computer

कोण होता हा माणूस ज्याने कोट्यावधी भारतीयांना नोकरी मिळवून दिली ?

वर दिलेला फोटो बघताय ना ? हा फोटो आहे सर आयझॅक पीटमन या माणसाचा ज्याने एकेकाळी भारतातल्या कोट्यावधी लोकांना नोकरी मिळवून दिली होती.आज मुंबईत काय किंवा भारतात कुठेही काय त्याचं स्मारक दिसणार नाही पण आधी म्हटल्याप्रमाणे शहराकडे धाव घेणार्‍या करोडो लोकांना नोकरी मिळवण्यासाठी सक्षम बनवण्यात या माणसाचा फार मोठा वाटा आहे.सत्तरीच्या दशकातील ही गोष्ट आहे.स्वातंत्र्योत्तर काळातल्या उभ्या राहीलेल्या उद्योगधंद्यांचा आणि व्यापाराचा विस्तार मुंबईत जोरात सुरु झाला होता.या उद्योगधंद्यांची मोठमोठी कार्यालये उभी राहत होती.या कार्यालयात एक अत्यंत आवश्यक कर्मचारी म्हणजे इंग्रजी येणारा- टायपिंग करू शकणारा आणि डिक्टेशन घेऊ शकणारा -'स्टेनो टायपिस्ट'! त्या काळी नोकरी मिळवण्याचा एक हमखास फॉर्म्युला होता तो म्हणजे मॅट्रीक पास व्हा- टायपिंग शॉर्टहँड करा आणि नोकरी मिळवा !
 

आताच्या जमान्यात आयझॅक पीटमनने बनवलेल्या ' पीटमन शॉर्टहँड'ची माहितीही कोणाला नसेल किंवा त्याचं फारसं कौतुकही वाटणार नाही पण फाडफाड इंग्रजी बोलणारा साहेब ज्या वेगाने बोलत राहील त्याच वेगाने त्याचे बोलणे 'शॉर्टहँड'मध्ये लिहून टायपिंग करणारा स्टेनोग्राफर हा एकेकाळी ऑफीसचा कणा समजला जायचा. 

वर उल्लेख केल्याप्रमाणे ऑफीसातला स्टेनोटायपिस्ट हा ऑफीसचा कणा असयाचा.सत्तरीच्या दशकात महिलांनी हे कौशल्य आत्मसात केले आणि स्टेनोटायपिस्ट हे पद प्राधान्याने महिलांचे समजले जायला सुरुवात झाली.पण या क्षेत्रात बाजी मारली ती तमिळनाडूतून आलेल्या तमिळ लोकांनी कारण एकच :इथल्या मराठी माणसापेक्षा त्यांचे इंग्रजी चांगले होते.एक काळ तर असा होता की लुंगीधारी स्टेनो म्हणजे ऑफीसचा अप्रत्यक्ष बॉस समजला जायचा.त्यांचे वर्चस्व एकेकाळी इतके शिगेला पोहचले होते की त्यांना मापात कापण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना ' लुंगी भगाव' आंदोलन उभे करावे लागले होते.
 

आता स्टेनोग्राफी कालबाह्य झाली आहे. पण केवळ एका कौशल्याच्या आधाराने कोट्यावधी भारतीयांना नोकरी मिळवून देणार्‍या आयझॅक पीटमनचे पुण्यस्मरण आज करायला हवेच ! सोबत शॉर्टहँडचे काही नमुने दिले आहेत ते जरूर बघा !!

सबस्क्राईब करा

* indicates required