computer

वसईजवळच्या पंजू बेटाचं पर्यटन स्थळात होतंय रुपांतर!! ८० कोटींच्या या प्रकल्पात काय होणार आहे?

पर्यटनासाठी जवळचे एखादे मस्त ठिकाण असेल तर वीकेंडला पटकन जाऊन येता येते. पण काही ठिकाण अशी आहेत जी त्या भागात गेल्याशिवाय अनुभवता येत नाहीत. म्हणजे पाहा, एखादं बेट असेल, तर तिथं जाऊन आल्याशिवाय का ते आपल्याला भुरळ पाडेल की नाही हे कसं कुणी सांगू शकेल? तसं पाहयाला गेलं तर सहसा बेटावर असलेली रिसॉर्टस् पर्यटकांना नेहमी आकर्षित करतात. अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये अशी अनेक सुंदर रिसॉर्ट्स आहेत. पण महाराष्ट्रात अजूनतरी सर्व सोयीसुविधा असलेले पर्यटन स्थळ असलेले बेट नाही. असा विचार करत असाल तर थांबा! तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात असे बेट नव्याने विकसित केले जाणार आहे. हे बेट पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधा खास बनवले जात आहे.

वसई खाडीवरील 'पंजू बेट' हे महाराष्ट्रातील एकमेव बेट आहे, जे पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनणार आहे. त्यासाठी नायगाव आणि भाईंदर दरम्यान वसलेली ६०० एकर जमीन वापरली जाणार आहे. पंजू बेटाचे सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या बेटाची लोकसंख्या १५०० आहे आणि वसई शहरापासून हे बेट अवघ्या १० किमी अंतरावर आहे. नायगाव जेट्टीवरून फेरी बोटींद्वारे सात मिनिटांत तिथे पोहोचता येते. भारतातील २६ बेटं नव्याने विकसित करण्यात येणार आहेत, त्यातील महाराष्ट्रात पंजू बेट हे एकमेव आहे.

या प्रकल्पात ८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या विकासकामासाठी मास्टरप्लॅन तयार आहे. यामध्ये जेट्टीजचा विकासही प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या, बेटावर दोन जेटी आहेत - जुनी गाव जेट्टी आणि नवीन प्रवासी जेट्टी. मुख्य जेट्टी गावाजवळ आहे आणि दुसरी रेल्वे पुलाजवळ आहे. नवीन जेट्टी पर्यटकांच्या स्वागतासाठी अतिशय वेगळ्या व आकर्षक पद्धतीने तयार केली जाणार आहे. या जेट्टी टर्मिनलमध्ये तिकीट काऊंटर, सुरक्षा तपासणी, जड सामान ठेवण्यासाठी खोली, शौचालये, प्रतीक्षालय आणि दुकाने असतील. सर्व पर्यटक बेटावर प्रवेश करण्यासाठी रेल्वे पुलाजवळील प्रवासी जेटीवर उतरतील. तिथे मार्गदर्शन करण्यासाठी एक माहिती केंद्र असेल. मास्टर प्लॅननुसार संग्रहालय, मत्स्यालय, ॲम्फीथिएटर, मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट आणि इतर पर्यटन सुविधा जसे वॉशरूम, वेटिंग लाउंज अश्या सुविधाही असतील. ॲम्फीथिएटरमध्ये सुमारे २०० लोक बसू शकतील आणि नृत्य प्रदर्शन आणि संगीत मैफिलीसारख्या विविध कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतील. ही पूर्ण रचना बांबूपासून केली जाईल व सगळीकडे इको-फ्रेंडली बल्बद्वारे रोषणाई केली जाईल, ज्यामुळे रात्रीही बेट आकर्षक दिसेल. या बेटाचा यूएसपी म्हणजे मध्यवर्ती सुविधा केंद्र!! ते माशाच्या आकारात आणि पूर्णपणे पर्यावरणापूर्वक बांबूपासून बनवले जाणार आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे हे पर्यटन स्थळ प्लास्टिक आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी एक सविस्तर योजना देखील तयार करण्यात आली आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा संकलन, पृथक्करण, साठवण, वाहतूक, प्रक्रिया आणि अंतिम विल्हेवाट या प्रत्येक प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन केले जाईल. प्लॅस्टिक बॉटल क्रशरदेखील विविध ठिकाणी उभारले जातील. बेटावर पर्यटकांसाठी रात्रीच्या कॅम्पिंगची व्यवस्था देखील केली जाईल, जिथे कॅम्प फायर आणि बार्बेक्यूची व्यवस्था असेल.

रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे पंजू बेटावरील रहिवासी आनंदात आहेत. ते म्हणतात हे बेट इतके वर्ष दुर्लक्षित होते, या जागेला ऐतिहासिक महत्वही आहे. महान मराठा योद्धा चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीज राजवटीपासून वसई किल्ल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रणनीती म्हणून पंजू बेटाचा वापर केला होता. पहिला पेशवा बालाजी भट यांचा मुलगा चिमाजी आप्पा बेटावरून आर्थिक व्यवहार करत होता. तेव्हा त्याचे सैन्य बेटावर राहिले होते. या बेटावर २१ स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

या बेटाच्या प्रस्तावित योजनेत खालील गोष्टी करण्यात येणार आहेत.

१. तलावांचे सुशोभीकरण: बेटावरील दोन तलाव, गोडे तलाव आणि खारे तलाव यांचे सुशोभीकरण केले जाईल. तलावांवर पाणी आणि लाईट यांचा खास असा लेझर शो असेल. त्यात वसई तालुक्याचा समृद्ध इतिहास दाखवला जाईल.

२. साहसी क्षेत्र ( adventure झोन): १४,६३७ चौरस मीटर परिसरात साहसी क्रीडा उपक्रम आयोजित केले जातील. उपक्रमांमध्ये वॉल क्लाइंबिंग, नेट क्लाइंबिंग, लांब उडी आणि पोल क्लाइंबिंगचा समावेश असेल

३. मॅंग्रोव्ह(खारफुटी) पार्क: यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांविषयी माहिती देणारी चित्रे आणि वस्तू प्रदर्शित करण्यात येतील. तसेच उद्यानात पक्षी निरीक्षण डेक, बाल्कनी असतील.

४. सेल्फी पॉइंट्स: बेटावर फोटो घेण्यासाठी ठिकठिकाणी अनेक सुंदर जागा असतील. लाकडी कोरीवकाम केलेले, बांबूचे आणि मातीचे शिल्प उभे केले जातील.

५. सायकलिंग आणि चालण्याचे मार्ग: संपूर्ण बेटावर खास असे सुशोभित रस्ते तयार केले जातील. तिथे तुम्ही निसर्गाचा आनंद घेत चालू शकता तसेच सायकल भाड्याने घेऊन मस्त रपेट मारू शकता. अपंग आणि वृद्धांसाठी इको-फ्रेंडली गोल्फ कार्टही उपलब्ध करून देण्यात येतील

६. बोट टूर: गावातील जेट्टीवरून विविध बोट राईड आयोजित केल्या जातील. या बोट सेवा स्थानिक ग्रामस्थ चालवतील.

या प्रकल्पासाठी इथले स्थानिकही खूप उत्सुक आहेत. त्यामुळे बेटावरच्या रहिवाशांसाठी ही अनेक सुविधा उपलब्ध होतील अशी त्यांना आशा आहे. मुंबईजवळच असे सुंदर पर्यटन स्थळ तयार झाल्यास पर्यटकही नक्कीच तिथे गर्दी करतील यात शंका नाही.

शीतल दरंदळें

सबस्क्राईब करा

* indicates required