computer

१२ वर्षांतून एकदा फुलणारे प्रेमाचे फूल “नीलाकुरींजी"चे भन्नाट फोटो पाहून घ्या!

Flower of love किंवा ' प्रेमाचे फूल ' म्हटले तर तुम्हाला कोणते फुल आठवते? गुलाब, तेही लाल रंगाचे, बरोबर ना! पण आज आम्ही एका दुर्मिळ फुलाविषयी सांगणार आहोत. या फुलाचा रंग निळा आहे आणि ते १२ वर्षांत एकदाच येते. या फुलांच्या सौंदर्याने अख्खे डोंगर फुललेले आहेत आणि ही निसर्गाची उधळण परदेशात नाही तर दक्षिण भारतात पाहायला मिळत आहे.

या फुलाचं नांव आहे “नीलाकुरींजी”. नीलाकुरींजी फुलाला वैज्ञानिकदृष्ट्या स्ट्रोबिलान्थस कुंथियानस (Strobilanthus Kunthianus)म्हणून ओळखले जाते. कर्नाटकच्या डोंगररांगांमध्ये या दुर्मिळ फुलांच्या उमलण्याने एक अद्भुत निळ्या रंगांची उधळण या डोंगरमाथ्यावर झाली आहे. कर्नाटक राज्य वन विभागाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर मंडलपट्टी टेकडीचे सुंदर फोटो शेअर केले आणि बघता बघता ते व्हायरल झाले. तुम्हीही एकदा पाहून घ्या.

नीलाकुरींजी १३००ते २४०० मीटर उंचीवर वाढते. याचा हंगाम जुलै ते नोव्हेंबर पर्यंत असतो. या फुलाला 'प्रेमाचे फूल' असेही म्हणतात, तर स्थानिक लोक कुरींजी म्हणतात. नीलाकुरींजीचे नाव कुंठी नदीवरून आले आहे. या फुलाच्या २५० जाती आहेत आणि त्या वेगवेगळ्या वेळी फुलतात. काही ५ वर्षांच्या अंतराने फुलतात, तर काहींना फुलायला सुमारे १२ ते १४ वर्षे लागतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. नीलकुरींजी फुलांच्या एकूण ४६ जाती भारतात आढळतात आणि विशेष म्हणजे वनस्पतीचा औषधी उपयोग देखील आहे.

दक्षिण भारतातील पश्चिम घाट खरंतर पावसाळ्यात जिवंत होतात. तिथे निसर्गाची सर्व रूपे पाहायला मिळतात. त्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी जणू शोभेसाठी जंगलांच्या डोंगराळ प्रदेशात पसरलेली नीलाकुरुंजी झुडुपे आणि त्यावर फुललेली ही सुंदर फुलं. दशकातून एकदा फुलणारी नीलाकुरींजी फुले पाहण्यासाठी अनेक पर्यटक भेटी देत आहेत. पश्चिम घाटावरील मंडलपट्टी डोंगरावर अनेकजण येत आहेत आणि या फुलांची छबी आपल्या कॅमेरात कैद करत आहेत.

भारताचा प्रसिद्ध 'निलगिरी पर्वत' हे नाव या फुलांच्या नावाने दिले गेले आहे. ही फुलं एकेकाळी दक्षिण भारतातील पलानी हिल्स, अनामलई हिल्स, वेलची टेकड्या, निलगिरी हिल्स, कुद्रेमुख आणि बाबबुदनगिरी यांना निळ्या रंगाने आच्छादित करत असत. आता हा बहर बऱ्याच अंशी कमी झाला आहे. तरीही याचे सौंदर्य कमी होत नाही. याचे पुढे अनेक वर्ष संवर्धन व्हावे हीच इच्छा करूया..

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required