बिस्मिल्लाह खान : रसिकांच्या मनामनात गूंजणाऱ्या सनईचा एकाकी अंत !

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या सनईची ओळख भारतीयांना करून देण्याची गरज नाही. त्यांची सनई आपल्या भारतीय संस्कृतीचा सूर आहे. आपल्या देवळात, आपल्या लग्न समारंभात, बिस्मिल्लाह खान यांच्या सनईचे सूर म्हणजे त्या कार्यक्रमांचा अविभाज्य अंग असते.

१९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर उस्तादजींना सनई वादनासाठी खास आमंत्रित केले होते. सनईला शास्त्रीय संगीताच्या अत्त्युच्च पातळीवर नेऊन ठेवण्याचे काम उस्ताद बिस्मिल्लाह खान यांनी केलंय. २००१ साली त्यांना  भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन गौरवण्यात आले. पण जगावर आपल्या संगीताची मोहिनी टाकणाऱ्या या कलाकाराचा अंत मात्र फार एकाकी आणि करूण असा झाला.


स्रोत

वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची परिस्थिती फार हलाखीची होती. आर्थिक नियोजन करणे त्यांना कधीच जमले नाही. आपल्या बिदागीतून येणाऱ्या उत्पन्नावर त्यांनी त्यांच्या ८० जणांच्या कुटुंबाला पोसले. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा बिस्मिल्लाह खान यांनी सरकारकडे आर्थिक मदत मागितली होती. पंतप्रधानांनी २ लाख रुपयाची रक्कम तत्कालीन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. उत्तर प्रदेश सरकारने यात ५ लाखाची भर टाकली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना ही बातमी मिळाल्यावर त्यांनी पंजाब सरकारतर्फे ५ लाखाची भर टाकली. असे करता करता २५ लाखाची रक्कम उस्तादजींच्या स्वाधीन करण्यात आली. परंतु उस्तदजींच्या शेवटच्या आजारपणात त्यांना ताज्या फळाचा रस मिळणेही मुश्कील झाले होते. त्यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या खात्यात ५६ लाख रुपये आणि स्थावर मालमत्ता जवळ जवळ दीड कोटी रुपयांची होती. या पैशांवर मात्र ताबा होता त्यांच्या मुलांचा!! साहजिकच मृत्युसमयी त्यांना आर्थिक आधार काहीच नव्हता. त्यांनी बांधलेल्या नवीन घरात वास्तव्य करणं देखील त्यांच्या नशिबात नव्हतं.


स्रोत

त्यांच्या कौटुंबिक बेबनाव एका विचित्र पातळीवर पोहोचला होता. त्यांचा नातू ‘नझर’ याने त्यांच्या चांदीच्या सनया चोरून सोनाराकडे विकल्या. केवळ १७ हजार रुपयांसाठी या लाख मोलाच्या या सनया वितळवून टाकण्यात आल्या.

एका भारतरत्नाचा असा करुण आणि एकाकी अंत केवळ आर्थिक नियोजनाचे अपयश असेच म्हणावे लागेल. 

पण आपण हे वाचतो, ऐकतो आणि विसरून जातो. नुकतेच घडलेले विजयपत सिंघानिया यांचे प्रकरण हे ढळढळीत उदाहरण आहे.

आज उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोभाटातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सबस्क्राईब करा

* indicates required