर्व काही आलं!

स्रोत

या चित्रपटात माझ्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे दिग्दर्शिका अनु मेनन. अनु मेनन यांनी याआधी दिग्दर्शित केलेल्या 'वेटिंग' या चित्रपटाचा सिंक साऊंड मी केला होता, ज्यात नसिरुद्दीन शाह आणि कल्की यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यामुळे त्यांच्याशीही उत्तम ट्यूनिंग होतं. मुख्य म्हणजे कॅमेरा किंवा दृश्य याइतकाच चित्रपटात ध्वनी हा महत्त्वाचा घटक आहे याची अनु मेनन यांना जाण आहे. त्यामुळे एखादा शॉट 'ओके' झाला की नाही हे ठरवताना त्या आवर्जून मला विचारत आणि साऊंडमध्ये काही डिस्टर्बन्स आला असेल किंवा माझा काही वेगळा विचार किंवा काही सूचना असेल, तर त्यासाठी प्रसंगी रीटेक घेण्याचीही त्यांची तयारी असे. दिग्दर्शकाचा असा विश्वास आणि पाठिंबा मिळाला तर प्रत्येकजण आपापले काम अधिक उत्साहाने आणि मन लावून करतो. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत अनु मेनन यांच्यासोबत काम करायला मला सर्वाधिक मजा आली.

एकूणच, या चित्रपटाची टीम फार छान जुळून आली होती. कॅमेरा, लाईट्स, आर्ट डिरेक्शन, कॉस्च्युम, हेअर-मेकअप, असिस्टंट डिरेक्टर अशा सर्वच डिपार्टमेंट्समध्ये उत्तम कम्युनिकेशन असल्यामुळे सर्वांचंच काम सोपं आणि अधिक चांगलं होत गेलं. याशिवाय या चित्रपटातील इतर कलाकार, म्हणजे सानिया मल्होत्रा, जिशू सेनगुप्ता, अमित साध आणि इतर सर्वांनीही उत्तम सहकार्य केले.

(अनु मेनन आणि विद्या बालन) स्रोत

मी वरती म्हटल्याप्रमाणे, चित्रपटातील संवादांव्यतिरिक्त शक्य तितके इतर सर्व आवाज किंवा साऊंड इफेक्ट्स रेकॉर्ड करण्याचाही माझा नेहमीच प्रयत्न असतो. या चित्रपटातही ठिकठिकाणी शूटिंग करताना तिथला निसर्ग, पक्षी आणि आजूबाजूचे आवाज मी रेकॉर्ड केले. त्यासाठी थोडीशी पायपीट करून आजूबाजूचा परिसर पाहून मग योग्य जागा निवडून वेगवेगळे आवाज मिळवले, जेणेकरून ते चित्रपटात वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वातावरण-निर्मितीसाठी वापरता येतील.

या चित्रपटासाठी काम करताना आम्हांला जितका आनंद मिळाला, तितकाच आनंद हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना मिळेल, याची मला खात्री आहे. सर्वांनी एकत्र बसून सहकुटुंब बघण्यासारखा हा एक निखळ मनोरंजक सिनेमा आहेच, शिवाय तो एका अलौकिक प्रतिभेच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग, त्याचे विविध पैलू आणि नात्यांचे पदर उलगडून दाखवतो. तेव्हा लवकरच 'अमेझॉन प्राईम'च्या माध्यमातून भेटीला येणारा हा चित्रपट चुकवू नका, घरबसल्या सहपरिवार त्याचा आनंद घ्या..

 

लेखक : मंदार कमलापूरकर
(ध्वनी संयोजक)

सबस्क्राईब करा

* indicates required