computer

दिवाकर करकरे: ट्रेलर, टीझर नसलेल्या काळात फक्त पोस्टरद्वारे लोकांवर जादू करणारा अवलिया...

ज्या काळात ट्रेलर आणि टीझर रिलीज होत नव्हते त्या काळात सिनेमाचं पोस्टर प्रेक्षक खेचण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडायचं. या पोस्टरवर काय काय असायचं? सिनेमातली मुख्य पात्रं, हिरोचा आकारातील लुक, सिनेमातली एखादी आकर्षक पोझ आणि सिनेमाच्या एकूण ‘मूड’ला बसेल अशी रंगसंगती. हा एकूण मसाला प्रेक्षकांना खेचण्यासाठी पुरेसा असायचा. ह्या पोस्टर्सचं एवढं महत्त्व होतं की, असं म्हणतात यश चोप्रा त्याच्या प्रत्येक सिनेमाच्यावेळी मुंबईतल्या प्रमुख थियेटर्सबाहेर लावलेले पोस्टर्स आवर्जून बघायला जायचा.

आज सिनेमांच्या पोस्टर्सची आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे सिनेमा विश्वाला चालवण्यासाठी आवश्यक असलेले हे पोस्टर तयार करणारा कलाकार नुकतंच हे जग सोडून गेला आहे.

दिवाकर करकरे ह्यांनी ५ जानेवारी रोजी या जगाचा निरोप घेतला. हे नाव आपल्या कोणाच्याही परिचयाचं नाही. त्याची आवश्यकताही नाही. पण सिनेमा सृष्टीत काही माणसं असतात जी त्या सृष्टीपुरतीच प्रसिद्ध आणि महत्त्वाची असतात. करकरे त्यापैकीच एक.

त्याकाळी सिनेमांचे पोस्टर तयार करणाऱ्या कलाकारांमध्ये करकरे हे आघाडीचे नाव होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत जवळजवळ १००० सिनेमांचे पोस्टर्स तयार केले. पैकी काही नावे तर सुपरहिट होती. जसे की, दिवार (१९७५), शोले (१९७५, डॉन (१९७५), वक्त (१९६५), सिलसिला (१९८१), सत्यम शिवम सुंदरम् (१९७८) इत्यादी.

त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती बिमल रॉय यांच्या बेनझीर (१९६४) सिनेमापासून. बिमल रॉय यांचा उल्लेख आलाच आहे तर त्यांचा एक किस्सा वाचूया. बिमल रॉय यांनी बंदिनी सिनेमा तयार केला. या सिनेमाच्या पोस्टरचं काम करकरेंकडे होतं. पोस्टर तयार केल्यावर करकरेंनी बिमल रॉय यांना फोन करून पोस्टर कधी आणून देऊ असं विचारलं. बिमल रॉय म्हणाले की पोस्टर तयार झाल्याची माहिती देणं तुमचं काम नाही. तुम्ही एक कलाकार आहात. पोस्टर तुमच्याकडून घेणं माझं काम आहे. यानंतर बिमल दा पोस्टर घ्यायला स्वतः गेले.

दिवाकर करकरे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केलाच पाहिजे. अमिताभ बच्चन यांची ‘angry young man’ इमेज पोस्टरवर पहिल्यांदा रंगवणारे करकरेच होते. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला आकार देणाऱ्या सुपरहिट सिनेमांची यादी काढली, तर पहिल्या पाच सिनेमांचं पोस्टर करकरे यांच्या कुंचल्यातून साकारलेलं असेल. अमर अकबर अ‍ॅन्थनी, डॉन, सिलसिला, शोले, दिवार अशी प्रमुख नावे घेतला येतील. 

दिवाकर करकरे यांनी आपला जम बसवल्यावर कालांतराने स्वतः चा स्टुडीओ सुरु केला. त्यांच्या कामाचा दर्जा बघता निर्माते पैशांची चिंता करत नसतं. उदाहरणच द्यायचं झालं तर अमिताभ बच्चन यांच्या मर्द सिनेमाच्या पोस्टरसाठी करकरेंना ५०,००० रुपये मानधन मिळालं होतं. करकरे यांच्या कामातील हातखंडा आणि अनुभव बघून राज कपूर यांनी सत्यम शिवम सुंदरम् सिनेमाच्यावेळी करकरेंनी तयार केलेलं पोस्टर न बघताच विकत घेतलं होतं. पुढे त्याच पोस्टरने पब्लिक सिनेमागृहात खेचून आणली.

सिनेमा कालांतराने बदलला आणि सिनेमा क्षेत्राशी जोडलेले लहानसहान उद्योगधंदे बंद पडले. नवीन तंत्रज्ञानामुळे पोस्टर तयार करणं सोपं झालं. कॉपी पेस्ट तंत्रामुळे पोस्टर तयार व्हायला कमी वेळ लागू लागला. दिवाकर करकरे सारख्या कलाकारांवर मोठं संकट ओढवलं. शेवटी काळाची पावले ओळखून दिवाकर करकरे यांनी आपलं काम बंद केलं.

३ तासांच्या सिनेमाचा मूड एका छोट्याशा जागेत अचूक पकडणारा हा कलाकार जसा त्याकाळी अज्ञात होता तसा तो शेवटपर्यंत अज्ञातच राहिला. त्याला अज्ञात ठेवण्यात आलं म्हणा किंवा त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही म्हणा, पण करकरे सारख्या कलाकाराला त्याच्या कामाबद्दल जो मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही. यश राज फिल्म्सला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जो मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याचं करकरेंना साधं आमंत्रणही नव्हतं. सिनेमांचे पोस्टर नीट लागलेत की नाही बघण्यासाठी स्वतः थियेटर बाहेर उभा राहणारा यश चोप्रा करकरेंना विसरला. याबद्दल बोलताना करकरे म्हणाले होते की मला याचं वाईट वाटत नाही.

असा हा उमदा कलाकार वर्षाच्या सुरुवातीलाच हे जग सोडून गेला आहे. बोभाटाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सबस्क्राईब करा

* indicates required