computer

या बाई फक्त शाळेत डान्स करून सोशममिडियावर प्रसिद्ध होत नाहीत, त्यांचे शिक्षणविषयक पुरस्कारही पाहा..

शाळेत मारकुटे शिक्षक असतात, तसे काही चांगलेही असतात. आताच्या जमान्यात शाळेत मारतात की नाही हे माहित नाही, पण शाळेत डान्स करणारे शिक्षक सोशल मिडियावर गाजतात हे मात्र खरे आहे.

रिकामा वर्ग दिसला की सहसा शिक्षक अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायला बघतात. पण कधी कधी मुलांना मजा येईल अशा गोष्टीही करायला हव्यात. सध्या अशाच एका दिल्लीच्या शिक्षकबाईंचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात फ्री पिरियडला क्लासरूममध्ये या बाई आपल्या विद्यार्थ्यांसोबत मस्तपैकी डान्स करताना दिसत आहेत.

 

'झुमका बरेलीवाला..'या गाण्यावर जमेल तसा डान्स करणारी ही मुले आणि त्यांच्या लाडक्या शिक्षकबाई बघितल्या तर कुणालाही हा नजारा भन्नाट वाटेल असाच आहे. हा व्हिडीओ दिल्ली येथील सरकारी शाळेतील आहे. मनु गुलाटी असे या शिक्षिकेचे नाव आहे. मुलांना शाळेत थोडा वेगळा आनंद मिळावा यासाठी त्यांनी केलेला हा प्रयोग चांगलाच यशस्वी झालेला दिसतोय.

मनु गुलाटी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि लगोलग तो व्हायरल झाला. सुरुवातीला ट्विटरवर लाखभर व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले. आता तर इन्स्टाग्रामवर याच व्हिडिओची धमाल आहे. सरकारी शाळेत अशा प्रकारे वेगळा प्रयोग करणारे शिक्षक असल्यावर शाळा पण मुलांना आनंदाचे ठिकाण वाटू शकते.

मनु गुलाटी या दिल्लीत प्रसिद्ध आहेत. एकप्रयोगशील शिक्षिका देखील सेलेब्रिटी ठरू शकते हे जसे आपल्या महाराष्ट्रात डिसले गुरुजींच्या उदाहरणाने दिसले होते तसेच या गुलाटी आहेत. दिल्लीच्या सरकारी शाळांचा चेहरामोहरा बदलला त्याला कारण गुलाटी यांच्यासारखे शिक्षक आहेत. मनु गुलाटी यांना त्यांच्या शिक्षणविषयक अभ्यासू आणि कृतीशील कामासाठी विविध ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी बोलवले जात असते. शिकवता शिकवता शिकणे हीच त्यांची पद्धत आहे याचा फायदा त्यांना मुलांना आधुनिक शिक्षण देताना होत असतो. शिक्षिका असण्याबरोबर त्या पीएचडीही करत आहेत.

या त्यांच्या कामांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारकडून शाळा शिक्षकांना आयसीटी पुरस्कार दिला जातो. या गुलाटी मॅडम २०१५ साली ICT पुरस्काराच्या मानकरी होत्या. २०१८ साली देखील एमएचआरडीकडून त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आला होता. भारतात शिक्षण व्यवस्थेत अधिक भरीव काम करता यावे यासाठी त्या अमेरिकन शिक्षणव्यवस्थेचा अभ्यास करून आल्या आहेत.

या शिक्षिकेच्या डान्स कौशल्याचे आणि उपक्रमशील स्वभावाचे देशभर कौतुक होत आहे. सध्या सरधोपट मार्गापेक्षा काहीतरी वेगळं रस्ता अवलंबून प्रयोग करणारे आणि त्यात यशस्वी होऊ पाहणारे कौतुकास पात्र ठरत आहेत. यामुळे तेच तेच रताळ गोष्टी करण्यापेक्षा भन्नाट प्रयोग करणाऱ्यांना प्रेरणा मिळते हे ही नसे थोडके.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required