नागराज मंजुळे शिवरायांवर कोणते तीन सिनेमे घेऊन येणार आहेत?..टीझर पाहून घ्या!!

रितेश देशमुख शिवाजी महाराजांवर चित्रपट घेऊन येत आहे ही चर्चा जवळजवळ ३ वर्षांपासून सुरु होती. आज शिवजयंतीच्या दिवशी अखेर त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. २०२१ सालापासून पुढे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर ३ चित्रपट येणार आहेत. या चित्रपटांच दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार आहेत. हा पाहा टीझर.
सुरुवातीला माहिती मिळाली होती की हे चित्रपट रवी जाधव दिग्दर्शित करणार आहेत. तशी घोषणाही झाली होती. एवढंच नाही तर एका मुलाखतीत रवी जाधव यांनी तशी कबुली दिली होती, पण आता ही जबाबदारी नागराज मंजुळे यांच्यावर आली आहे. नागराज मंजुळे यांच्या मागच्या चित्रपटांप्रमाणे या चित्रपटांनाही संगीत देण्याचं काम अजय अतुल करणार आहेत.
शिवाजी, राजा शिवाजी आणि छत्रपती शिवाजी या तीन चित्रपटांना मिळून ही ‘शिवत्रयी’ साकारणार आहे. नावावरून एक अंदाज असा बांधता येतो की हे चित्रपट शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ३ टप्पे दाखवतील.
हा नक्कीच मोठा आणि भव्यदिव्य प्रकल्प असणार आहे. त्यासाठी आपल्याला २०२१ आणि पुढच्या काही वर्षांची वाट बघावी लागेल, पण यावर्षीही शिवाजी महाराज आणि त्यांच्या मोहिमांवर आधारित चित्रपट येऊ घातले आहेत. जसे की प्रवीण तरडे दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव, बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमावर आधारित पावनखिंड आणि जंगजौहर हे २ सिनेमे येत आहेत.