अशी ही बनवाबनवी मधले किती डायलॉग्ज तुम्हाला तोंडपाठ आहेत, जरा पाहा बरं..

अशीही बनवाबनवी हा कुठल्याही प्रसंगापासून पाहायला सुरूवात करात येणारा, जराही रटाळ न होणारा आणि सतत हास्याचा धबधबा खळाळता ठेवणारा सिनेमा आहे. विनोदाचा दर्जा जराही कमरेखाली न घसरू देता धमाल मनोरंजन करणार्या काही मोजक्या चित्रपटांपैकी असलेला हा सिनेमा बहुतेकांना तोंडपाठ आहे. खरे तर त्यातले विनोदी प्रसंग द्यायचे तर पूर्ण सिनेमाच इथे द्यावा लागेल. परंतु तरीही त्यातले काही प्रसंग निवडण्याचं धाडस आम्ही इथे केलंय.
“अल्सरचा त्रास आहे हो अल्सरचा”

एकेकाळी दुधासाठी रांगा लावाव्या लागत. आता हा संदर्भ कुणाला सहसा लागायचा नाही खरा. तिथेही रांगेत न उभं राहता फुकटात दूध मिळवणार्या अशोक सराफचा बिलंदरपणा पहिल्या प्रसंगापासूनच चालू होतो.
हा सुधीर, मी आणि हा कडेचा परशा

फोटो काढताना फोटोग्राफरला शिंक आल्यानं तो बाजीप्रभू बनून सगळ्यांची मुंडकीच उडवून देतो. फोटो डेव्हलप झाल्याशिवाय नक्की काय झालंय हे न कळण्याच्या काळातला फोटो आहे हा.
पण बससुद्धा पंक्चर होते, कधी.. कधी..

काही संवाद अशोक सराफच्या आवाजात ऐकण्यातच मजा आहे. त्याची प्रचंड शिस्तीची मालकीण आणि हा सतत कारणं सांगणारा मनुष्य.
तुम्ही केला होता का कधी, अभ्यास??

सुधीर जोशी-अशोक सराफ ही जुगलबंदी आणि जोडीला लक्ष्या म्हणजे पर्वणीच. तिघांनी मिळून हा प्रसंग आख्खा खाल्लाय.
तुम्ही तिघेजण राहता इथे, मग चार कपबशा कशा??

पुणेरी मालकाचा अर्क आहेत सुधीर जोशी. पण त्यांची गाठही अत्यंत इरसाल लोकांशी पडलीय त्याला ते तरी काय करणार!!
धनंजय माने इथेच राहातात का??

एका माणसाच्या नावावर तिघे काय, चौघे राहतात आणि वर घरमालकाकडूनच पैसे उकळतात. हद्द झाली निर्लज्जपणाची..
आणि या मिसेस बालगंधर्व!!

या संवादानंतर सगळ्यांच्या चेहर्यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत. लक्ष्या नाही, पण निदान सचिनने या सिनेमात एक स्त्रीपात्र भारी रंगवलं आहे. "कुणी येणार येणार गं" गाण्यात तो एखाद्या बाईलाही लाजवेल इतक्या कमनीयतेने नाचलाय. अर्थात म्हणून महागुरू बनून आपल्याला छळणं काही त्यामुळे सुसह्य होत नाही.
तुम्हाला लग्नाचे आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण? काका का मामा?

अगदी घर सोडतानाही हे दोघे भांड्णं सोडत नाहीत!!
त्यांच्या चेहर्यावर जाऊ नका, मनाने अतिशय चांगले आहेत ते.

पुन्हा तेच. दुर्दैवाने ’घरोघरी मातीच्या चुली’ सिनेमादरम्यान सुधीर जोशींचं निधन झालं आणि मराठी चित्रपट त्यांच्यासारख्या दिग्गजाला मुकला.
तुम्ही घरंदाज आहात. जरा साड्यांत सांभाळून वावरा..

हे सांगावं लागतं यातच काय ते सगळं आलं, नाही का?
सगळ्यांनीच घराबाहेर जाऊन कसं चालेल? आता घरातली कर्तीसवरती बाई तू आहेस.

बिच्चारा लक्ष्या!!
आणि हा माझा बायको, पार्वती.

तुझं बरं आहे रे, मला या रानरेड्याशी संसार करावा लागणार आहे.

इथं मात्र अशोक सराफ बिच्चारा आहे. लक्ष्या स्त्रीपार्टी म्हणून अजिबात शोभत नाही. पण त्याचं विनोदाचं अचूक टायमिंग सगळ्या गोष्टींवर मात करून जातं.
सुधाsssss, घे गं नांव..

”भारतानं आकाशात सोडलं मोठं यान, आणि नशीबानं पदरी बांधलं शंतनूचं ध्यान.”

बायकांचं काम असेल तरी चालेल धनी, पण घरी बसवू नका..

माझ्या शेजारी राहाते, नवर्याने टाकलंय तिला.

काही सिनेमात लक्ष्या-अशोकने जान ओतली असली तरी नंतर मात्र तोचतोचपणा करून यांनी वातही आणला होता.
इथं लक्ष्या काय म्हणतो हे सांगायची गरज आहे? :-D

हा संवाद मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हताच म्हणे. लक्ष्मीकांत बेर्डेने अचानक ऍडिशन घेतली.
कडक डोहाळे लागले आहेत हो तिला..

पहिलीच वेळ आहे हो..

या सिनेमात सगळे नुसते सुटलेयत..
अरे तिरडी खांद्यावर घेतात, स्ट्रेचर नाही!!

संवाद नसतानाही इथे हसू फुटल्याखेरीज राहात नाही..
