computer

सोनी, मार्व्हल आणि स्पायडरमॅनचं नक्की काय झेंगाट आहे?

मार्व्हल सिनेमांचा सुवर्णकाळ अवेंजर्स एंडगेमनंतर संपला. पण अजूनही मार्व्हलचे अनेक सुपरहिरो जिवंत असल्याने येणाऱ्या काळात मार्व्हलकडून नविन भन्नाट सिरीज येईल असे बोलले जात होते.

एंडगेममध्ये आयर्न मॅन तर मेला. मग आता आयर्न मॅनची जागा कोण घेईल याबबद्दल अनेक फॅन थियऱ्या आल्या. स्पायडरमॅन ‘फार फ्रॉम होम’मध्ये आयर्नमॅनने त्याचा चष्मा स्पायडरमॅनला दिला होता. त्यावरून आता आयर्न मॅनची जागा स्पायडरमॅन घेईल असेही बोलले जात होते. पण मार्व्हल चाहत्यांच्या सर्व इच्छा धुळीस मिळालेल्या दिसत आहेत. यापुढे स्पायडरमॅन मार्व्हल युनिव्हर्सच्या सिनेमात दिसणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे!! यामागे काय कारण आहे चला जाणून घेऊया.

याला कारणीभूत ठरलंय डिस्ने आणि सोनी पिक्चर्समधला वाद. मंडळी, हे दोन्ही स्टुडिओ २०१५ पासून स्पायडरमॅनचे सिनेमे बनवत होते. त्यांच्यात ५ चित्रपटांचा करार झाला होता. त्याप्रमाणे त्यांनी टॉम सिनेमे तयारही केले. आता तो करार संपुष्टात येतोय, पण या पुढेही सिनेमे करण्यास हरकत नव्हती. मेख अशी की डिस्नेच्या इच्छेप्रमाणे पुढील सिनेमांसाठी सोनी कंपनीने ५० टक्के पैसा लावावा. हे सोनी कंपनीला पटलेलं नाही. सोनी आता या भागीदारीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. सोनी बाहेर पडलं तर स्पायडरमॅन देखील बाहेर पडेल, कारण स्पायडरमॅन हे पात्र सोनीच्या मालकीचं आहे.

मंडळी, हा वाद जर शमला नाही तर लवकरच स्पायडरमॅनला मार्व्हल युनिव्हर्स मधून अलविदा म्हणावं लागेल.

मार्व्हलचं डुबणारं जहाज आणि सोनीने दिलेला मदतीचा हात :

यानिमित्ताने सोनी आणि मार्व्हलच्या संबंधाचा इतिहास जाणून घेणं महत्वाचं ठरेल. आज मार्व्हलचे सुपरहिरो सिनेमे तुफान चालत आहेत. अव्हेंजर एंडगेमने तर नुकताच इतिहास रचला, पण जवळजवळ वीस एक वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती. कॉमिक बुक्सवर चालणारं मार्व्हल डबघाईला आलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवलेल्या पैशात नुकसान झालं होतं. शेवटी अशी वेळ आली की मार्व्हलला टिकून राहण्यासाठी त्यांचे सुपरहिरो विकावे लागले.

आधी तर एक्स-मेन आणि फॅन्टँस्टिक फोर फिल्म सिरीज फॉक्स स्टुडीओला विकण्यात आली. खरं तर त्या पूर्वी सोनीला मार्व्हलचे सगळे सुपरहिरो विकत घेण्याची ऑफर मिळाली होती, पण सोनी फक्त “स्पायडरमॅन”वर अडून राहिलं.

सोनीचे ‘येरी लँडॉ’ यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास “मार्व्हलच्या इतर सुपरहिरोंना कोणी भीकही घालत नाही. फक्त स्पायडरमॅनबद्दल बोला”

अशा प्रकारे १९९९ साली ७ मिलियन डॉलर्सना स्पायडरमॅन सोनीच्या मालकीचा झाला. सोनीला आणि मार्व्हलला हा सौदा चांगलाच मानवला. स्पायडरमॅनचे चित्रपट तुफान गाजले. मार्व्हल कंगाल झालं नाही. याचंच फळ म्हणजे आज आपण बघत असलेले स्पायडरमॅनचे सिनेमे.

पुढे जाऊन मार्व्हलला डिस्ने कंपनीने विकत घेतलं. २०१५ साली सोनी आणि डिस्ने यांच्यात भागीदारी वाटून घ्यायचा करार केला.

तसं पाहायला गेलं तर या दोन कंपन्यांमध्ये फार पूर्वीपासून वाद आहेत. एका मिटिंगच्या वेळी तर सोनी कंपनीच्या अॅमी पास्कल यांनी मार्व्हलच्या केव्हिन फीज यांना सँडविच फेकून मारलेला. एवढे वाद असूनही आजवर दोन्ही कंपन्यांनी निमूटपणे एकत्र संसार केला. आता यापुढे हे भांडण जर आणखी चिघळलं तर मात्र याचे परिणाम फॅन्सना भोगावे लागतील.

(अॅमी पास्कल आणि केव्हिन फीज)

आता स्पायडरमॅन पुन्हा येईल की तो इतिहासजमा होईल हे या दोन्ही कंपनीच्या निर्णयावर अवलंबून आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required