computer

जेंव्हा जंगलचा राजा रस्त्यावर उतरतो...

सध्या जंगलातले प्राणी माणसांच्या शहरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण त्यांच्या जंगलात अतिक्रमण केले तर ते आपल्या शहरात अतिक्रमण करणारच ना!! मुळशी पॅटर्नच्या डायलॉगप्रमाणे हे सूत्र आहे. अनेकदा भररस्त्यात वाघ, अस्वल, बिबट्या असे प्राणी दिसतात. अशावेळी वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडते. सध्या एक असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल होत आहे..

वाघाला रस्ता क्रॉस करू देत येणाऱ्या-जाणाऱ्यांना इशाऱ्याने थांबवून लोकांची मदत करताना एक व्यक्ती दिसत आहे. ते पोलीस, ट्रॅफिक पोलीस किंवा वनखात्याचे कर्मचारी असावेत असा अंदाज लावला जात आहे. काही असले तरी त्यांनी दाखवलेला सावधपणा मात्र कौतुकाचे कारण ठरत आहे.

अनेक ठिकाणी आजूबाजूला जंगल आणि मधून रस्ता गेलेला असतो. अशा ठिकाणी प्राण्यांनी रस्ता ओलांडणे हा तर नेहमीचा प्रकार! यातून वाहनचालकांचा तोल सुटून अपघात झाल्याचीही उदाहरणे आहेत. आता व्हायरल झालेला व्हिडिओ आपल्याच महाराष्ट्रातील आहे. त्या कर्मचाऱ्याने का मन जिंकून घेतले हे तो व्हिडिओ बघितल्यावर समजू शकेल.

रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ सुरू आहे आणि अचानक वाघाची एन्ट्री होते. यातून जे व्हायचे तेच झाले आणि लोक घाबरले. सिटी पोलिसांनी मग त्या वाघाला रस्ता क्रॉस करून द्या आणि तोवर शांत जागीच थांबा म्हणून तेथील लोकांना मार्गदर्शन केले. व्हिडिओत एमएच ३४ क्रमांकाची बाईक दिसत असल्याने हा विडिओ ताडोबाजवळचा असण्याची शक्यता आहे.

झाडांमधून वाघ निघताना या कर्मचाऱ्याला दिसतो आणि तो वाहनांना थांबवतो. दोन्हीकडच्या लोकांना सूचना देऊन मधून वाघाला निघून जाण्यासाठी रस्ता मोकळा करतात. विशेष म्हणजे तो वाघ देखील जणू काही झालेच नाही अशी थाटात पूर्ण रस्ता क्रॉस करून निघून जातो.

समोर साक्षात वाघ आहे म्हटल्यावर अनेकांनी हा नजारा आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेतला. अवनिश सरण या केंद्रीय वन सेवेतील अधिकाऱ्यांनी तो विडिओ शेयर केला आहे. हा व्हिडिओ लगोलग व्हायरल झाला आहे.

उदय पाटील