computer

होममेड' म्हणता येईल अशी घरातूनच बनविलेली मालिका ‘आठशे खिडक्या नऊशे दारं' !!

नवे चित्रपट तयार आहेत. पण थिएटर्स बंद आहेत. टिव्हीवरच्या मालिका आहेत तिथेच थिजून गेल्या आहेत. स्पॉटदादा ते हिरो, सगळेच आपापल्या घरी बसले आहेत. वेळ मारून नेण्यासाठी जुन्या मालिका पुन्हा टिव्हीच्या पडद्यावर दाखवल्या जात आहेत. पण काही जुन्या मालिकांचा तडका कधीच विरून गेल्यामुळे ती मजा पण येत नाहीये. अशा चक्रव्यूहात मनोरंजनाचे जग स्तब्ध उभे आहे. नुकसानीचे आकडे तर आता कोणी सांगत नाही आणि ऐकणारे पण ऐकत नाहीत. अशावेळी काही कलाकार मात्र यातूनही मार्ग कसा काढता येईल यावर विचार करीत होते. त्यातूनच अगदी शब्दशः 'होममेड' म्हणता येईल अशी घरातूनच बनविलेली ‘लॉकडाऊन’ विषयावरील मालिका ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ सोनी मराठी वाहिनी घरात बसलेल्या तमाम रसिकजनांसाठी घेऊन येत आहे. या मालिकेत एकूण १६ कलाकार आहेत आणि ते आपापल्या घरूनच या मालिकेचं चित्रीकरण करणार आहेत.

नुकतीच या मालिकेची पत्रकारपरिषद झाली. ही परिषद देश-परदेशात विखुरलेले कलाकार, महाराष्ट्रभर पसरलेले पत्रकार आणि सोनी मराठीचे अधिकारीगण यांच्यासोबत आपापल्या घरात बसूनच करण्यात आली. मालिकेचं चित्रीकरण घरून करण्याचे अनुभव ते करताना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यासाठी केलेले जुगाड अशा सर्वच विषयांवर या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलखुलास गप्पा झाल्या. घरून शूट होणाऱ्या मालिकेप्रमाणेच या मालिकेची व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्ससुद्धा चर्चेचा विषय ठरली.  प्रेस कॉन्फरन्समध्ये या मालिकेचे तीनही प्रोमोज दाखवण्यात आले आणि मालिकेचं शीर्षकगीतसुद्धा या प्रेस कॉन्फरन्समध्येच खास रिलीज करण्यात आलं.

चला बघू या मालिकेचं शीर्षकगीत !

लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्यांकडून घरी बसलेल्यांसाठी बनवलेली ही नवी विनोदी मालिका 'आठशे खिडक्या नऊशे दारं' १८ मे पासून सोमवार-मंगळवार रात्री १० वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. 

 सौजन्य- कीर्ती कदम

 

सबस्क्राईब करा

* indicates required