computer

ती पहा,ती पहा बापूजींची प्राणज्योती- ही कविता कशी जन्माला आली हे सांगणारी ही कथा आज वाचायलाच हवी !!

लोककवी मनमोहन नातू हे नाव आताच्या नव्या पिढीला फारसे परिचित नसेल. एकेकाळी एका पिढीला वेड लावतील अशा कविता त्यांनी लिहिल्या होत्या .२ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधींच्या जन्मदिनी त्यांची आठवण होणे याला एक खास कारण आहे. ते कारण असे की एकेकाळी क्रमिक पाठ्यपुस्तकात बापूजींवर लिहिलेली त्यांची कविता बर्‍याचजणांच्या शाळकरी दिवसाची आठवण असेल. ती कविता म्हणजे :

ती पाहा ती पाहा । बापूजींची प्राणज्योती || 
तारकांच्या सुमनमाला । देव त्यांना वाहताती ||
 


कवि मनमोहन यांना पैसा आणि व्यवहार याबद्दल फारसे प्रेम नव्हते. गरजेपुरता पैसा हाताशी असला की ते त्यांच्या लेखनात मग्न असायचे. पुढची गरज उभी राहिली की अगदी आठवड्याच्या रेशनपाण्यासाठी त्यांची वणवण सुरु व्हायची. अशाच एका दिवशी त्यांच्या पत्नीने हातात चार पिशव्या देऊन आठवडाभराचे रेशन घेऊन यायला सांगीतले. पत्नीने सांगीतले आणि मनमोहन यांनी ऐकले. पण पैसे कुठे होते खिशात? त्या काळी एका आठवड्याच्या धान्यासाठी साडेसात रुपये त्यांना लागायचे. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांच्या खिशात ते पण नव्हते. मग काय? नेहेमीप्रमाणे त्यांनी त्यांचे कविता लिहिलेले कागद घेतले आणि वर्तमानपत्र -मासिकांच्या संपादकांना भेटले. या पाच कविता घ्या आणि साडेसात रुपये द्या असा त्यांचा नेहेमीचा प्रस्ताव असायचा. त्या दिवशी काय झालं याची कल्पना नाही, एका संपादकांनी नको तुमच्या प्रेमकविता आता असे म्हणत त्यांना परत पाठवले. दुसरे संपादक म्हणाले तुमच्या आधीच्याच दोन कविता आमच्याकडे शिल्लक आहेत. एकूण हिशेब काय, तर पैसे नाहीत!! 
मग मनमोहन यांना एक कल्पना सुचली. ते त्या काळच्या एका सुप्रसिध्द गायक -संगीतकारांकडे गेले.ते त्यांच्या कामात मग्न होते . त्यांनी काय काम आहे म्हटल्यावर कवी म्हणाले माझ्या कविता घ्या आणि रेशनपाण्यासाठी साडेसात रुपये द्या. ते गायक -संगीतकार त्या काळचे भावगीतांचे स्टार गायक गजाननराव वाटवे! त्यांनी मनमोहन यांना वाटेला लावण्यासाठी सांगितलं तुमच्या प्रेमकविता मला नको आहेत. असे त्यांनी म्हटले खरे ,पण त्यांच्या मनात एक विचार आला.

तो काळ म्हणजे १९४८ सालचा फेब्रुवारी किंवा मार्च महिना असावा. नुकताच महात्मा गांधींचा खून झाला होता. लोकभावना गांधींजीच्या हत्येमुळे व्याकुळ झाल्या होत्या. जर गांधीजींवर एखादे गाणे मिळाले तर ते लोकप्रिय होईल. याच विचाराने ते मनमोहन यांना म्हणाले ' मला तुमच्या प्रेमाबिमाच्या कविता नकोत - तुम्ही घरी जा - उद्यापर्यंत मला गांधीजींवर एक कविता लिहून आणून द्या. तुम्हाला साडेसात रुपये हवेत ना? गांधीजींवर कविता द्या, मी तुम्हाला पंधरा रुपये देतो.

मनमोहन यांनी मिनिटभर विचार केला आणि म्हणाले गांधीजीवर कविता लिहायची तर त्यासाठी उद्याची वाट का बघायची, आताच लिहून देतो. गजाननराव वाटव्यांची मुलगी तिथेच अभ्यास करत बसली होती. तिच्याच वहीचा एक कागद घेऊन त्यांनी भराभर लिहायला सुरुवात केली आणि वर उल्लेख केलेली कविता जन्माला आली.

ती पाहा ती पाहा । बापूजींची प्राणज्योती ||
तारकांच्या सुमनमाला । देव त्यांना वाहताती ||  
चंदनाचे खोड लाजे । हा झिजे त्याहूनही ||
आज कोटी लोचनीच्या । अश्रुमाला सांगती ||

या कवितेसाठी गायकांनी त्यांच्या हातावर पंधरा रुपये ठेवले. मनमोहन यांची रेशनपाण्याची समस्या संपली होती. 
गजाननराव वाटव्यांनी त्या कवितेला सुंदर चाल दिली. या कवितेची रेकॉर्ड रातोरात खपली. वाटव्यांना त्या गाण्याचे १७,००० रुपये मिळाले. कवी मनमोहन मात्र त्यांच्या १५ रुपयांवर खूश होते. 

आज २ ऑक्टोबरला ही कविता म्हणताना बापूजींच्या सोबत लोककवी मनमोहन यांची ही आठवण खास आमच्या वाचकांसाठी!!

सबस्क्राईब करा

* indicates required