computer

युट्यूब वि. टिकटॉक, काय वाद आहे हा? कधी, का आणि कुणी सुरू केला? जाणून घ्या नक्की काय झालं..

व्हिडीओ शेअरींग प्लॅटफॉर्मचा विचार केला तर युट्युब हे महत्त्वाचं माध्यम आहे. युट्युबला टक्कर देणारं दुसरं माध्यम आजही बाजारात नाही, पण काही जोडीदार मात्र आहेत. काही वर्षांपूर्वी म्युझिकली आलं आणि त्यानंतर म्युझिकली टिकटॉकमध्ये रूपांतरित झालं. म्युझिकली पेक्षा टिकटॉकला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला. टिकटॉक व्हिडीओचा एक नवीन ट्रेंडच सुरू झालेला आहे. यातूनच टिकटॉकर्सचा जन्म झाला. मग टिकटॉकचे व्हिडीओ युट्युबवर जाऊ लागले आणि कधीकधी उलट होऊन युट्युबचे टिकटॉकवर.

या सगळ्यात दोन गट पडलेले दिसतात. पहिला म्हणजे अर्थातच युट्युबचा गट, जो युट्युबवरच्या कंटेंटला पसंती देतो. दुसरा आहे टिकटॉकचा गट जो त्या माध्यमालाही पसंती देतो. टिकटॉकबद्दल एक गोष्ट इथे नमूद करावी लागेल. ती म्हणजे टिकटॉकला सुरुवातीपासूनच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. टिकटॉकबद्दल बोलताना टिकटॉक व्हिडीओ तयार करणाऱ्यांची लैंगिकता काढली जाते हेही इथे नमूद केलं पाहिजे. काही वर्षांपर्यंत युट्युब आणि टिकटॉक यांची तुलनाच केली जात नव्हती पण आज ती होताना दिसत आहे.

सध्या गाजत असलेला कॅरीमीनाटी विरुद्ध आमिर सिद्दीकी किंवा कॅरीमीनाटी विरुद्ध टिकटॉक हा वाद याच दोन गटातला वाद आहे.

आजच्या लेखात कॅरीमीनाटी आणि आमिर सिद्दीकी नेमके कोण आहेत, त्यांचं भांडण काय आहे आणि हे सगळं भांडण शेवटी युट्युब विरुद्ध टिकटॉक या टोकाला कसं गेलं ते पाहू या.

कॅरीमीनाटी कोण आहे?

कॅरीमीनाटीचं खरं नाव आहे अजेय नागर. तो फरिदाबाद येथे राहतो. त्याचे व्हिडीओ विशेषतः रोस्टिंग प्रकारात मोडतात. रोस्टिंग म्हणजे मराठीत आपण ज्याला खरपूस समाचार घेणं म्हणतो तो प्रकार. इंटरनेटवर घडणाऱ्या हास्यास्पद गोष्टींचा कॅरीमीनाटी खरपूस समाचार घेतो. त्याचे सुरुवातीचे व्हिडीओ पाहिले तर तो गेमिंग सोबत कॉमेंट्री करताना दिसेल. युट्युबवर बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याचं स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन व्हिडीओ तयार करण्याचं प्रमाण वाढलं. आजच्या घडीला त्याच्या एकूण फॉलोअर्सची संख्या १६.७ मिलियन इतकी आहे.

आमिर सिद्दीकी कोण आहे ?

आमिर सिद्दीकी हा मुंबईचा राहणारा आहे. तो युट्युब स्टार म्हणून ओळखला जातो. त्याचे व्हिडीओ मुख्यत्वे कॉमेडी प्रकारातले असतात. टिकटॉकवर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या ३.७ मिलियन एवढी आहे.

वाद कधी सुरू झाला?

हा सगळा वाद आमिर सिद्दीकीच्या व्हिडीओ नंतर सुरू झाला. आमिर सिद्दीकीने आपल्या व्हिडीओमध्ये टिकटॉक कसं युट्युबपेक्षा चांगलं आहे, टिकटॉकर्स मध्ये कशी एकी टिकून आहे आणि टिकटॉक कसं श्रेष्ठ आहे हे सांगितलं होतं. या व्हिडीओने युट्युबर्स चांगलेच भडकले होते. व्हिडीओ ट्रेंड झाल्यानंतर आणि त्याच्याबद्दल उलटसुलट चर्चा झाल्यानंतर आमिर सिद्दीकीने आपला व्हिडीओ डिलीट केला. पण तोवर कॅरीमीनाटीने ही गोष्ट मनावर घेतली आणि उत्तरादाखल YouTube vs TikTok- The End व्हिडीओ तयार केला.

कॅरीमीनाटीने आपल्या व्हिडीओमध्ये आमिर सिद्दीकीच्या एकेक मुद्द्यांला घेऊन त्याला रोस्ट केलं. आमिर सिद्दीकीच्या व्याकरणापासून ते त्याच मॉस्को येथे शिकून येणं, टिकटॉक युट्युब पेक्षा श्रेष्ठ आहे हा मुद्दा. एकूण सगळ्याच गोष्टींचा त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने समाचार घेतला. 

युट्युबच्या चाहत्यांना कॅरीमीनाटीचा व्हिडीओ प्रचंड आवडला. तो एका रात्रीत ट्रेंड होऊ लागला. मिम्स तयार झाले. टिकटॉकर्सचं ट्रोलिंग सुरू झालं. आशिष चंचलानी सारख्या युट्युबर्सनी कॅरीमीनटीला पाठिंबा दिला.

आमिर सिद्दीकीचं उत्तर काय होतं?

८ मे च्या दिवशी कॅरीमीनाटीचा व्हिडीओ आल्यानंतर १४ मे ला आमिर सिद्दीकीने कॅरीमीनाटीला उत्तर देणारा व्हिडीओ तयार केला. त्याने आपली बाजू मांडताना म्हटलं की तो युट्युबच्या विरोधात नसून, केवळ सायबर बुलिंगच्या विरोधात आहे. ही गोष्ट कॅरीमीनाटी समजून घेईल असंही तो म्हणाला. 

कॅरीमीनाटीचा व्हिडीओ युट्युबने डिलीट का केला?

कॅरीमीनाटीने आपल्या व्हिडीओला नाव दिल्याप्रमाणे हा मुद्दा युट्युब विरुद्ध टिकटॉक असा झाला आहे. त्यामुळे टिकटॉकला पाठिंबा देणारे किंवा कॅरीमीनाटीचा व्हिडीओ न आवडलेल्या लोकांनी युट्युबकडे तक्रार केली. याचा विचार करूनच युट्युबने व्हिडीओ डिलीट केला. यासाठी एखाद्याला वयक्तिकरीत्या त्रास देणे आणि सायबर बुलिंग ही दोन कारणं देण्यात आली आहे.

जनताजनार्दन काय म्हणत आहे?

लोकांमध्ये दोन गट पडले आहेत. कॅरीमीनाटीला समर्थन देणारे आणि त्याच्या विरोधातले. कॅरीमीनाटीचे चाहते किंवा युट्युब समर्थक व्हिडीओ डिलीट केल्यानंतर प्रचंड चिडले आहेत. #justiceforcarry या सारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. हा राग टिकटॉकवर निघतोय. राग व्यक्त करताना लोक खालच्या पातळीवरही जात आहेत. एक तिसरा गट प्लेस्टोरवर जाऊन टिकटॉक ऍपला कमीतकमी रेटिंग देऊन ऍप डिलीट करत आहे. १ स्टार देण्याचं प्रमाण वाढलं आहे.

तर वाचकहो, तुम्हाला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी स्नॅपचॅटच्या मालकाने भारतीयांबद्दल तुच्छता दाखवणारं वक्तव्य केल्यानंतरही स्नॅपचॅट विरोधात अशीच मोहीम सुरू झाली होती. स्नॅपचॅटला १ स्टार देऊन ऍप डिलीट करण्यात येत होतं. एकाच दिवसात रेटिंग उलट सुलट झालं. मग महिनाभरात तो सगळा मुद्दा शांत झाला आणि स्नॅपचॅट पुन्हा लोकांच्या मोबाईलमध्ये दिसू लागलं. आज जर स्नॅपचॅटची रेटिंग पाहिली तर ५ स्टार देणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.

सांगायचा मुद्दा असा की युट्युब विरुद्ध टिकटॉकच्या मुद्दा देखील असाच तर नाही ना? ट्रेंड येतो आणि जातो मग पुन्हा नवीन ट्रेंड येतो. कॅरीमीनाटी आणि आमिर सिद्दीकीच्या भांडणात युट्युब आणि टिकटॉक सोबतच कॅरीमीनाटी आणि आमिर सिद्दीकी यांचाच खरा फायदा होत नाहीये ना? याचा विचार व्हावा. तूर्तास आपल्या सर्वांना काही दिवस चघळण्यासाठी नवीन मुद्दा मिळाला आहे.

 तुम्हाला या गोष्टीवर काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा. कमेन्टबॉक्स तुमच्यासाठी खुलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required