computer

२०२२ मध्ये येणार आहेत हे मोठे सिनेमे!! तुम्हांला यांतले कोणते 'बघायचेच' आहेत?

२०२१ संपून २०२२ सुरू व्हायला आता अवघे 7-8 दिवस उरले आहेत. संपणारे वर्ष आठवत असताना नव्या वर्षाचे नियोजन करण्याचे हे दिवस आहेत. कोरोनामुळे ठप्प पडलेले सर्वकाही आता सुरळीत होऊ पाहत आहे. सिनेमा थेटरही त्यातलीच एक गोष्ट. गेली दोन वर्ष दमदार सिनेमे थेटरमध्ये आपल्याला पाहता आले नाहीत. पण २०२२ मात्र याबाबतीत धुमाकूळ घालणार असे दिसत आहे. अनेक तगडे सिनेमे पुढील वर्षी रिलीज होत आहेत. त्यातले महत्वाचे दहा कोणते तेही बघून घ्या.

१) केजीएफ २

केजीएफ हा कन्नडमधला पिरियड ड्रामा असलेला सिनेमा. त्याने सिनेजगत हलवून सोडले होते. गाणे असोत की डायलॉग, सर्वत्र फक्त केजीएफची हवा होती. यश नावाचा हिरो यातून भाव खाऊन गेला. त्यातही सिनेमा संपताना खरा पिच्चर अजून बाकी आहे असा डायलॉग आहे. यामुळे तर दुसरा भाग कधी येईल असे लोकांना झाले आहे. दुसऱ्या भागात व्हिलन म्हणून संजूबाबा असल्याने पिच्चर दमदार असेल याचीही खात्री झाली आहे. केजीएफ २ च्या अनेक तारखा येऊन गेल्या, मात्र आता १४ एप्रिल २०२२ ला खरोखर थेटरमध्ये येईल हे स्पष्ट झाले आहे.

२) आरआरआर

बाहुबली बनवणारा राजमौली पुन्हा एकदा तगडी स्टारकास्ट आणि तितकीच तगडी स्टोरी घेऊन येत आहेत. ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट, अजय देवगण असे सुपरस्टार यात आहेत. यातला एकही ॲक्टर असला तरी थेटर हाऊसफुल होण्याची गॅरंटी असते. आता सगळे एकत्र आल्यावर फुल टू धमाल असेल. हा सिनेमा २०२२ च्या पहिल्याच आठवडयात ७ जानेवारीला रिलीज होत आहे.

३) लाल सिंग चढ्ढा

आमीर खानचा सिनेमा केव्हा येतो याची त्याचे चाहते वाट बघत आहेत. त्याच्या दरवेळी वेगळा लूक आणि वेगळी स्टोरी घेऊन येण्याच्या पध्दतीमुळे आता काय नविन घेऊन येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फॉरेस्ट गंप या २५ वर्ष जुन्या हॉलीवूड सिनेमावर आधारित लाल सिंग चढ्ढा हा आमीरचा सिनेमा १४ एप्रिल २०२२ रोजी रिलीज होणार आहे. पण केजीएफ २ सोबत टक्कर टाळण्यासाठी याची तारीख पुढे मागे होण्याची शक्यता आहे.

४) गंगुबाई कठियावाडी

एस. हुसेन झैदी यांच्या पुस्तकांवर आधारित अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये येऊन गेलेत. आता संजय लीला भन्साळी आलिया भटला घेऊन गंगुबाई कठियावाडी हा सिनेमा घेऊन येत आहेत. एक महिला मुंबईतील माफिया जगतावर कशी राज करते हे यातून दाखवले आहे. हा सिनेमा १८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

५) बीस्ट

साऊथ इंडियन सुपरस्टार विजय आणि पूजा हेगडे यांचा बीस्ट हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या सिनेमाची तारीख अजून निश्चित नाही. मात्र फुल टू ऍक्शन पॅक सिनेमा असेल याची गॅरंटी नावातूनच मिळते. यात योगी बाबू, व्हि.टी.व्ही. गणेश असे स्टार आहेत तर नेल्सन दिलीपकुमार यांनी हा सिनेमा डिरेक्ट केला आहे.

६) धाकड

कंगना राणावत ही पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयासहित नवा सिनेमा घेऊन येत आहे. धाकड या सिनेमात ती मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता हे देखील यात काम करणार आहेत. हा सिनेमा ८ एप्रिलला रिलीज होणार आहे.

७) राधे शाम

साहो येऊन गेला, त्यानंतर प्रभासचा सिनेमा केव्हा येईल याची चाहते वाट बघत होते. चाहत्यांची प्रतिक्षा संपवत आता राधे शाम या सिनेमातून प्रभास येत आहे. पूजा हेगडे ही अभिनेत्री त्याच्यासोबत काम करत आहे. साय फाय जॉनरचा हा सिनेमा रोमँटिक ड्रामा असेल. १४ जानेवारीला राधे शाम रिलीज होईल.

८) ब्रह्मास्त्र

रणबीर कपूर आणि डायरेक्टर अयान मुखर्जी हो जोडी पुन्हा एकदा नवा सिनेमा घेऊन येत आहे. यावेळी मात्र तीन सिनेमांचा पॅक घेऊन ते येत आहेत. ब्रह्मास्त्र हा तीन भागांत रिलीज होणारा सुपरहिरो सिनेमा आहे. याचा पहिला भाग ९ सप्टेंबरला रिलीज होईल. रणबीर सोबत यात आलिया भट आणि अमिताभ बच्चन दिसणार आहेत.

९) हिरोपंती २

टायगर श्रॉफ हा भारताचा भिडू जॅकी श्रॉफचा एकुलता एक मुलगा हिरोपंती सिनेमातून हवा करून गेला होता. आता पुन्हा हिरोपंतीच्या दुसऱ्या भागातून तो नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत येत आहे. यात तारा सुतारिया त्याची हिरोईन असेल. या सिनेमा २९ एप्रिलला रिलीज होणार आहे.

१०) आदिपुरुष

तानाजी सिनेमा बनवून डायरेक्टर म्हणून स्वतःला सिद्ध केलेला ओम राऊत प्रभासला घेऊन रामायणावर आधारित आदिपुरुष घेऊन येत आहे. या सर्व यादीत आदिपुरुष मात्र सर्वात जास्त जबरदस्त असेल असे बोलले जाते आहे. क्रिती सॅनन ही अभिनेत्री यात काम करत आहे. तर सैफ अली खान हा देखील यात असणार आहे. ११ ऑगस्ट ही या सिनेमाची रिलीज होण्याची तारीख आहे.

आता यात पुढील वर्षी रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमांची पण ओळख करून घेऊ

१) मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी

प्लॅनेट मराठी घेऊन येत असलेला हा सिनेमा पहिला मराठी हॉलीवूड सिनेमा ठरणार आहे. यात सोनाली कुलकर्णी छत्रपती ताराराणी यांची भूमिका करणार आहे. पुढील वर्षी दिवाळीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.

२) झोम्बीवली

आदित्य सरपोतदार घेऊन येत असलेला कॉमेडी आणि भयपट यांचा एकत्र तडका असलेला झोम्बवली ४ फेब्रुवारीला थेटरमध्ये रिलीज होणार आहे. यात अमेय वाघ आणि ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत असतील. त्यांच्या सोबत वैदेही परशुरामी पण दिसणार आहे.

३) श्यामची आई

सुजय डहाके हा कमालीचा प्रतिभावान डायरेक्टर साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित श्यामची आई हा सिनेमा पुढील दिवाळीला घेऊन येत आहे. याची निर्मिती अमृता राव यांनी केली आहे. अजून फक्त या सिनेमाचे पोस्टर रिलीज झालेली असून हळूहळू याची माहिती प्रेक्षकांना कळणार आहे.

४) कॉफी

सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांचा कॉफी हा सिनेमा १४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्पृहा जोशीने या सिनेमाचे पोस्टर शेअर करून याबद्दल माहिती दिली होती. नितीन कांबळे यांनी सिनेमाचे डिरेक्शन सांभाळले आहे. नात्यांमधील हलक्याफुलक्या गोष्टींवर हा सिनेमा आधारित आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required