computer

पंचायत वेबसीरीजचा दुसरा सीझन आलाय.. का पाहावा? मग हे वाचाच!!

दोन वर्षांपूर्वी देशभरात लॉकडाऊन लागला आणि टिव्ही चॅनेलवर तेच ते चित्रपट बघून कंटाळलेली जनता नेट्फ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वेबसिरीजकडे वळली. कारणं अनेक होती. पण अनेक लोकांनी या मालिका एकाच बैठकीत संपवल्या. या काळात ज्या अनेक मालिका येऊन गेल्या त्यापैकी एक सर्वांच्या मनात घर करून गेल ती म्हणजे पंचायत! नेहमीच्या मालिकांपेक्षा ही वेगळी होती. केवळ नाईलाजापोटी शहरातला एक तरुण छोट्या गावात ग्रामसचिवाची नोकरी स्वीकारतो. तो त्याच्या नोकरीवर नाराज आहे. पण हळूहळू चित्र बदलते, गाव त्याला खेळीमेळीने सामावून घेते जाते अशी ही साधीसोपी कथा. ही मालिका लोकांना जाम आवडली. एका रंजक वळणावर पहिले पर्व संपले आणि दुसऱ्या पर्वाची हुरहूर लावून गेले. आजपर्यंतचा अनुभव असं सांगतो की पहिला सीझन कितीही भारी असला तरी दुसरा सीझन मार खातो आणि काहीवेळा तर अगदी माती खातो. पण पंचायतचा दुसरा सीझनही तितकाच मात्र भन्नाट आहे.

अतिशय शांत गतीने ही मालिका सुरु होते. पण हलक्या फुलक्या घटनांमागून ती हळूहळू लोकांना मात्र विचारात पाडते. एखादी शांत नदी वाहत आहे आणि आपण त्यात मस्तपैकी नौकाविहार करत आहोत असा अनुभव ही मालिका बघताना येतो. या मालिकेत ना शिव्यांचा भडिमार आहे, ना मारामारी आहे ना बोल्ड सीन्स. मालिकेचा नायक अभिषेक त्रिपाठी नावाचा ग्रामसेवक हा कुठे ना कुठेही प्रत्येक तरुणाला स्वतःचा प्रतिनिधी वाटू शकतो.

या मालिकेत कुठेही उपदेशाचे डोस नाहीत, पण मालिकेबरोबर आपल्यापर्यंत योग्य तो संदेश पोहोचता करण्यात यशस्वी ठरली आहे. मालिकेची सुरुवात तर अभिषेक त्रिपाठी नावाच्या तरुण ग्रामसेवकापासून सुरू होते, मात्र शेवट येईपर्यन्त ती पूर्ण फुलेरा गावाची गोष्ट बनते.

मालिकेची सिरीजची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची नैसर्गिकता. कुठेही ओढून ताणून घुसवलेली गोष्ट वाटत नाही. जे खरोखर घडत असते तेच आपल्याला समोर दिसते. ग्रामीण भागाचे इतके तंतोतंत चित्रण या आधी कुठेही दिसले नसेल. यात असेही काही प्रसंग आहेत जे विचार करायला भाग पाडतात. या प्रकारच्या मालिका याआधीही आल्या आहेत, पण पंचायतसारखी खेळीमेळीने पुढे सरकणाऱ्या मालिकेची गोष्ट काही औरच! सर्वच एपिसोड एकमेकांसोबत जुळलेले असले तरी विविध गोष्टींमधून कथा उलगडत जाते आणि आपण अधिकाधिक यात समरस होत जातो. अभिषेक त्रिपाठीचा कॉर्पोरेटमध्ये नोकरी करणारा मित्र गावात येतो, त्यावेळी मालिका बघणारा व्यक्ती गाव आणि शहर हा विचार नक्की करतो.

कुठल्याही कथेचा हिरो हा महान असायलाच हवा असे नाही. जितेंद्र कुमार म्हणजे आपल्या जीतूभय्याने नेहमीप्रमाणे ग्रामसेवकाच्या भूमिकेत जीव ओतला आहे. सरपंच मंजू देवी या रोलमध्ये नीना गुप्ता आणि सरपंचाचा नवरा असून ग्रामपंचायत चालवणारा रघुबिर यादव या कसलेल्या कलाकारांनी ही मालिका रंजक करण्यात कुठेही कसर ठेवलेली नाही. दोघांची केमिस्ट्री इतकी भारी आहे की काही न बोलता जरी ते बसून राहिले तरी भारी वाटेल.

उपसरपंच प्रल्हाद पांडे आणि पंचायतीचा सहायक विकास या तशा सहायक भूमिका, पण उलट याच दोघांवर सिरीज टिकून आहे असे वाटावे इतके या दोघांनी छान काम केले आहे. या दोघांचा पडद्यावरील वावर हा तुम्हाला दृश्यागणिक हसवून जाईल. ते समोर असले की त्यांच्यावरची नजर हटत नाही. अख्खी सिरीज आपल्याला हसवणारा उपसरपंच प्रल्हाद पांडे मात्र शेवटच्या एपिसोडमध्ये रडवून जातो. या मालिकेत काय नाही ते सांगा. गाव आणि गावातील समस्या आहेत, गावात कशा गोष्टीवरून भांडण सुरू होऊ शकते याचा अंदाज येईल असे प्रसंग आहेत, कुरघोड्यांचे राजकारण, आमदारांचा हस्तक्षेप, हळूहळू फुलत जाणारे प्रेम असे सर्व काही या मालिकेत आहे.

सरपंचाची मुलगी रिंकी मालिकेच्या दुसऱ्या पर्वात लोकांना खिळवून ठेवते. तिचा रोल अजून असायला हवा होता असे वाटते. पण कदाचित तिला तिसऱ्या पर्वासाठी राखून ठेवले असावे. वास्तविक या दोघांची लव्हस्टोरी अजून वाढवून दाखवता आली असती. पण त्यातील निरागसता हरवली असती आणि याची पुरेशी काळजी घेतली गेली आहे. एकूण काय तर, ही मालिका प्रत्येकाने बघायला हवी अशी आहे. कुठलाही धांगडधिंगा न करता कशी कहाणी सांगितली जाते आणि एक सेकंदही माणसाला कंटाळवाणी होत नाही हे या मालिकेचे मोठे यश आहे. यात असे अनेक प्रसंग आहेत, ज्यात आपल्याला खूप मोठी शिकवण मिळू शकते.

पंचायत मालिकेच्या दोन्ही पर्वात ठिकठिकाणी हास्याचे फवारे आहेत. पण शेवटचा एपिसोड मात्र अंगावर यावा इतका दुःखद आहे. शेवटच्या १५ मिनिटांमध्ये असा एकही माणूस नसेल ज्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही. या मालिकेचा तिसरा सीझन येईल याचाही अंदाज शेवटी शेवटी येतो. या पर्वानंतर आता तिसऱ्या पर्वापासून असलेल्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. तिसऱ्या पर्वामध्ये कथा कशी वळण घेते हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required