computer

पावसाची गाणी : लता दीदींच्या आवाजातील सदाबहार पावसाचे गाणे 'ओ सजना' !!

Subscribe to Bobhata

ती प्रियकराला भेटून परत निघते तेव्हा खरंतर पावसाला सुरुवात झालेली असते. तो तिला म्हणतोही, "पाऊस पडतोय, कशी जाशील?"
ती म्हणते, "नहीं मैं चली जाऊंगी"
ती घरी येते पण मन मात्र त्याच्यापाशीच राहून गेलंय.
ती नाही थांबू शकत त्याच्या घरी…जालीम जमाना तिथं थांबू देणार नाही याची जाणीव आहे तिला.
ती निघते आणि पावसाचा जोर वाढतो..  पावसाचा रपरप रपरप  आवाज आपल्या कानावर आदळत असतो.
ती घरी येते पण फक्त देहानं.
मन अजून साजणाच्या आठवणीतच गुंतलेलं..ती साद घालते त्याला..
"ओ सजना"..
बाहेर पाऊस अधिकच जोरात कोसळू लागतो...

बिमल रॉय यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'परख' चित्रपटातील हे गीत गेली साठ वर्षं पावसाच्या गाण्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गाण्याच्या सुरुवातीला 'ओ सजना ' असे दोनच शब्द आहेत आणि त्यानंतर पावसाच्या सरीसारखी सतारीची धून उलगडत जाते. त्यात आपण देखील इतके गुंतत जातो की ती सतार आपल्या मनात देखील झंकारु लागते..

लतादीदींचा स्वर तिची व्याकुळ मनस्थिती अगदी बरोबर पकडतो आणि सलीलदा ती सतारीच्या छेडीतून आपल्या पर्यंत पोचवतात.

नायिका सीमा पुन्हा त्याला साद घालते. ती आपल्यातच मग्न आहे..
" ओ सजना बरखा बहार आई"

पडद्यावर तिच्या घराच्या खिडकीतून येणारा उजेड दिसतो..त्याच वेळी ती आपले हात पागोळ्या झेलायला पुढे करते. चेहऱ्यावर कोमल भाव दिसत असतात. अंगणापर्यंत तो उजेड पसरतो. लाकडी घराच्या चौकोनी जाळीचे प्रतिबिंब आपल्याला पाण्यात दिसते. पाणी खळाळत वहात असते. पुन्हा एकदा तीच सतार आपली सुरावट छेडत असते.

स्रोत

हे गीत बंगालीतल्या "ना जेयो ना रजनी एखोनो बाकीआरी  किछू दिते बाकी "बोले रातजगा पाखी".(सख्या जाऊ नकोस ना. अजून रात्र बाकी आहे. रातपाखरू सांगतंय अजून बरंच काही बाकी आहे) यावर बेतलेले आहे.

हे गाणं अर्थातच खूप प्रसिद्ध झाले. सर्वांच्या तोंडी हे गाणं खेळू लागलं.

पुढच्याच वर्षी  बिमल रॉय निर्मित आणि दिग्दर्शित "परख" हा हिंदी चित्रपट आला. सलीलदांनी कथा लिहिली होती आणि शैलेंद्रनी संवादलेखन केले होते.सलीलदा संगीताची बाजू सांभाळत होते. त्यांनी त्यांचे आवडते बंगाली गाणे घ्यायचे ठरवले. शैलेंद्रना त्यांनी मुखडा ऐकवला आणि ते गाणे हिंदीत करायचंय असं सांगितलं.

शैलेंद्रनी हिंदीत मुखडा लिहिला आणि सलीलदाना ऐकवला. सलीलदा खुश झाले. पुढील ३ अंतरे  देखील लगेच तयार झाले.

आणि एक सदाबहार गाणे जन्माला आले..

"ओ सजना, बरखा बहार आई
रसकी फुहार लाई
आँखियोंमें प्यार लाई..
ओ सजना….

सलीलदांची सतार अशी काही पकड घेते मनावर.. सीमाच्या भूमिकेत साधनाने असे काही रंग भरलेत की आपण कधीच तिला विसरू शकत नाही. तिचा बोलका चेहरा,तिच्या प्रियकराच्या भूमिकेतील देखणा बंगाली अभिनेता बसंतकुमार चौधरी, रपरप पडणारा पाऊस, घराच्या खिडकीतून बाहेर झिरपणारा उजेड, त्या उजेडात पागोळ्यांचे पाणी तळव्यांवर झेलणारी सीमा आणि तिची ओढ आपल्यापर्यंत पोचवणारा लतादीदींचा मधुर स्वर.. सगळंच कसं जमून आलेलं कर्पूरी विड्यासारखं..

रस्त्यावरून पाणी झरझर वहात असतं.. सीमाच्या मनातील आंदोलन देखील तसेच  वेग पकडतंय.. त्याची द्रुत लय साधायला तर गाणं खमाज रागात बांधलंय सलीलदांनी..
खमाज हा रात्रीच्या प्रहरी गायचा राग..चंचल वृत्तीचा..थोडी द्रुत लय साधणारा… सीमा गात असते,

"तुमको पुकारे मेरे मनका पपिहरा
मीठी मीठी अगनीमे 
जले मोरा जियरा..
ओ ssssसजना"

सीमाच्या मनातील चातक फक्त सख्याच्या प्रतीक्षेत आवाज देतोय..

"ऐसे रिमझिममें ओ सजन 
प्यासे प्यासे मेरे नयन
तेरे ही ख्वाबमें खो गई
ओssss सजना..
सांवली सलोनी घटा
जबजब छाई
आँखियोंमें रैना गई
निंदियां न आई
ओ सजना बरखा बहार आई"

स्रोत

लतादीदी तिच्या भावना मधुर आवाजात आपल्या पर्यंत पोचवतंच असतात...नारळाच्या झावळ्यांमधून पाणी टिपटीप गळत असतं..खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाची भौमितिक आकृती रस्त्यावर दिसत असते,त्यातूनही पाणी वहात असते....साधनाच्या अभिनयाला तोडच नाही. तो तिचा फेमस साधनाकट अस्तित्वात यायच्या आधीचा हा सिनेमा. त्यामुळे भव्य कपाळावर मोकळ्या केसांची महिरप तिला खुलून दिसते. तिचे पाठीवर मोकळे सोडलेले केस खूप सुंदर दिसतात.

(बिमल रॉय)

बिमल रॉय यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'परख' चित्रपटाने ३ फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले.

१. उत्कृष्ट दिग्दर्शक बिमल रॉय
२. उत्कृष्ट सहकलाकार मोतीलाल
३. उत्कृष्ट साऊंड जॉर्ज डिक्रुज

या शिवाय उत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट कथा सलील चौधरी अशी दोन नामांकने मिळाली. या चित्रपटाचे संगीतकार म्हणून सलीलदा यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपले पाय आणखी घट्ट रोवले. प्रयोगशील संगीतकार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द यशस्वीपणे पुढे चालू ठेवली. ते आसाम आणि बंगालमध्ये राहिल्याने तेथील संगीताची तसेच लोकसंगीताची त्यांच्यावर छाप होतीच पण बिथोवेन व  मोझार्ट या युरोपियन कलाकारांचा देखील प्रभाव त्यांच्यावर होताच.

(संगीतकार सलील चौधरी)

मंडळी, या गाण्यात सतार वाजवली आहे जयराम आचार्य यांनी, अशी अनेक चित्रपट गिटं आहेत जी त्यांच्या सतारीशिवाय अपूरी राहिली असती. जयराम आचार्य यांची सतार आणि पंडीत रामनारायण यांची सारंगी याचा विलक्षण मिलाप असलेले पावसाचे दुसरे गाणे म्हणजे 'छोटे नवाब' मधलं ' घर आजा घीर आये, बदरा सावरीया '. त्या गाण्याची कथा वाचू या पुढच्या लेखात, तोपर्यंत तुम्ही आस्वाद घ्या "ओ सजना, बरखा बहार आई" या गीताचा !!

सबस्क्राईब करा

* indicates required