६० वर्षांनंतरही गाण्यातली आणि आवाजातली जादू तीच ती... ऐका चांदणे शिंपित जाशी..

आता टीव्हीवर इतके कार्यक्रम असूनही पाहू नयेत इतके रद्दड असतात. पूर्वी एकच एक दूरदर्शनचं चॅनेल असल्यानं लोकांना जे आहे तेच पाहावं लागे. लोक आयुष्यात कधीही मातीत हात घातला नसला तरी "आमची माती आमची माणसं" पाहात आणि कुणी राजकीय नेता वारला की तीन दिवसांचा दुखवटा म्हणून असलेलं बोरिंग शास्त्रीय संगीतसुद्धा सहन करत.

पण एक होतं, सहन करावे असे कार्यक्रम खूप कमी असत आणि जे असे, त्यांचा दर्जा अत्यंत उत्तमच असे. सुधीर गाडगीळ घेत असलेल्या गप्पावजा मुलाखतींचा कार्यक्रम नेहमीच रंगत असे. नुकतंच गाडगीळांनी त्यांच्या या गप्पिष्ट मुलाखतींच्या कौशल्यामुळं काही अवघड मुलाखतीही कशा चांगल्या साधल्या गेल्या याबद्दल लिहिलं होतं. त्यांचं हे कसब तर खरंच, पण तेव्हा कलाकारसुद्धा कलाकार होते, त्यांचे सेलेब्रिटी झाले नव्हते. त्यामुळं एकप्रकारचा घरगुती साधेपणा त्यांच्या वागण्या-बोलण्यातही दिसून यायचा.

स्त्रोत

हा आहे आम्हांला फेसबुकावर गवसलेला आशाबाईंच्या मुलाखतीचा पाच मिनिटांचा तुकडा. इथं सुधीर गाडगीळ त्यांना "चांदणे शिंपित जाशी.." बद्दल विचारत आहेत. आशाबाईही खूप साधेपणानं या गाण्याबद्दलच्या आठवणी सांगतात. हृदयनाथांचं आशाताईंनी गायलेलं हे पहिलं गाणं. ते कशी अवघड गाणीच बसवतात याबद्दल थोडा कौतुकमिश्रित राग त्या व्यक्त करतात. आणि त्यात नाटकीपणा जराही वाटत नाही. आंतरजालावरच्या माहितीप्रमाणं हे गाणं पहिल्यांदा गायलं गेलं ते १९५६ साली,म्हणजे आजच्या घडीला या गाण्याला ६० हून अधिक वर्षं उलटून गेली आहेत. तरी गाण्याची जादू जराही कमी नाहीय.

या मुलाखतीच्या वेळेस आशाताई आणि गाडगीळ दोघेही तुलनेनं तरूण वाटत आहेत. ते म्हणतात की हे गाणं २९-३० वर्षांपूर्वी गायलं गेलं. म्हणजे मुलाखतीचं साल १९८५च्या दरम्यानचं असावं.  अर्थात  विकिपिडियावर ताईंचा जन्म  १९३३सालचा दिलाय, म्हणजे त्यांचं त्यावेळचं वय पन्नाशीच्या पुढचं असावं.  तरीही आवाजात एक प्रकारचा दमदारपणा जाणवतोय. बहुधा मुलाखतीत नंतर जे दाखवलं जातंय ते गाण्याचं मूळ रेकॉर्डिंग असावं. त्यात तर आशाबाईंचा आवाज असा मस्त लागलाय!! आशाताईंचं या मुलाखतीतलं  आणि गाणं गातानाचंही साधेपणही दुर्लक्ष न करता येण्यासारखं आहे. 

आशाताईंचा मॉडर्न अवतार (स्त्रोत)

आशाबाईंच्या आवाजातला गोडवा अजून टिकून आहे. आणि या व्हिडिओमधल्या "चांदणे..."चा आवाज तर अधिकच मधुर आहे. खरंतर दूरदर्शनकडे अशा जुन्या मुलाखतींचा साठा असायला हवा. पण सध्यातरी हा व्हिडिओ युट्यूबवरती दूरदर्शनच्या कुठल्याच चॅनेलवर सापडत नाहीय. त्यामुळं कदाचित आपल्याला अशाच कुणा दर्दी रसिकानं असे व्हिडिओ अपलोड करण्याची वाट पाहावी लागेल असं वाटतंय. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required